भाऊ शौविक आणि वडिलांसह रिया चक्रवर्तीची पुन्हा होणार चौकशी!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आर्थिक बाबींचा तपास करणारी ईडीची टीम चार दिवसांत आज दुसऱ्यांदा रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. यापूर्वी शुक्रवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी तिची चौकशी करण्यात आली. रिया आज सकाळी ११ वाजता भाऊ शौविक आणि वडील इंद्रजित यांच्यासह ईडी कार्यालयात पोहोचली. ईडीकडून रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची तिसऱ्यांदा, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची पहिल्यांदा आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीची दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी रियासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला रियाने तपासात सहकार्य केले नाही. कधी ती आजारपणाचे कारण सांगत होती, तर एका प्रश्नाच्या उत्तरात आता काहीच आठवत नाही, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले आहे. रियाच्या म्हणण्यानुसार, तिने ७ चित्रपट केले आणि त्यातून तिने पैसे कमावले आहेत. आज सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यालादेखील चौकशीसाठी समन बजावण्यात आले आहे. सिद्धार्थ सध्या हैदराबादमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.