अन्न हे पूर्ण ब्रह्म (भाग-८) - फलाहाराचे नियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


food_1  H x W:
 


श्रावण सुरू झाला की, विविध व्रत-वैकल्ये सुरू होतात. घरांतील वृद्धांमध्ये उपवासाचे प्रमाण वाढते आणि विविध उपवासांमध्ये फलाहार हा प्रामुख्याने केला जातो. नैवेद्यासाठीदेखील फळे वापरली जातात. आयुर्वेदशास्त्रानुसार जसे अन्नग्रहणाचे काही नियम आहेत, त्याचप्रमाणे फलाहाराचेही आहेतच. त्याबद्दल आज जाणून घेऊया...


फळे मुख्यतः चवीला गोड किंवा आंबट असतात. काही रसाळ, तर मऊ गरयुक्त असतात. फळे सालासकट किंवा साल काढून खाल्ली जातात. बहुतांशी फळे पिकल्यावरच खाण्यायोग्य होतात. पण, फळे शिजवून खाणे मात्र क्वचितच (अपवाद वगळता) केले जाते. आयुर्वेदशास्त्रात गोड चव ही पचायला जड सांगितलेली आहे. शरीराचे त्वरित पोषण करणारे, मनाला प्रसन्न (आल्हाददायी) जाणवणारे असे असते. शरीराचे स्नेहन करते आणि सप्त धातूंना बळ देते. मधुर रस सर्व मनुष्यजातीला आजन्म सात्म्य आहे, असे चरकसंहितेत लिहिले आहे. तसेच बाल्यावस्थेत, वृद्धावस्थेत प्रशस्त सांगितले आहे. वर्ण, केस, इंद्रिय व ओज यांचे वर्धन करणारे व स्तन्यनिर्मितीत उपयोगी असे मधुर रसाचे वर्णन व गुणधर्म आहेत. पण, जेवढे उपयोगी तसेच अतिसेवनाचे त्रासदायकही ठरते. अतिउपयोग केल्याने शरीरात कफ व मेद साठून राहतो. त्यांची वाढ होते. अग्निमांद्य, स्थौल्य, गंडमाला, अर्बुद (गाठी/ट्युमर) इ. उद्भवू शकतात. याचप्रमाणे आंबट रसाचेही वर्णन शास्त्रात केले आहे. आंबट खाल्ल्याने डोळे व भुवया आकुंचित होतात. (चिंच खाल्ल्यावर जसे होते तसे) शरीरात, दातांमध्ये व रोमांमध्ये (शरीरावरील केसांना ‘रोम’ असे म्हणतात) हर्षणे, शहारणे होते. आंबट चवीच्या रसामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. अन्न नीट पचते, अन्नामध्ये रुची उत्पन्न होते. शरीरास स्निग्धता (मधुर रसापेक्षा कमी) मिळते आणि हृदयास हितकर आहे. शरीराचे पोषण होते आणि क्लिन्नता, ओलावा निर्माण होतो. (या गुणधर्मामुळे, शरीरावर वाहती जखम असल्यास आंबट व मीठ वर्ज्य सांगितले जाते, अन्यथा जखम चिखळू शकते.)


 
आंबट चवीचे पदार्थ जर अधिक खाल्ले तर चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, शरीरावर विविध पित्तजन्य विकृती उत्पन्न होणे. जसे- विस्फोट (पूयुक्त फोड), शोफ (सूज), विसर्प (नागीण), पांडुता (Anamia), सतत तहान लागणे, ताप येणे इ. तसेच शरीरावर कंड (तीव्र स्वरुपाची) येणेही घडते. अशा लक्षणांचे उद्भवण्याचे कारण जर आहारीय द्रव्य असेल, तर पथ्यसेवन फक्त केल्यानेही आराम पडतो. पण, कारण विचारात न घेता केवळ लक्षणांच्या आधारे औषधी चिकित्सा जर केली, तर वर्षानुवर्षे (Vertigo, Urticaria) इ. त्रासांसाठी औषधे घ्यावी लागतात. फलाहार कधी करावा, यावर शास्त्रात खालीलप्रमाणे नियम सांगितलेले आहेत. फळे खाताना एका वेळेस एकच प्रकारची खावीत. (गोड, आंबट अशी सर्व एकत्र खाऊ नयेत.) मधल्या भुकेला फळे खावीत. खूप सकाळी किंवा सायंकाळनंतर फळे खाणे टाळावे. फळे स्वच्छ धुवून, पुसून, ज्यांची साले खाल्ली जातात, अशा फळांची सालं स्वच्छ धुवून मगच खावीत. सफरचंदासारख्या फळांच्या सालीवर मेणासारखा जर थर जाणवला (टिकण्यासाठी, फ्रेश दिसण्यासाठी सफरचंदावर मेणाचा थर लावतात) तर हे फळ दोन-तीन मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये ठेवावे. मेण वितळून, निघून जाते व फळ खाण्यास योग्य होते. फळे सहसा अख्खी खावीत, ज्याचे साल खाता येते, त्यांची साले खावीत. त्यात फायबर तर आहेच, पण त्याचबरोबर सालीतही विविध पोषकांश असतात. फळांचे रस घेताना, हा चोथा म्हणून सगळा सकस भाग टाकून दिला जातो व फळाच्या रसातून अतिरिक्त साखरही खूप प्यायली जाते. तेव्हा फळे अख्खी खावीत. रस घेणे टाळावे. फ्रूट ज्यूस घ्यायचा झाल्यास थोड्या प्रमाणात, बर्फ न घालता घ्यावा. आंबट आणि गोड फळे एकत्र करून खाऊ नयेत.


 
फळे खाताना ती ‘रूम ट्रेम्प्रेचर’वर असताना खावीत, फ्रिजमधली थंड नाहीत. असे खाल्ल्यास कफाचे त्रास उद्भवू शकतात. त्याचबरोबर अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे) हे लक्षणही उत्पन्न होते. फळांवर मीठ, चाट मसाला घालून खाऊ नयेत. पेरूसारख्या फळावर तिखट-मीठ घालून खाणे हा एक अपवाद आहे. कारण, पेरूने कफ अतिशय वाढतो आणि तसे होऊ नये म्हणून मीठ व तिखट त्यावर थोडे भुरभुरून खाल्ले जाते. पण, हल्ली संत्रे-सफरचंद व अन्य फळांवरही चाट मसाला, मीठ-तिखट घालून खाल्ले जाते. हे चुकीचे आहे. फळे खाताना ती दुधातून खाऊ नयेत. मिल्कशेक पिणे हे शरीरास हितकर नाही. आंबट आणि दूध एकत्र केल्याने दूध नासते. तसेच फळ आणि दूध एकत्र खाल्ल्याने होते. विविध त्वचाविकार आणि तक्रारींमध्ये फळांचा उलटा-सुलटा वापर हे कारण बघायला मिळते.


 
हे सगळं झालं- कसं खाऊ नये. आता बघूयात मग फळे कशी खावीत ते. फळे सहसा पिकल्यावर खावीत. कच्च्या फळांमध्ये तुरट-आंबट चिकयुक्त पदार्थ असू शकतो. याने पोटदुखी वा अन्य तक्रारी उद्भवू शकतात. झाडांवर पिकलेले फळ खाण्यास व आरोग्यास उत्तम असते. पण, शहरी जीवनात तसे मिळणे शक्य होत नाही. अशा वेळेस कोल्ड स्टोअरेज, एसी शॉप्स, मॉलमधून विकत न घेता लोकल दुकानांतून घ्यावे. तिथे ताजे मिळण्याची शक्यता अधिक आहे. एकावेळेस एकच प्रकारचे फळ, स्वच्छ धुवून जे सालीसकट खाता येईल, ते सालीसकट खावे. दुपारच्या ११ वाजताच्या भुकेवेळी किंवा सायंकाळी ४-५ वाजता भुकेवेळी फळ खावे. सर्दी असतेवेळी गोड चवीची फळे टाळावीत. तसेच पित्ताचा त्रास असताना आंबट फळे खाऊ नयेत. लोकल (स्थानिक) अन्न व फळे शरीराला आजन्म सात्म्य असतात. म्हणजे, त्यांचा शरीराला क्वचितच त्रास होतो. अशी धान्ये, फळे शरीर पचवू शकते, जिरवू शकते. म्हणून एक्झॉटिक फळांच्या मागे लागू नये. तसेच सुका मेवा अतिप्रमाणात खाणे टाळावे. मूठ-मूठ बदाम, अक्रोड खाऊ नये. ज्या प्रदेशात ताजी फळे, धान्ये बारा महिने उपलब्ध होत नाहीत, अशा प्रदेशात सुका मेवा अधिक खावा, तो उपयोगी आहे. जिथे ऊन-वारा-थंडी हे सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे, अशा प्रदेशात सुकामेवा खावा. पण, जिथे ताजी फळे उपलब्ध आहेत, तिथे ताजी फळेच प्रामुख्याने खावीत. पण, अर्थात नियमांचे पालन करून. (क्रमशः)

 
@@AUTHORINFO_V1@@