२०१७साली ‘फेणे एज्युकेशन’ संस्था सुरु झाली ती अवघ्या १० विद्यार्थ्यांनिशी. हे १०विद्यार्थी आणि खासगी शिकवणीचे अन्य विद्यार्थी असे एकूण ५० विद्यार्थी पहिल्या वर्षी अनिरुद्ध सरांकडे शिक्षण घेत होते. गेल्या चार वर्षांत २५०हून अधिक विद्यार्थ्यांना या संस्थेने घडविले. निव्वळ संख्यात्मक न राहता, दर्जात्मक वाढीवर लक्ष देण्याचे अनिरुद्ध सरांनी सुरुवातीपासूनच ठरविले. त्यामुळे मोजक्या विद्यार्थ्यांनाच या संस्थेत प्रवेश दिला जातो.
महाराष्ट्राला जशी साधु-संतांची थोर परंपरा आहे, तशीच शिक्षणतज्ज्ञांचीसुद्धा आहे. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा भारतातली मुलींची शाळा सुरु केली. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ही परंपरा विस्तारली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही शिक्षणगंगा बहुजनांच्या घरात नेली. त्याचा वटवृक्ष केला. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विद्वानांची नावे जरी घेतली तरी नतमस्तक व्हायला होते. सानेगुरुजींनी बालसुलभ वयात शिक्षणाच गोडी निर्माण केली. अशा या शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असणार्या महाराष्ट्रात वाणिज्य शाखेतल्या मुलांसाठी उच्च शिक्षणामध्ये काहीतरी उत्तम करिअर करता यावे, याकरिता एक तरुण झटतोय. स्वत: उच्चशिक्षित आणि मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला हा तरुण इतर मराठी तरुणांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याची चळवळ उभारत आहे. हा तरुण म्हणजे, विलेपार्ल्यातील ‘फेणे एज्युकेशन’चे अनिरुद्ध फेणे होय.
विलेपार्ले म्हणजे खर्या अर्थाने मुंबईतील सांस्कृतिक उपनगरच. मराठी सिनेमा-नाट्यसृष्टीतील बहुतांश कलाकार याच परिसरातले. इथे फिरताना काही अंशी पुण्यात फिरत असल्याचा भास होतो. इतकं पुण्याशी या उपनगराचं साधर्म्य आहे. याच पार्ल्यात भारत फेणे आणि नीता फेणे हे दाम्पत्य राहते. भारत फेणे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत, तर नीता फेणे या शासकीय कर्मचारी आहेत. या दाम्पत्यांना दोन मुले. मोठा अनिरुद्ध तर धाकटा अनिकेत. अनिरुद्धचं शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात (इंग्रजी माध्यम) झालं. पुढे जवळच्याच एम. एल. डहाणूकर महाविद्यालयातून अनिरुद्धने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर नोकरी किंवा उच्च शिक्षण हा पर्याय होता. अनिरुद्धने सनदी लेखापाल होण्याचा निर्णय घेतला. ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) या प्रसिद्ध संस्थेतून त्याने सनदी लेखापालची पदवी प्राप्त केली.
सीए झाल्यानंतर अनिरुद्ध एका खासगी क्लासेसमध्ये ‘बँकिंग’ विषय शिकवू लागला. त्यावेळेस त्याने पाहिले की, वाणिज्य शाखेत असे अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यामध्ये उच्चशिक्षण घेऊन चांगलं करिअर घडविता येऊ शकते. परंतु, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विशेषत: मराठी तरुणांना/विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन करणारे वा शिकवणारे कुणीच नाही. आज सनदी लेखापाल या क्षेत्रात मराठी टक्का कमी आहे. पहिलं कारण म्हणजे, मुलांना वाटतं यात गणित आहे. दुसरं कारण म्हणजे, शाळेत जसा आपण अभ्यास करतो तीच पद्धत अंगवळणी पडल्याने अपेक्षित यश मिळत नाही. हे उमजल्यावर अनिरुद्धने वाणिज्य शाखेतील सर्वोत्तम शिक्षण तरुण पिढीला देण्याचा चंग बांधला. त्यातून आकारास आली ‘फेणे एज्युकेशन’ ही संस्था. खरंतर अनिरुद्धला व्यवसायाचं बाळकडू त्याचे आजोबा अरविंद फेणे यांच्याकडून मिळालेलं. त्यांनी अनेक उद्योग-व्यवसाय केले. त्याचबरोबर अनिरुद्धचे काका दौलत फेणे हे गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित एक कंपनी चालवायचे. अनिरुद्ध त्यांच्यासोबत बारावीला असल्यापासून व्यवसायाचे धडे घेत होता. म्युच्युअल फंड, इन्शुरन्ससारख्या विषयात तो पारंगत झाला. पुढे त्याने वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ‘फेणे इंव्हेस्टमेंट्स’ नावाची कंपनीदेखील सुरु केली होती. पण, सनदी लेखापाल होण्याचे ठरल्यानंतर त्याने आपला मोर्चा शिक्षणाकडे वळविला.
२०१७साली ‘फेणे एज्युकेशन’ संस्था सुरु झाली ती अवघ्या १० विद्यार्थ्यांनिशी. हे १० विद्यार्थी आणि खासगी शिकवणीचे अन्य विद्यार्थी असे एकूण ५०विद्यार्थी पहिल्या वर्षी अनिरुद्ध सरांकडे शिक्षण घेत होते. गेल्या चार वर्षांत २५०हून अधिक विद्यार्थ्यांना या संस्थेने घडविले. निव्वळ संख्यात्मक न राहता, दर्जात्मक वाढीवर लक्ष देण्याचे अनिरुद्ध सरांनी सुरुवातीपासूनच ठरविले. त्यामुळे मोजक्या विद्यार्थ्यांनाच या संस्थेत प्रवेश दिला जातो. त्यांच्या शिक्षणावर प्रचंड मेहनत घेतली जाते. २०हून अधिक व्यावसायिक तज्ज्ञ मंडळी आपले ज्ञान या मुलांना देतात. परिणामी, ‘फेणे एज्युकेशन’चा निकाल हा ६० टक्क्यांहून अधिक आहे. सीए, सीएस अशा व्यावसायिक क्षेत्रामध्ये हे ६०टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण उच्च दर्जाचे मानले जाते. ‘फेणे एज्युकेशन’ तीन वर्षांपासून हा दर्जा राखते. ऑनलाईन शिक्षणप्रणाली भविष्यात प्रभावीरित्या राबविण्याचा ‘फेणे एज्युकेशन’चा मानस आहे. तसेच वाणिज्य शाखेतील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा ‘फेणे एज्युकेशन’चा प्रयत्न आहे. “गणित विषयाची अनामिक भीती बाळगून कितीतरी मुले सनदी लेखापाल होण्याचे टाळतात. मात्र, सनदी लेखापाल होण्यासाठी तुमचं गणित चांगलं नसेल तरी काहीही फरक पडत नाही. गुजराती, मारवाडी भाषिक बांधव या क्षेत्रात जास्त यशस्वी दिसतात. कारण, ते व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक असणार्या विषयांवरच लक्ष केंद्रित करतात. याउलट मराठी विद्यार्थी शाळेत असल्याप्रमाणे सर्वच विषयांकडे लक्ष देतात आणि मग सगळं अवघड होऊन जाते. मराठी मुलांनी ‘बिझनेस माईंड’ विकसित केला पाहिजे. त्यासाठी योग्य रणनीती आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मराठी तरुणांनी या क्षेत्रात मोठ्या संख्येने यावे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, ” असे अनिरुद्ध फेणे म्हणतात.
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ‘फेणे एज्युकेशन’ निरनिराळे उपक्रम राबविते. लोकमान्य सेवा संघ, पार्ले यांसारख्या अनेक सामाजिक संस्थेसोबत ते विविध कार्यक्रम करतात. विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम, अंमली पदार्थविरोधी कार्यक्रम असे चाकोरीबाह्य कार्यक्रम ‘फेणे एज्युकेशन’ करते. या आपल्या संपूर्ण व्यावसायिक प्रवासात आपली आई- नीता फेणे, वडील- भारत फेणे, भाऊ अनिकेत आणि पत्नी रसिका जोशी-फेणे यांचे मोलाचं सहकार्य असल्याचे अनिरुद्ध फेणे प्रांजळपणे कबूल करतात. वाणिज्य शाखेतील विशेषत: ‘सनदी लेखापाल’ या क्षेत्रातला मराठी टक्का जो घसरलेला आहे, तो सावरण्याची गरज सध्या आहे. अनिरुद्ध फेणेंच्या ‘फेणे एज्युकेशन’सारखी संस्था ही गरज नक्कीच पूर्ण करेल, हा विश्वास वाटतो.