वापरलेलाच मास्क तुमच्या चेहर्‍यावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020   
Total Views |

N 95 mask_1  H



कोरोना महामारीमुळे मास्कचा वापर जगभरात बंधनकारक झाला. कारण, हा मास्क वापरल्याने कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. पण, या महामारीसह जगताना आणखी एक समस्या डोके वर काढत असल्याचे दिसते. ती समस्या म्हणजे, इंडोनेशियात चक्क कचर्‍यात फेकलेले मास्क पुन्हा विक्रीसाठी पाठवण्यात आले.


कोरोनापूर्वीच्या जगात प्रदूषण असले तरी लोक मास्क किंवा रुमाल वापरल्याविना बिनधास्त फिरत होते. चीनमध्ये कोरोना फैलावाची पहिली बातमी येऊन धडकली, तेव्हा मास्क, पीपीई किट्स, फेस शील्ड या गोष्टी भारतासाठी आणि जगासाठीही नवीन होत्या. परिस्थिती अशी होती की, मास्कचा तुटवडा बाजारात जाणवू लागला. कारण, भारतात मास्कचे उत्पादन फारसे होत नव्हते. पण, एकाएकी मास्कची मागणी प्रचंड वाढू लागली. मास्क केवळ कोरोना रुग्णानेच किंवा त्याच्या संपर्कात येणार्‍यांनीच वापरावा, असेही आवाहन सुरुवातीला करुन झाले. त्यानंतर जसससे ‘कंटेनमेंट झोन’ वाढू लागले, त्याप्रमाणे मास्कसक्ती लागू झाली. ‘एन ९५’ मास्क हे सर्वात सुरक्षित मास्क मानले जात होते. त्यामुळे बाजारातील मागणी पाहता, या मास्कचा पुन्हा तुटवडा जाणवू लागला. एका मास्कची किंमत तब्बल ४०० ते ५०० रुपयापर्यंत उसळली. मास्कच्या काळाबाजारानेही उचल खाल्ली. नुकतेच सरकारने ’एन ९५ मास्क’ हे कोरोनापासून लढण्यासाठी सुरक्षित नसल्याचे पत्रक सर्व राज्यांना पाठवले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही मास्क वापरासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. तसेच भविष्यात जसजसे कोरोनाबद्दल नवनवीन संशोधन पुढे येईल, तेव्हा तेव्हा नवनवे नियम, उपकरणे बाजारात येतील. जे ‘एन ९५’ मास्कबद्दल घडले, तसेच बर्‍याच गोष्टी आपल्या नकळत आरोग्यासाटी धोकादायक ठरत आहेत. उदारणार्थ, काही दिवसांपूर्वी कोरोना हा हवेने पसरणारा रोग नव्हे, असा दावा करणार्‍या शास्त्रज्ञांनी हा आता कोरोनाचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.




अशातच मास्क किंवा अन्य वैद्यकीय कचर्‍यातील वस्तू पुन्हा बाजारात विकल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. इंडोनेशियातल्या या प्रकाराचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आणि त्यानंतर चिंता व्यक्त होऊ लागली. मेडिकलद्वारे उपलब्ध झालेला मास्क पुन्हा वापरात येऊ लागला, तर कोरोनाचा धोका दुपटीने-तिपटीने वाढू शकतो, असा तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला. त्यानंतर बाजारातून आणलेला मास्क जसाच्या तसा वापरणे योग्य आहे का, याबद्दल अनेकांच्या मनात शंकांनी घर केले. यापूर्वीच सरकारने घरगुती मास्क किंवा स्वदेशी मास्क वापरण्याचे आवाहनही केले होते. कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, हे जरी आपण शिकलो असलो तरी ज्या निसर्गाने इतका मोठा धडा शिकवला, त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करून बसलो आहोत. २०२०या वर्षात सर्वाधिक प्लास्टिक आणि जैविक कचरा निर्माण झाल्याची आकडेवारी उघड झाली आहे. हा कचरा पुन्हा उलटून आपल्याच अंगावर येणार, हे मात्र माणूस सोयीस्कररित्या विसरलेला दिसतो. मास्क असो वा कोरोनाशी लढण्यासाठी वापरात येणारी कुठलीही गोष्ट, त्यात प्लास्टिकचा समावेश आज प्रत्येक ठिकाणी आहे.




दिवसा दोनदोनदा स्वच्छता होणार्‍या रस्त्यांवर अजूनही मास्क विखुरलेले आढळतात, तर जगभरातील समुद्रांत लाखो टन वाहून जाणार्‍या कचर्‍याचे काय? तेथील जैवविविधतेचे काय? कोरोनाने संपूर्ण मानवजातीला निसर्ग हा त्याचा मालकी हक्क नसून दैवाची देणगी आहे, ही शिकवणूकच दिली आहे. जे मास्क आपण रस्त्यावर किंवा कचर्‍यात फेकून देतो, त्या मास्कमुळे मानवासह अनेक जीव धोक्यात येऊ शकतात, हे आपण सोयीने विसरतो. वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडे ना कुठले उत्तर आहे ना सर्वसामान्यांकडे... . इंडोनेशियातल्या प्रकाराने सर्वांचे डोळे उघडले आहेत. तेव्हा, स्वतःच वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही, तर पुन्हा तेच मास्क तुम्हालाच विकले जातील, असा दिवस भारतातही उजाडण्याची भीती नाकारता येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@