मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होण्यासाठी १० एमएलडी पाण्याची पाण्याची आवश्यकता आहे. पण पावसाने दडी मारली तर पाणीपुरवठ्याचे काय, याची चिंता आता भेडसावू लागली आहे.
तलावक्षेत्रात पावसाने दमदार सुरु केल्याने तलावात पाणीसाठा वेगाने वाढत होता. मात्र सध्या पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव मागील वर्षीच्या तुलनेत फक्त तीस टक्केच भरले आहेत. त्यामुळे मुंबईला आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तुळशी आणि विहार हे तलाव भरून वाहण्याच्या पातळीपर्यंत आले आहेत. एक ते दोन दिवसांच्या जोरदार पावसात हे तलाव ओसंडून वाहू शकतील. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या तुलनेत हे तलाव खूप लहान असून त्यांची पाणीसाठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे भातसासह अन्य पाच तलाव पूर्ण भरणे आवश्यक आहे.
पालिकेने दिलेल्या तलावातील पाणी पातळीनुसार सर्व तलावांमध्ये सोमवारी सुमारे चार लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सर्व तलाव पूर्ण भरण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. सध्याच्या तलावातील पाणी साठ्यानुसार आणखी तब्बल दहा लाख पन्नास हजार दशलक्ष लिटर कमी पाणी आहे. मागील वर्षी जुलैमध्ये तुळशी, तानसा, मोडकसागर, विहार हे चार तलाव भरले होते. मागील वर्षी तुळशी तलाव १२ जुलै, तानसा २५ जुलै मोडकसागर २६ जुलै, विहार ३१ जुलै, मध्य वैतरणा २५ ऑगस्ट, अप्पर वैतरण ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरून वाहिले होते तर भातसा पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. या तुलनेत यंदा अद्याप एकही तलाव भरलेला नाही. जुलैमध्ये व ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ५० टक्के तलाव भरल्यास तसेच एक ऑक्टोबर रोजी तलाव शंभर टक्के भरलेले असणे आवश्यक आहे.
जुलैमधील एकूण पाणीसाठा
सन २०२० : ३,९७,६०७ दशलक्ष लिटर
सन २०१९ : ७,५१,१९८ दशलक्ष लिटर
सन २०१८ : ११,२३,३७७ दशलक्ष लिटर