प्रतिभा, अभिरुची व परिश्रम घेणार्यांनाच संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. अशाच एका संगीतातील जादूगार आशुतोष मालती विद्याधर वाघमारे या कलाकाराविषयी जाणून घेऊया.
ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच जन्माला येते ते संगीत. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणार्यांनाच संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. अशाच एका संगीतातील जादूगार आशुतोष मालती विद्याधर वाघमारे या कलाकाराविषयी जाणून घेऊया. आशुतोषचे वडील रेल्वेत सेवा देत असल्याने त्याचे सगळे बालपण कुर्ला रेल्वे कॉलनी येथे तर शालेय शिक्षण शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे झाले. आशुतोषच्या घरातच कला आणि साहित्याचे वातावरण होते, त्यामुळे आपसूकच त्याला या क्षेत्रात रस निर्माण झाला. आशुतोषच्या आजोबांनी ते सेवानिवृत्त झाल्यावर दादर येथील हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडून हौस म्हणून एक संवादिनी (हार्मोनियम) विकत घेतली होती. आशुतोष सांगतो, “आजोबा म्हणाले होते, एक दिवस जरी माझ्या नातवंडांनी संवादिनी वाजवली तरी माझे पैसे वसूल होतील.” याच संवादिनीवर भावाने संगीताचे धडे गिरवले. त्याचेच अनुकरण करत आशुतोषदेखील हातात मिळेल त्या साधनातून संगीतनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असे. ते पाहून आईने आशुतोषला तबला शिकण्यास प्रोत्साहन दिले. याचदरम्यान शाळेत अनिल देशपांडे या संगीत शिक्षकांनी आशुतोषचा आवाज चांगला असल्यामुळे त्याची गाण्याच्या समूहात निवड केली. यामुळे शाळा आणि घर हे आशुतोषच्या एकूण संगीतिक प्रवासाचे उगमस्थान ठरले. तो सांगतो, “करिअर वगैरे काय असतं हे माहीत नसतानाच्या वयातच आपण हेच करायचं हा निर्णय कुठेतरी मनात होता कारण संगीत आलं की बेधुंद व्हायचो मी माझ्याच विश्वात.”
बेडेकर कॉलेजमध्ये प्रवेश घेताच तिथल्या वातावरणामुळे तो नाटकाकडे वळला. गिरीश कर्नाड यांच्या ‘नागमंडल’ या नाटकाचे दिग्दर्शक दीपक भागवत यांना नाटकातील काही ओळी संगीतबद्ध करून हव्या होत्या. आशुतोषने काही वेळातच त्या संगीतबद्ध करून दिल्या. येथेच आपण हे ही करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला आणि त्या दृष्टीने त्याने अभ्यास सुरू केला. दरम्यान, त्याचे कुटुंब डोंबिवलीमध्ये स्थिरावले. तेथे पं. मधुकर गजानन जोशी यांचा सहवास त्याला लाभला. येथे त्याच्या गाण्याचा सराव सुरु झाला, हा सराव गायक म्हणून नव्हे तर संगीतकार म्हणून होता. येथे तो केवळ शिकविण्याची पद्धत अभ्यासायचा. एखादी बंदिश कशी समजावून सांगतात याकडेच त्याचे लक्ष असायचे. यातून संगीतकार म्हणून गायकाला आपली धून कशी समजावून सांगता आली पाहिजे याची शिकवण त्याला मिळाली. पुढे ‘भजनभूषण’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नलिनी जोशी यांच्या भजन मंडळात साथसंगत देत त्यांच्या भजनाच्या चालीने संगीतकारांची दृष्टी मिळाली. अनेक दिग्गजांच्या मैफिली, पुण्यातील ’सवाई गंधर्व’ कार्यक्रम यातून त्याचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का झाला. यालाच पूरक अशा लोककलेचा अभ्यासदेखील त्याने सुरु केला.
ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि गायिका-अभिनेत्री फैय्याजजी यांच्यासोबत तो अनेक कार्यक्रम करत असे. कवी म्हात्रे यांच्यामुळे साहित्य विश्वातील दिग्गज मान्यवर व्यक्ती जसे मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर, नलेश पाटील, संभाजी भगत यांना अगदी जवळून ऐकता व पाहता आल्याचे तो आवर्जून सांगतो. तो म्हणतो, घरातील साहित्यिक गोडीमुळे साहित्याविषयी अधिक जवळीक निर्माण झाली. संगीतकाराला साहित्यदेखील कळले पाहिजे हे जाणवू लागले. कविता समजली पाहिजे, शब्दांचे अर्थ समजले पाहिजेत तरच अर्थपूर्ण धून तयार होऊ शकेल हा शोध या शिकण्याच्या प्रक्रियेत लागला. कोणालाही थेट गुरू न केल्यामुळे या प्रवासातील सर्व उत्तरे माझी मलाच शोधावी लागली. स्वतःची मत स्वतःच खोडल्यामुळे आपल्याला अजून खूप शिकायचे आहे आणि खूप ज्ञान मिळवायचे ही भावना कायम राहते. साहित्यामुळे समाजभान राहील. आपण समाजाचेही देणे लागतो या भावनेने सामाजिक उपक्रमात सहभाग वाढला.
पुढे त्याने ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे दिग्दर्शित ’धिक ताम’ या नाटकाचा संगीतकार म्हणून काम केले. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहोल्ला’ या नाटकाचे संगीत संयोजन केल्यामुळे सामाजिक विषय घेऊन समाज प्रबोधन करणार्या कलाकृतीचा भाग होता आल्याचा त्याला विशेष आनंद आहे. सध्या ‘सुबक’ निर्मित ‘तिसरे बादशाह हम’ तसेच ‘दहा बाय दहा’, ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’, ‘सायली द वंडर गर्ल’ या नाटकांसाठी तो काम करतो आहे. ‘प्लॅटफॉर्म नंबर ९’, ‘मी लाडाची मैना तुमची’, ‘धिक ताम’, ‘हे राम’, ‘एका धोतराची गोष्ट’, ‘तुका म्हणे’, ‘घटोत्कच’ अशा सहा व्यावसायिक, २५ प्रायोगिक नाटकांसाठी संगीतकार म्हणून त्याने काम केले. २०१९च्या ‘झी मराठी नाट्यगौरव’ मध्ये प्रायोगिक विभागात ‘तुका म्हणे’ या नाटकासाठी आशुतोषला सर्वोत्कृष्ट संगीतकार या सन्मानाने गौरविण्यात आले. या नाटकांसोबतच त्याने पाच मराठी चित्रपटांचेदेखील संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यापैकी राजकुमार तांगडे दिग्दर्शित ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवर आधारित असलेला ‘चिवटी’ हा चित्रपट जगातील नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला. तसेच एप्रिलमध्ये भारतात प्रदर्शित होणार होता मात्र कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे तारीख पुढे ढकलण्यात आली.
तो म्हणतो, “ ‘लॉकडाऊन’च्या काळात आम्ही ‘अभिनय कल्याण’ आणि अभिनेते अभिजित झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्वारंटाईन थिएटर’ नावाचा उपक्रम घेऊन आलो होतो. या काळात नैराश्यापासून दूर राहण्याचा अभिनय प्रयत्न यातून केला. सध्या कलाकरांसमोर मोठी आर्थिक संकटे असल्याचेही तो सांगतो. विशेषतः मधल्या फळीतील कलाकारांसाठी हा काळ अधिक संघर्षाचा आहे व त्यातूनही मार्ग निघेल अशी आशा त्याला आहे. आजूबाजूच्या घटनांमुळे अस्वस्थता वाढतेय पण त्यातून कलाच तारते असेदेखील त्याचे मानने आहे. कलाकार असण्यासोबतच एक चांगला माणूस म्हणूनदेखील जगता यावे यासाठी सतत कृतिशील असणारा आशुतोष नेहमी वेगवेगळे विषय घेत आपल्या कलाकृतीतून व्यक्त होत राहीन,” असा विश्वासदेखील व्यक्त करतो.