१९२६ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या एका उदासवाण्या दिवशी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलेल्या कृष्णकांत अत्रीला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत ही वाटचाल स्वतः पंडित कृष्णकांतनाही आश्चर्यकारक, पण आनंददायी वाटते.
‘सैन्ये पोटावर चालतात,’ असं नेपोलियनचं प्रसिद्ध वाक्य आहे. व्यावसायिक सैन्याच्या बाबतीत ते खरचं आहे आणि सैन्याचाच कशाला, कोणत्याही नागरी व्यावसायिकाच्या बाबतीतही वस्तुस्थिती तीच आहे. मनुष्य कोणताही उद्योग, व्यवसाय, नोकरी करतो ती मुख्यत: उदरभरणासाठीच. ते नीट होत नसेल, तर मनुष्य एकतर तो व्यवसाय सोडून देतो किंवा अधिक चांगल्या व्यवसायाच्या शोधात राहतो. अर्थात यालाही सन्माननीय अपवाद आहेत, देशासाठी, समाजासाठी दारिद्य्र पत्करुन खोर्याने पैसा खेचण्याची क्षमता असतानाही; मध्यम आर्थिक स्थिती पत्करुन संपूर्ण आयुष्य, सर्व शक्ती-बुद्धी लोकांसाठी कामी लावणारे महापुरुष आपल्याकडे तर अगणित आहेतच, पण अन्यत्रही आहेत. हिंदवी स्वराज्याच्या सुरुवातीच्या कालखंडातले सैनिक हे पगारी सैनिक नव्हते, आपपला व्यवसाय, शेती सांभाळून स्वराज्यासाठी लढणारे ते कार्यकर्ते होते. परंतु, ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. जसजसा स्वराज्याचा विस्तार वाढत गेला, तसतसे कायमस्वरुपी सैन्य निर्माण करावे लागले. पण, तरीही त्याचं स्वरुप ‘पगारी सैन्य’ असं नसून ‘हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक’ असंच होतं आणि म्हणूनच मोगल सेनापती पैशांच्या गोणी उघडून सगळ्यांना आमंत्रण करत होते, तरी हे बहादूर मावळे शिवरायांना छत्रपती संभाजीराजांना आणि राजाराम महाराजांनाच धरुन राहिले.
पण, मावळ्यांचा हा कित्ता भारताच्या अन्य प्रांतातल्या लढाऊ जमातींनी गिरवला नाही. उदाहरणार्थ, उत्तर भारतातील गोसावी जमात आणि कर्नाटकातील गारदी जमात. या दोन्ही जमाती भलत्याच तिखट लढवय्या होत्या. पण, त्या पूर्णपणे व्यावसायिक होत्या. जो जास्त पगार देईल, त्यांच्या बाजूने लढायचं, हा त्यांचा व्यवहार होता. त्यामुळे भाऊसाहेब पेशव्यांविरुद्ध अहमदशहा अब्दालीच्या पक्षातून लढताना गोसाव्यांना कसलीही खंत वाटली नाही. हैद्राबादच्या निजामाच्या पक्षातून मराठ्यांविरुद्ध लढताना गारधांनाही कसली खंत वाटली नाही. पुढे मराठे जास्त पगार देतात, म्हणून गारदी निजामाला सोडून मराठ्यांकडे आले, तिथेही काका राघोबा पैसे देतो म्हणून पुतण्या नारायणरावाचा खून पाडण्यात त्यांना कसलही संकोच वाटला नाही. इंग्रजांनी नेमका हाच मुद्दा पकडला. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्यातले सैनिक कोण होते? इंग्रजांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सर्वात प्रथम बंगालं प्रांत जिंकला. बंगाल हा मोगल साम्राज्याचा एक सुभा होता. अत्यंत सुपीक आणि म्हणून दरवर्षाला प्रचंड महसूल देणार्या बंगाल सुभ्यात त्यावेळी आजचा भारताचा पश्चिम बंगाल प्रांत, बांगलादेश, ओरिसाप्रांत, आसामसह ईशान्येतली सर्व सात राज्यं आणि बिहार प्रांतांचे काही जिल्हे एवढा अवाढ्य मुलुख मोडत होता. हा भाग घशात घातल्यावर इंग्रजांनी भारतातलं त्यांचं पहिलं सैन्यदल उभारलं. तीच प्रसिद्ध ‘बेंगॉल आर्मी.’ मात्र, या सैन्यात मुख्य भरणा होता तो उत्तर प्रदेश आणि बिहारमधील्या हिंदू आणि मुसलमानांचा म्हणजे प्रचलित भाषेत ज्यांना ‘भय्ये लोक’ म्हटलं जातं त्यांचा आणि या भय्ये लोकांच्या जोरावर इंग्रजांनी मराठे, राजपूत, शीख, जाट अशा सर्व भारतीय लढाऊ जमातींचा पराभव केला.
त्यावेळीसुद्धा इंग्रजांच्या सैन्यात पुरोहित असत. इंग्रज अधिकारी आणि ‘सोजीर’ (‘सोल्जर’चा अपभ्रंश) यांच्यासाठी ख्रिश्चन पाद्री, हिंदू सैनिकांसाठी पंडितजी आणि मुसलमान सैनिकांसाठी मौलावी ही पद्धत इंग्रजांनी नव्याने चालू केली असं नाही, ती युरोपात प्रचलित होतीच. सम्राट शार्लमेन हा युरोपच्या ख्रिश्चन कालखंडातला पहिला महान राजा. इ. स. ७४२ ते इ. स. ८१४ हा त्याचा कालखंड. मुळात तो फ्रान्सचा किंवा ‘फ्रँक’ या नावाने ओळखल्या जाणार्या लोकांचा राजा होता. पुढे त्याने जर्मनी, इटली व स्पेनसह जवळजवळ संपूर्ण पश्चिम युरोप जिंकला. सम्राट शार्लमेन हा जसा रणांगणात पराक्रमी होता, तसाच तो उत्तम प्रशासक आणि अतिशय शहाणा असा राजा होता. त्यामुळे युरोपातल्या सर्वच देशांचा तो ‘आपला’ वाटतो. इंग्रज त्याला ‘चार्ल्स-द-ग्रेट’ म्हणतात, तर फ्रेंच त्याला ‘चार्ल्स-ल-ग्रांद’ म्हणतात. लॅटिन भाषिक देश त्याला ‘कॅरोलस मॅग्नस’ म्हणतात, तर जर्मन त्याला ‘कार्ल डर ग्रॉस’ म्हणतात. या शार्लमेनने चर्चमधल्या पुरोहितांना राजवाड्यात पाचारण केलं. त्यांना ‘चॅपलेन’ असं म्हणतात. मुळात ‘चॅपल’ म्हणजे छोटं प्रार्थनागृह. तेथील प्रार्थना चालवणारा तो ‘चॅपलेन.’ आपल्याकडे ज्याप्रमाणे दैनंदिन देवपूजा, सत्यनारायण किंवा गणपतीची पूजा इत्यादी जाणणारे भटजी वेगळे, लग्न, मुंज, वास्तुशांत, श्रद्धादि विधी जाणणारे वेगळे, दहा ग्रंथांचा अभ्यास केलेले दशग्रंथी वेगळे; षड्शास्त्रे अध्ययन केलेले शास्त्री वेगळे आणि यज्ञयाग विधी जाणणारे याज्ञिक आणखी वेगळे; तसाच तिथला प्रकार आहे. ‘चॅपलेन’ म्हणजे धर्माच्या प्राथमिक गोष्टी जाणणारा पाद्री. शार्लमेनने प्रत्येक क्षेत्रातल्या सर्व बाबी धार्मिकदृष्ट्या व्हाव्यात म्हणून सर्वच ठिकाणी ‘चॅपलेन’ नेमले. तसेच ते सैन्यातही आले. सैनिकांना धार्मिक बाबतीत सल्ला देणं, सैन्य शिबिरातली रोजची प्रार्थना नीट चालवणं, हे त्याचं काम. युरोपीय सैन्यातली ही परंपरा इंग्रजांनी भारतीय सैन्यातही आणली आणि स्वतंत्र भारताच्या सैन्यातही ती चालू आहे. प्रत्येक सैन्यछावणीत मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा, क्वचित बुद्धविहारही असतात. त्या त्या ठिकाणी ते ते पुरोहित दैनंदिन प्रार्थना चालवतात. सैनिकांची लग्नं वा इतर धार्मिक विधी करतात. प्रशासकीयदृष्ट्या हे पुरोहित इतर सर्वांप्रमाणेच सैनिक असतात. त्यांना सैन्यकवायतीत पूर्ण गणवेषात भाग घ्यावा लागतो आणि वेळ पडल्यास वापरता यायला हवं, म्हणून हत्यार चालवायलाही शिकावं लागतं. वेळोवेळी त्यांची भरती विशेष जाहिरात देऊन केली जात असते.
हे सगळं झालं भारतीय सैन्यातल्या पुरोहितांबद्दल. पण, ब्रिटनमधल्या ब्रिटिश सैन्यात हिंदू पुरोहित कसे काय? गेल्या शतकाच्या प्रारंभापासूनच भारतातले अनेक लोक ब्रिटनमध्ये स्थलांतरित होऊ लागले. भारत स्वतंत्र झाल्यावर हे प्रमाण खरंतर कमी व्हायला हवं होतं. पण, गंमत म्हणजे, इंग्रज भारतातून निघून गेल्यावर हिंदू लोक जास्तच परधार्जिणे झाले आणि आणखी जास्त प्रमाणात ब्रिटन व अमेरिकेत जाऊ लागले. १९७०-७२ च्या सुमारास आफ्रिकेत युगांडाचा इदी अमीन आणि त्याचे प्रतिस्पर्धी यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. त्याचा परिणाम म्हणजे, वर्षांनुवर्षे युगांडात स्थायिक झालेल्या हजारो हिंदू कुटुंबांना तिथून आपलं चंबूगबाळं आवरावं लागलं. विशेष म्हणजे, ते परत भारतात नाही आले, तर ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांना आश्रय मिळाला. अशा सर्व कारणांमुळे ब्रिटनमध्ये हिंदूंची लोकसंख्या भरपूर आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात ते शिरत आहेत. तसेच ते सैन्यातही शिरले आहेत. आज घटकेला ब्रिटनच्या सर्व संरक्षण दलांमध्ये मिळून ४७० हिंदू आहेत. तसेच मुसलमान, शीख आणि बौद्धही आहेत. या सर्व जमातींसाठी एक एक पुरोहित नियुक्त करण्याचा निर्णय ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने घेतला. त्यानुसार २००५ सालीच तशा नियुक्त्या करण्यात आल्या. मनदीप कौर हे शीख ग्रंथी आहेत.
सुनील करियाकारवाना हे बौद्ध भिख्खू आहेत, तर आसीम हाफीझ हे इमाम आहेत. आचार्य क्रिशन कांत अत्री हे हिंदू पुरोहित आहेत. सध्या ते ४५ वर्षांचे आहेत. हिमाचल प्रदेशच्या कौसाली या निसर्गरम्य गावातल्या एका हलवायाचे सुपुत्र असलेले पंडित क्रिशन कांत म्हणजे कृष्णकांत अत्री हे गुरुकुलात धार्मिक शिक्षण घेऊन पौरोहित्याचा व्यवसाय करत होते. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना ब्रिटनला जाण्याची संधी मिळाली. त्या वर्षी न्यूकॅसल अपॉन टाईन या गावी एक हिंदू मंदिर निर्माण झालं होतं नि तिथे दैनंदिन पूजापाठ करण्यासाठी पुजारी हवा होता. १९२६ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या एका उदासवाण्या दिवशी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलेल्या कृष्णकांत अत्रीला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. त्याच्या हातात एक साधी प्रवासी बॅग होती आणि तिच्यात वेद, भगवद्गीता आणि इतर धार्मिक विधींची पुस्तकं होती. तेव्हापासून आतापर्यंत ही वाटचाल स्वतः पंडित कृष्णकांतनाही आश्चर्यकारक, पण आनंददायी वाटते. २००५ साली ब्रिटिश सैन्यात पुरोहित म्हणून भरती होताना, मुलाखत घेणार्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता, “समजा, सैनिकाने लढायला नकार दिला, तर तुम्ही त्यांना काय सांगाल?” आता इतका झकास प्रश्न आल्यावर कृष्णकांत त्यांना भगवद्गीतेशिवाय दुसरं काय सांगणार?
आज ब्रिटिश सैन्यतुकडीतून इराक किंवा अफगाणिस्तानात जाणार्या हिंदू सैनिकांना कृष्णकांत गीता आणि महाभारतातले आवश्यक ते श्लोक, संदर्भ सांगत असतात. आश्चर्य वाटले, पण ब्रिटिश हिंदू सैनिकांमध्ये मनगटाला मारूतीचा काळा गंडा किंवा भैरवाचा लाल गंडा बांधणारे भाविक सैनिक आहेत. मनगटात असं काहीही बांधणं सैन्यशिस्तीत बसत नाही. तसंच काही सैनिक कडक शाकाहारी आहेत. ते काटे-चमचे न वापरता हाताने जेवतात. या गोष्टी त्यांच्या ब्रिटिश कमांडिंग ऑफिसर्सना विचित्र वाटतात. त्यामुळे हे सैनिक आणि त्यांचे अधिकारी यांच्यात समन्वय राखून सैनिकांच्या धार्मिक श्रद्धा अधिकार्यांना पटवून देण्याचं कामही कृष्णकांत करतात. शिवाय दैनंदिन पूजापाठ, लग्न, मुंजी, नैमित्तिक पूजा, सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कुंडल्या पाहणं वगैरे गोष्टीही त्यांना कराव्या लागतात. ब्रिटिश सैन्यात गुरखा सैनिकही भरपूर आहेत. ते घरी हिंदूच असले तरी त्यांना धार्मिक विधी त्यांच्या प्रचलित पद्धतीने व्हावेत असं वाटत असतं. म्हणून वेगळा गुरखा पुरोहित नेमण्याचा विचार सैनिकी अधिकारी करत आहेत. ती जबाबदारी त्यांनी आचार्य कृष्णकांतांवरच सोपवली आहे. गुरखा पुरोहित निवडण्यासाठी कृष्णकांत लवकरच नेपाळला जाणार आहेत. एकंदरीत, सैन्ये पोटावर चालत असली तरी, धर्म ही मानवी जीवनातील एक फार प्रभावी शक्ती आहे आणि माणसाला जगण्यासाठी अन्नाप्रमाणेच धर्माचीही गरज असतेच.