तुर्कीची नव्या ‘खलिफती’कडे वाटचाल

    14-Jul-2020   
Total Views | 137

vicharvimarsh_1 &nbs


‘हागिया सोफिया’चे मशिदीत रुपांतर करण्यामागे तुर्कीचा हेतू आर्थिक मंदी आणि कोरोनाचे संकट हाताळण्यात स्वतःला आलेल्या अपयशावरुन लोकांचे लक्ष हटवणे हा असला तरी तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही.


तुर्कीचे अध्यक्ष रसिप तय्यप एर्दोगान यांनी अध्यादेश काढून सहाव्या शतकापासून इस्तंबूल अर्थात पूर्वीच्या कॉन्स्टंटिनोपल येथे उभ्या असलेल्या हागिया सोफिया म्युझियमचे ‘अया सोफिया’ असे नामांतर करुन मशिदीत रुपांतर करण्यास मान्यता दिली. येथे २४ जुलै रोजी तिथे सार्वजनिकरित्या नमाज पढला जाणार आहे. ‘अया सोफिया’ हे जगातील सर्वात पुरातन आणि भव्य चर्चपैकी एक. चौथ्या शतकात रोमन साम्राज्याची ग्रीक पूर्व आणि लॅटिन पश्चिम अशा दोन राज्यांमध्ये विभागणी झाली. पश्चिमेकडचे, म्हणजेच इटलीमधील रोमन साम्राज्य लयास गेले आणि तेथे पोपच्या नेतृत्त्वाखाली कॅथलिक पंथीय राज्य निर्माण झाले, तर पूर्वेकडे पौर्वात्य ऑर्थोडॉक्स धर्माचे पालन करणार्‍या रोमन बायझेन्टाईन शासकांचे राज्य कायम राहिले. सहाव्या शतकात बायझेन्टाईन राजा जस्टिनियन पहिला याने या भव्य चर्चचे निर्माण केले. त्यानंतर सुमारे एक हजार वर्षं ते जगातील सर्वात भव्य चर्च म्हणून ओळखले जात होते. तेराव्या शतकात क्रुसेडरांच्या विजयानंतर काही काळ त्याचे रोमन कॅथलिक चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले होते. पण, बायझेन्टियन राजांनी कॉन्स्टंटिनोपलवर पुन्हा एकदा ताबा मिळवून त्याचे ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये रुपांतर केले.


तेराव्या शतकातच उस्मानने सध्याच्या तुर्कीच्या पूर्वेकडच्या भागात स्थायिक झालेल्या टोळ्यांना एकत्र करुन राज्याची स्थापना केली. उस्मान किंवा उथमनवरुन त्याचे ‘ओटोमन’ असे नाव पडले. ओटोमन राजे धर्माने मुस्लीम असले तरी त्यांची प्रजा मुख्यत्वे ऑर्थोडॉक्स पंथीय ख्रिस्ती होती. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला तैमुर लंगच्या स्वारीमुळे ओटोमन राज्याला मोठा पराभव पत्करावा लागला. कालांतराने त्यांनी आपले राज्य पुनर्स्थापित केले. १४५१ मध्ये गादीवर बसलेल्या १९ वर्षीय मेमेट (मेहमूद) दुसरा याने संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी तसेच संपत्तीच्या लालसेने सुमारे कॉन्स्टंटिनोपलवर स्वारी केली. तीन बाजूंनी समुद्र तसेच नदीने वेढलेले हे शहर आपल्या भव्य तटबंदीमुळे एखादा अपवाद वगळता, सुमारे एक हजार वर्षं अजिंक्य होते. प्रेषित मोहम्मदांच्या काळात म्हणजे सातव्या शतकात उम्मियाद खलिफतीचा संस्थापक मुवैय्याने हे शहर जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.


तेव्हापासून मुस्लीम शासकांनी अनेक प्रयत्न करुनही कॉन्स्टंटिनोपल त्यांच्या हाती पडले नव्हते. जे ९०० वर्षं जे मुस्लीम शासकांना जमले नाही, ते तरुण मेमेटने करुन दाखवले. १४५३ साली ओटोमन तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपलवर विजय मिळवला आणि त्याचे ‘इस्तंबूल’ असे नामकरण केले. मेमेटने ‘हया सोफिया’वरील ‘क्रॉस’ उतरवला आणि तिथे ‘चांद-सितारा’ लावला. या विजयानंतर ओटोमन राज्याचे साम्राज्यात रुपांतर झाले. कालांतराने त्यांनी आपला विस्तार व्हिएन्नापर्यंत नेला. १५१७ साली इजिप्तमधील मामलूक साम्राज्याचा पराभव केल्यामुळे ओटोमन साम्राज्य मुस्लीमबहुल साम्राज्य झाले. मक्का, मदिना आणि जेरुसलेम ही मुसलमानांसाठीची सर्वात पवित्र शहरं ओटोमन साम्राज्याचा भाग झाल्यानंतर त्यांनी स्वतःला ‘खलिफ’ अर्थात इस्लाममधील राजकीय आणि धार्मिक प्रमुख म्हणवून घ्यायला सुरुवात केली. ओटोमन सुलतानांहून खूप वैभवशाली आणि मोठ्या लोकसंख्येवर राज्य करणार्‍या सम्राट अकबराने त्यांचे खलिफपद अमान्य करत स्वतःला भारतातील ‘खलिफ’ म्हणून घोषित केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र भारतातील मुसलमानांनीही ओटोमन सुलतानाला ‘खलिफ’ मानायला सुरुवात केली.
हा इतिहास सांगण्यामागचे कारण म्हणजे आजही अनेक तुर्कांच्या मनात आपण सुमारे ४५०वर्षं मुस्लीम जगताचे नेतृत्त्व केल्याची भावना आहे. मुघल साम्राज्याप्रमाणे ओटोमन साम्राज्याचे अधःपतन आणि कालांतराने विघटन व्हायला सुरुवात झाली. उत्तर तसेच पश्चिमेकडील युरोपीय राज्यांचे औद्योगिक क्रांती आणि राष्ट्रवादामुळे बलाढ्य राष्ट्रांत रुपांतर होऊन त्यांनी तुर्कीचे लचके तोडायला सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकात तुर्कीने आधुनिकतावाद स्वीकारुन स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी होत असलेला पाहून त्यांनी पुन्हा एकदा ‘खलिफ’पदाचे चुंबक वापरुन जगभरातील श्रद्धावान मुसलमानांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गळाला भारतातील उमराव आणि उलेमांचा मोठा गट लागला. पहिल्या महायुद्धात तुर्कीने जर्मनीची साथ दिली. या युद्धात पराभूत झाल्यानंतर जेत्या ब्रिटन आणि फ्रान्सने ओटोमन साम्राज्याचे तुकडे करुन आपापसात वाटणी करुन घेतली. १९१९साली मुस्तफा कमालच्या नेतृत्वाखाली तुर्कीतील राष्ट्रवाद्यांनी एकजूट करुन युद्ध केले आणि (आजच्या) तुर्कीचे आणखी तुकडे होऊ दिले नाहीत.
कालांतराने मुस्तफा कमालने तुर्कीमध्ये सेक्युलर आणि आधुनिक राष्ट्राची निर्मिती केली. तुर्कीच्या पराभवास इस्लामिक रुढीवाद कारणीभूत आहे, हे ओळखून त्याने अनेक सुधारणा केल्या. त्याने इस्लामिक ‘खलिफ’पद रद्द केले; महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरण्यास मज्जाव केला; तुर्की भाषेची लिपी बदलली. अरबीच्या ऐवजी रोमन लिपीचा स्वीकार केला. त्यानेच १९३४ साली १४०० वर्षांचा ख्रिस्ती-मुस्लीम वारसा असलेल्या ‘हागिया सोफिया’चे म्युझियममध्ये रुपांतर केले. मुस्तफा कमालचा निर्णय तुर्कीतील रुढीवाद्यांना पटला नसला तरी त्याच्या हुकुमशाहीमुळे त्यांना तो मान्य करावा लागला. त्यानंतर तुर्कीच्या लष्कराने सेक्युलरिझमच्या विरोधात बंडाळीचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. शीतयुद्धाच्या काळात तुर्की अमेरिका आणि इस्रायलचा जवळचा सहकारी होता. ‘नाटो’च्या सदस्यत्त्वामुळे अमेरिकेने तुर्कीमध्ये स्वतःची काही अण्वस्त्रं ठेवली असून तुर्कीला अत्याधुनिक शस्त्रास्त्रं पुरवली आहेत. २००२ सालच्या निवडणुकीत परंपरावादी एर्दोगान यांच्या नेतृत्वाखाली न्याय आणि विकास (एकेपी) पक्षाला विजय मिळाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. गेल्या १८ वर्षांत एर्दोगान यांनी लोकशाही पूर्णतः बरखास्त केली नसली तरी व्लादिमीर पुतिनच्या पावलांवर पावले टाकत स्वतःला तुर्कीचे कायमस्वरुपी अध्यक्ष म्हणून प्रस्थापित केले आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर तुर्कीने युरोपीय महासंघाचे सदस्य व्हायचे अनेक प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. कदाचित तुर्कीची लोकसंख्या ९८टक्के मुस्लीम आहे, हे त्यामागचे एक कारण असावे.

युरोपीय महासंघाचा डाव लक्षात आल्यावर एर्दोगानने तुर्कीला पुन्हा एकदा मुस्लीम देशांत मध्यवर्ती स्थान मिळवून द्यायचे प्रयत्न सुरु केले. त्यासाठी अमेरिका-इस्रायलला विरोध करणे, जागतिक मुस्लीम प्रश्नांत नाक खुपसणे इ. गोष्टींना प्रारंभ केला असला तरी आंतरराष्ट्रीय संबंधांतील समतोल ढळू दिला नाही. रशिया, अमेरिका आणि युरोपीय महासंघाला एकमेकांविरुद्ध वापरुन घेतले.१९७९साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर सुन्नी सौदी आणि शिया इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. सद्दाम हुसैनची सत्ता उलथवल्यानंतर आणि बाथिस्ट बशर असादची सीरियावरील पकड सैल झाल्यामुळे सेक्युलर पर्याय उरला नाही. तालिबान, अल-कायदा आणि इसिसच्या पतनानंतर मूलतत्त्ववादालाही चपराक बसली आहे. इराणची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि सीरिया, येमेन, सुदान तसेच लेबनॉनमधील यादवी युद्धांना मदत केल्यामुळे मोडकळीस आली आहे. सौदी अरेबिया इसिसच्या धसक्यामुळे उदारमतवादी होण्याचे प्रयत्न करत आहे.
मक्का आणि मदिनेमुळे नैसर्गिकरित्या सुन्नी मुस्लीम जगाचे केंद्रस्थान सौदी अरेबियाकडे आहे. एर्दोगान गेली काही वर्षं त्याला आव्हान द्यायचा प्रयत्न करत आहेत. ‘हागिया सोफिया’चे मशिदीत रुपांतर करण्यामागे त्यांचा हेतू आर्थिक मंदी आणि कोरोनाचे संकट हाताळण्यात स्वतःला आलेल्या अपयशावरुन लोकांचे लक्ष हटवणे हा असला तरी तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही. गेल्या वर्षी तुर्कीने पाकिस्तान आणि मलेशियाच्या साथीने मुस्लीम जगात पर्याय निर्माण करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. आय नेटफ्लिक्स आणि युट्युबवर मोठ्या संख्येने दिसणार्‍या ‘रिसरेक्शन अर्तुगुल’, ‘राइज ऑफ ओटोमन एम्पायर’, ‘द प्रोटेक्टर’ इ. तुर्कीश मालिकांमागील उद्दिष्टं राजकीय, म्हणजेच मुस्लीम जगतात तुर्कीला केंद्रस्थानी आणणे हे आहे. ‘हागिया सोफिया’च्या निर्णयावर पोप फ्रान्सिस, युनेस्को, अमेरिका, रशिया ते ग्रीस अशा सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा विरोध जेवढा वाढेल तेवढे एर्दोगान त्याकडे बोट दाखवून मुस्लीम ध्रुवीकरणाचे प्रयत्न करतील. भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आणि त्यातून धार्मिक आधारावर झालेली फाळणी यांची मुळं तुर्कीशी जोडली गेली आहेत. आधुनिक तुर्कीला डोळ्यासमोर ठेवूनच महंमद अली जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली असल्यामुळे, तसेच आज इमरान खान एर्दोगान यांना साथ देत असल्यामुळे तुर्कीतील घटनांकडे भारतीयांनीही काळजीपूर्वक पाहायला हवे.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121