लष्करातील अनेक मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. युद्धकालीन माहितीच्या धुराळ्यात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंघोषित संरक्षणतज्ज्ञ, काही राजकीय नेते असत्य वक्तव्ये प्रसृत करतात. अनेक तथाकथित तज्ज्ञांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सेवाकाळात कधी उंच पर्वतीय प्रदेश बघितलेलाही नसतो. मात्र, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पैसे कमवण्याकरिता त्यांना दूरदर्शन वाहिन्यांवर यायचेच असते. भारतीय व चिनी सैनिकांत पूर्व लडाखमधे १५ व १६ जून रोजी झालेल्या लढाईबाबतही असेच झाले.
गलवान खोर्याचे महत्त्व
चीनला असे वाटते की, गलवान खोरे वापरून भारत ‘अक्साई चीन’वर आक्रमण करेल. त्यामुळे चीनला भारताच्या आत घुसायचे होते, ज्यामुळे भारतीय भागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर त्याला लक्ष ठेवता येईल.त्यासाठी चीनने ‘अक्साई चीन’पासून गलवान खोर्यापर्यंत थेट रस्ताही बांधलेला आहे. गलवान नदीच्या खोर्यात १९६२ साली सुद्धा युद्ध झाले होते. ‘पी.पी.-१४ ’ हा भारताच्या ताब्यातील गलवान खोर्याच्या तोंडातील केवळ एक बिंदू आहे. चीनच्या बाजूने गलवान व श्योक नद्यांचा संगम आणि त्या पलीकडचा रस्ता झाकला जातो. भारताने अलीकडेच इथे एक पूल बांधला आहे. या पुलापासून ‘पी.पी.-१४’ बिंदूपर्यंत, दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी मार्गावर रस्ता बांधलेला आहे. इथली चीनसोबतची प्रत्यक्ष-नियंत्रण-रेषा (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल) जमिनीवर आखलेली नाही. गलवान खोरे या रेषेच्या पूर्वेला आहे. गेल्या ५८ वर्षांपासून ते चीनच्याच ताब्यात आहे. भारताने दारबूक-श्योक-दौलत बेग ओल्डी रस्ता बांधलेला आहे. हा रस्ता २५५ किलोमीटर लांब आहे. रसद पुरवठ्याच्यो दृष्टीने व्यूहरचनात्मक, तसेच सैन्याच्या बदलांकरताही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यामुळे सीमेवर उत्तम निगराणीही करता येते आणि आगळीक करणार्या चीनला उत्तम आक्रमक प्रतिसादही दिला जाऊ शकतो. सीमा व्यवस्थापनावर १९९३ , १९९६ आणि २०१३ साली झालेल्या तीन करारांन्वये अंगारधारी शस्त्रे सीमेवर वापरण्यास मनाई आहे. मात्र, लढाईतच अधिक जीवितहानी होत आहे.
१५ जूनला नेमके काय घडले?
हा प्रसंग चीनने ‘पी.पी.-१४’ बिंदूपर्यंत येण्यासाठी केलेल्या प्रयासामुळे उद्भवला. १० ते १२ जून दरम्यान चिनी सैन्याने या बिंदूच्या खालीच एक तंबूंचे शिबीर उभारले. हे शिबीर भारताने बळाचा वापर करून १२ व १३ जूनलाच हटवले. ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ म्हणजेच चिनी सैन्यास या कारवाईत जीवितहानीही सोसावी लागली. मात्र, १४ जून रोजी चिनी सैनिकांनी तंबूंचे नवे शिबीर उभे केले. भारताला १५ जून रोजी नवीन तंबू आणि अधिक चिनी सैनिकांच्याच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि कालांतराने याचे पर्यवसान लढाईत झाले. ६ जून रोजी, वर्तमान स्थितीतून माघार घेण्याबाबत, भारताच्या १४ व्या कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग आणि चीनच्या दक्षिण झिझियांग क्षेत्राचे मेजर जनरल लियू लिन यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार १५ जूनपर्यंत, भारताने पश्चिमेकडे दीड किलोमीटरपर्यंत आणि चीनने पूर्वेकडे अडीच किलोमीटरपर्यंत माघार घेणे अपेक्षित होते.
‘१६ -बिहार’मधील ‘मेजर’ हुद्द्याच्या अधिकार्याच्या नेतृत्वात १० सैनिकांच्या एका पथकास या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यास पाठवण्यात आले होते. त्यांना तंबू आढळून आले. त्यांनी ते जाळून टाकले. ते परतत असताना त्यांना सशस्त्र चिनी सैनिकांनी घेरून ताब्यात घेतले. ‘१६ -बिहार’चे अधिकारी कर्नल संतोष बाबू यांना हे समजताच त्यांनी, चिनी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी ३० सैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली. चिनी सैनिक उंचावर होते. भारतीय सैनिक सावकाश चढत होते. १६ हजार फुटांवर चाल अत्यंत मंदपणे व संथच होत असते. कित्येकदा श्वासच कुंठीत होतो. शिवाय रस्ता एवढा अरुंद होता की, एका ओळीतच एकापाठी एक चालावे लागत होते. याकरिताच तर ‘पी.पी.-१४ ’ पर्यंत पायवाट बांधण्यात आली होती. कर्नल संतोष बाबू यांचे पथक चिनी तंबूंपासून ६० ते १०० मीटर अंतरावर असतानाच, चिनी सैनिकांनी त्यांना एकट्यालाच समोर येण्यास सांगितले. कर्नल संतोष दोन सैनिकांसह पुढे सरकले. ध्वजभेटींकरिताच्या शिरस्त्यानुरूपच तिघेही निःशस्त्र होते. अचानक कर्नल बाबू आणि इतर सैनिकांवर चिन्यांनी मोठमोठ्या दगडांनी मारा सुरु केला. चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिघेही जबर जखमी झाले.
उर्वरित सैनिकांनी ही घटना तळास कळवली आणि चिन्यांवर ते चाल करुन गेले. समोरासमोर लढाई सुरू झाली. चिनी खिळ्यांच्या गदांना प्रत्युत्तर देण्याकरिता भारतीयांकडे रायफलवर चढवलेली बायोनेटस होती. अशा प्रकारच्या समोरासमोर लढाईसाठी भारतीय सैनिक उत्तमरित्या प्रशिक्षित अशल्यामुळे त्यांनी चिन्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, चिन्यांना ४०० सैनिकांची कुमक प्राप्त झाली. मल्लयुद्ध आणि काटेरी तारा लावलेल्या दांड्यांनी चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. आपल्याही सैनिकांना, ‘१६ -बिहार’ व २०० सैनिक येऊन मिळाले. हे सैनिक ‘१६ -बिहार’, ‘३ -पंजाब’, ‘४ -महार’ आणि ‘१८१ -फिल्ड रेजिमेंट’चे होते. या घटनेमुळे भारतीय सैनिक संतप्त झालेले होते. ‘१६ -बिहार’च्या कमांडिंग अधिकार्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी चिन्यांवर आक्रमण केले. इतर बटालिअन्सचे ’घातक प्लॅटून्स’सही येऊन मिळाले आणि त्यांच्या किमान १८ सैनिकांना त्यांनी कंठस्नान घातले.
युनिटचा ‘कमांडिंग ऑफिसर’ हा वडिलांच्या जागी असतो, असे लष्करातील सैनिक मानतात. ‘कमांडिंग ऑफिसर’ला मारहाण करणे किंवा त्याचा अनादर करणे म्हणजे, आपल्या पालकांचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांनी ताबडतोब याचे उत्तर म्हणून चिन्यांवर हात उचलला आणि त्यांच्यात कोणत्याही शस्त्राशिवाय घमासान लढाई सुरु झाली. दोन्ही बाजूने सैनिक जखमी झाले. पण, यात साहजिकच भारतीय सैनिकांची सरशी झाली. ‘१६-बिहार’चे संतप्त सैनिक चिनी सैनिकांचे प्राणच हिरावू लागले. चिनी सैनिकांच्या बुलडोझरमुळे या भागात एक भूस्खलन झाले आणि अनेक चिनी सैनिक शेकडो फूट खोल, बर्फासारख्या थंडगार गलवान नदीच्या दरीत पडले आणि बहुधा प्राणास मुकले. ‘१६ -बिहार’चे लेफ्टनंट कर्नल, कॅप्टन (३वर्षे सेवा), कॅप्टन (२ वर्षे सेवा) सर्वात धाडसी होते. त्यांनी सैनिकांना कमांडिंग अधिकार्याच्या मृत्यूचा सूड घेण्याकरिता भयंकर आवेशाने पुढे नेले. ‘आर्टी. रेजिमेंट’च्या एका शिपायाने दहा चिनी सैनिकांना आपल्या तलवारीने यमसदनी धाडले. विशेष म्हणजे, चिनी सैनिकांकडूनच हिसकावून घेतलेल्या तलवारींनीच त्यांनी त्यांची कत्तल केली.
भारत सरकारने कर्नल संतोष बाबू यांच्यासहित २० सैनिक गमावल्याचे घोषित केले. चीननेही जबर प्राणहानी सोसली. भारतीय अनुमानांनुसार, ही संख्या ४३ होती. हे अनुमान पार्थिवे गोळा करण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरांच्या खेपांवरून काढण्यात आलेले आहे. अमेरिकन अहवालानुसार, ३५ चिनी मृत झाले असावेत असे दिसते. त्यात ‘कर्नल्स’ आणि ‘मेजर्स’ दर्जाच्या अधिकार्यांचाही समावेश आहे. यात भूस्खलनात दरीत पडून दगावलेल्या सैनिकांचा समावेश नाही. काही अनुमानांनुसार, चीनची प्राणहानी ही १२८ ते १५० च्या घरात असल्याचाही कयास आहे. त्यानंतर अंधारामुळे दोन्ही बाजूकडील काही सैनिक एकमेकांच्या बाजूलाच राहिले. १६ जून उजाडल्यानंतर अनेक सैनिक बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. दिवस सुरु झाल्यानंतर ही परिस्थिती दोन्ही बाजूंच्या मेजर जनरल यांच्याकडे सोपविली गेली आणि सैनिकांच्या देवाणघेवाणीसंबंधी चर्चा झाली. ‘३ -मेडियम रेजिमेंट’, शिखांनी सहा सैनिकांच्या संरक्षणात असलेल्या वरिष्ठ दिसणार्या एका अधिकार्यावर हल्ला चढवला. त्यांनी सहाही सैनिकांना ठार केले आणि वरिष्ठ अधिकार्यास पकडले. त्यामुळे आपल्या पकडलेल्या सैनिकांना परत आणण्यास मदत मिळाली. भारतीय गस्ती पथकातील दहा सैनिकांची मुक्तता आणि चिनी कर्नल व त्याच्या सैनिकांची मुक्तता देवाणघेवाणीचा भाग आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय सैनिकांच्या नादी लागू नये, अन्यथा त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, याचा धडा चीनला नक्कीच मिळाला.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)