कुत्रे उठले चितळांच्या जीवावर; ठाण्यात एका चितळाचा मृत्यू, एक जखमी आणि दोन बेपत्ता

    09-Jun-2020
Total Views | 213

 deer_1  H x W:

 
 
 घोडबंदरमधील घटना

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ठाण्यात आज दिवसभरात कुत्रांच्या हल्लात एका चितळाचा मृत्यू, एक जखमी आणि दोन चितळ बेपत्ता झाले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर परिसरात ही घटना घडली. यानिमित्ताने भटके कुत्रे वन्यजीवांच्या मुळाशी उठत असल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
 
 
 
 

घोडबंदरमधील आनंद नगर भागातील ऋतू एन्क्लेव सोसायटीच्या आवारात सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास चितळ प्रजातीचे मादी हरिण आढळून आले होते. कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे हे चितळ सोसायटीमध्ये शिरले.ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोसायटी प्रशासनाकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या मादी चितळाला पकडण्यात आले. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या चितळाची रवानगी उपचाराकरिता रात्रीच 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त करण्यात आली. सकाळी सात वाजता याच सोसायटीच्या लोखंडी प्रवेशव्दारामध्ये एक नर चितळ अडकल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. कुत्र्यांपासून बचाव करताना हे चितळ प्रवेशव्दारमध्ये अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा घटनास्थळी पोहोचलेल्या वनाधिकाऱ्यांना नर चितळ प्रवेशव्दाराच्या लोखंडी सळ्यांमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकलेले दिसले. त्याची तात्काळ सुटका करुन उपचाराकरिता त्याला नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्यात आले. ही कारवाई ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद मुठे आणि येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवार, संदीप मोरे, सुजय कोळी, रमाकांत मोरे यांनी 'राॅ' आणि 'डब्लूडब्लूए' या वन्यजीव बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने केली.

 
 
 

सकाळच्या बचाव कार्यानंतर दोन चितळ सोसायटीनजीकच्या मोठ्या नाल्यात पडल्याची माहिती वन विभागाला स्थानिकांकडून मिळाली होती. त्यांच्या बचावासाठी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या बचाव पथकाला पाचारण्यात आले होेते. मात्र, नाल्यातून प्रवास करत हे दोन्ही हरण बेपत्ता झाल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. तर, सकाळी गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या नर चितळाचा दुपारी उपारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. कुत्र्यांनी या चितळाच्या मागच्या पायाजवळील मांस खाल्ल्याचे त्यांनी सांगितले. एकणूच कुत्रे वन्यजीवांच्या मुळावर उठत असल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121