‘योगी मॉडेल’ पाकमध्येही प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020   
Total Views |
Yogi Adityanath _1 &


संपूर्ण जगभरात आणि भारतातही कोरोना महामारीचा प्रकोप वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांपर्यंत पोहोचली, तर भारतातील रुग्णसंख्येने अडीच लाखांचा टप्पा गाठला. कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला असतानाच, आपला शेजारी देश पाकिस्तानातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून लवकरच ती एक लाखांच्याही पुढे जाईल, अशी स्थिती आहे. 

सध्या तिथे एकूण ९८ हजारांवर कोरोनारुग्ण आढळले असून दोन हजारांपेक्षा अधिकांचा मृत्यू झाला. मात्र, पाकिस्तानी पत्रकार-माध्यमांत सध्या एक निराळीच चर्चा सुरु असून त्याचा संबंध भारताशी, उत्तर प्रदेशशी आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा आणि त्यानुसार वर्तन करावे, असा सल्ला अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी दिल्याचे समजते.
 
 
योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये, म्हणून नियोजनबद्धरित्या काम केले. त्यात ‘लॉकडाऊन’ची कठोर अंमलबजावणी, नियमभंग करणार्‍यांना कडक शिक्षा आणि दंड, आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ले करणार्‍यांविरोधात तत्काळ कारवाई यांचा समावेश होतोच. पण, उत्तर प्रदेश सरकारने आपल्या जनतेला तसेच कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांनाही जीवनाश्यक वस्तूंचा घरोघरी अथवा संबंधित परिसरात जाऊन पुरवठा करण्याचेही काम केले, जेणेकरुन लोक बाहेर यायलाच नकोत.
 
 
मात्र, कोरोना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ‘हॉटस्पॉट मॉडेल’चाही अवलंब केला. म्हणजेच जिथे कोरोनारुग्ण आढळतील, तो भाग बंद करायचा आणि विषाणूला तिथेच थोपवायचे. परिणामी, आज उत्तर प्रदेशमध्ये कोरोनासंक्रमितांची संख्या नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होते. आता योगी आदित्यनाथ यांच्या याच कामाची पाकिस्तानी माध्यमांत तारीफ केली जात आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘डॉन’चे निवासी संपादक फहद हुसेन यांनी एक आलेख शेअर केला आहे. हुसेन यांनी शेअर केलेल्या आलेखात पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशच्या मृत्युदराची तुलना केली आहे. तसेच पाकिस्तानने उत्तर प्रदेशपेक्षाही अत्यंत वाईट काम केल्याचे ते यात म्हणतात.
 
 
उत्तर प्रदेशातील साक्षरता दर ६८ टक्के असून पाकिस्तानात तो ५९ टक्के आहे, तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २२ कोटी, ५० लाख आणि पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी, ८० लाख असून उत्तर प्रदेशातील लोकसंख्येची घनता अधिक असल्याचेही हुसेन यांनी म्हटले. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने ‘लॉकडाऊन’चे गांभीर्य ओळखले आणि त्याचे पालनही केले. पाकिस्तानात मात्र तसे झाले नाही, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. सोबतच पाकिस्तानातील मृत्यूंबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.
 
 
पाकिस्तानात इतक्या लोकांना जीव का गमवावा लागला, असा सवाल त्यांनी विचारला. उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानमधील आकडेवारीची तुलना केल्यास उत्तर प्रदेशात १० हजार, २६१ कोरोनाबाधित आहेत, तर पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या यापेक्षा नऊ पट अधिक म्हणजे ९८ हजार, ९४३ इतकी आहे. पाकिस्तानमध्ये २३ मार्चपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आणि आता तर ती अनियंत्रित झाल्याचे दिसते.
 
 
उत्तर प्रदेशात मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. दरम्यान, पाकिस्तानात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या दोन हजारांवर पोहोचली असून उत्तर प्रदेशात हाच आकडा २७५ इतका आहे. फहद यांनी याच फरकावर जोर दिला आणि पाकिस्तानात असे का होऊ शकले नाही, याबाबत प्रश्न विचारला.
 
 
योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ मणि त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांना कर्मयोगी ठरवत, त्यांच्या प्रयत्न आणि यशाचा आवाज सीमेपलीकडेही ऐकू जात असल्याचे म्हटले. पाकिस्तानी पत्रकाराने इमरान खान यांच्या सरकारला कोरोनाविरोधातील लढ्यात ‘योगी मॉडेल’ आपलेसे करण्याचा सल्ला देत वस्तुस्थिती मांडल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.
 
 
फहद यांनी उत्तर प्रदेशाव्यतिरिक्त महाराष्ट्राशीही पाकिस्तानची तुलना केली आणि इथे मात्र वाईट अवस्था असल्याचे आणि राज्य सरकार कोरोनानियंत्रणात अपयशी ठरल्याचे म्हटले. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत ८५ हजारांच्या पुढे गेली असून ती पाकिस्तानपेक्षा फार कमी नाही, असे त्यांनी म्हटले. सोबतच महाराष्ट्रात ३ हजार, ६० रुग्ण मरण पावल्याचे सांगतानाच हा दर पाकिस्तानपेक्षा दीडपट अधिक असल्याचे सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@