लडाखच्या गलवान खोरे आणि पँगाँग सरोवर परिसरात सीमावाद निर्माण करणार्या चीनला जपानने चांगलाच धडा शिकवल्याचे नुकतेच समोर आले. जपानच्या हवाई हद्दीत घुसलेल्या चीनच्या बॉम्बवर्षावक विमानाला जपानी हवाई सेनेच्या लढाऊ विमानांनी दूरवर पिटाळून लावले आहे. जपानी संरक्षण मंत्रालयाने चिनी बॉम्बवर्षावक विमानाच्या घुसखोरीबाबत माहिती देताना सांगितले की, पूर्व चिनी समुद्रामध्ये ओकिनावा व मियाको या जपानच्या बेटांदरम्यान चीनचे ‘एच-६’ हे बॉम्बवर्षावक विमान आल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर जपानच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांनी चीनच्या ‘एच-६’ या विमानाला हाकलून लावले. चीनने ‘एच-६’ हे बॉम्बवर्षावक विमान दूरच्या अंतरावरील लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्यासाठी तयार केलेले असून हे विमान अण्वस्त्र हल्ला करण्यातही सक्षम आहे. ‘एच-६’ विमानाची जुन्या आवृत्तीत क्षेपणास्त्र हल्ल्याची मर्यादित क्षमता होती, पण आता हे विमान अद्यतन करण्यात आले असून ते अधिक उन्नत झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जपानी नौसेनेनेदेखील एका चिनी पाणबुडीला अगदी दूरवर पळवून लावले होते. जपानने मात्र चीनला कठोर संदेश देत, पश्चिम प्रशांत क्षेत्रातील चीनच्या प्रत्येक कारवाईला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
चीन आणि जपानमध्ये पूर्व चिनी समुद्रातील बेटांवरुन वाद काही आजचा नाही. दोन्ही देश वर्षानुवर्षांपासून या निर्जन बेटांवर आपलाच अधिकार असल्याचे सांगत आहेत. जपानमध्ये या बेटांना ‘सेनकाकु’ तर चीनमध्ये ‘डियाडोस’ या नावाने ओळखले जाते. मात्र, या बेटांचे प्रशासन १९७२ सालापासून जपानच्या हातात आहे. ही बेटे आमच्या अधिकार क्षेत्रात येतात आणि म्हणूनच जपानने इथला अधिकार सोडून दिला पाहिजे, असा चीनचा दावा आहे. चीन दावा करुनच थांबलेला नाही, तर तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने या बेटांवर कब्जा करण्यासाठी जपानला थेट सैन्य कारवाई करण्याची धमकीदेखील दिलेली आहे. गेल्याच आठवड्यात अनेक चिनी जहाजे या बेटांपर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर लढाई होते की काय, अशी शंकाही निर्माण झाली होती. दरम्यान, जपान ज्याप्रमाणे या बेटांवर प्रशासन सांभाळतो, त्याचप्रमाणे सेनकाकू अथवा डियाओस बेटांचे संरक्षणही जपानी नौसेनाच करते. अशा परिस्थितीत चीनने ही बेटे बळकावण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी त्याला जपानशी युद्ध करावे लागेल. पण, जगातील तिसर्या क्रमांकाची सैन्यशक्ती असलेल्या चीनसाठी हे सहजसोपे असणार नाही. कारण, जपान आणि अमेरिकेचे सख्य. १९५१ साली जपान आणि अमेरिकेने सॅनफ्रान्सिस्को करार केला आणि त्यानुसार जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली. तसेच कोणत्याही देशाने जपानवर हल्ला केला, तर तो अमेरिकेवर झालेला हल्ला मानला जाईल, असेही या करारात म्हटलेले आहे. यामुळे जर चीनने जपानवर हल्ला केलाच, तर जपानच्या संरक्षणासाठी अमेरिकेला उतरावे लागेल आणि जपान व अमेरिकेने एकत्रितपणे चीनवर हल्ला केला तर तिसरे महायुद्धही सुरु होऊ शकते.
दरम्यान, चीन पूर्व समुद्राव्यतिरिक्त दक्षिण समुद्रातही वेगाने निरनिराळ्या प्रदेशांवर कब्जा करत आहे. गेल्या रविवारी चीनने दक्षिण चीन समुद्रातील ८० ठिकाणांची नावे बदलली आणि त्या २५ बेटे असून उर्वरित ५५ ठिकाणे समुद्राच्या खालील भौगोलिक रचना आहेत. याद्वारे चीनने ९-डॅश रेषेने निर्धारित केलेल्या क्षेत्रांवर आमचा अधिकार असल्याचा इशारा दिल्याचे दिसते. मात्र, ९-डॅश रेषा आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार अवैध मानली जाते, पण चीन त्यानुसारच प्रदेश बळकावत सुटला आहे. चीनच्या या पावलामुळे केवळ छोटे शेजारी देशच नव्हे, तर भारत आणि अमेरिकेतही तणाव आहे. अशा परिस्थितीतच जपान व चीनमध्ये तणावाची परिस्थिती असतानाच हिंद महासागरात जपानी नौसेना व भारतीय नौसेनेने सामरिक सराव केला. जपानच्या नौसेनेने यासंबंधीची माहिती ट्विटरवर दिली. या सामरिक सरावात जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सच्या ‘काशिमा’ आणि ‘जेएस शिमायुकी’ या जहाजांबरोबर भारतीय नौसेनेच्या ‘आयएनएस राणा’ आणि ‘आयएनएनस कुलीश’ जहाजांनी सराव केला. दोन्ही देशांतील नौसेनेत सामंजस्य व सहकार्य वाढावे, हा या सरावाचा उद्देश होता.