चीनविरोधात प्रपोगंडा/माहितीयुद्ध छेडण्याची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020   
Total Views |

chinaa indo_1  



प्रश्न असा आहे की, चीनविरुद्ध आपण प्रपोगंडा/माहितीयुद्ध कसे करायचे? त्यांच्या मीडियामध्ये घुसखोरी कशी करायची? ते त्यांच्या देशात कुठल्याही माहितीयुद्धापासून सुरक्षित आहेत. मात्र, चीनच्या बाहेर असलेली चिनी लोकसंख्या ही आपल्या ‘प्रपोगंडा’चे लक्ष्य असायला हवी. नंतर ही माहिती ते आपल्याबरोबर चीनला घेऊन जातील, ज्याचा चीनमध्ये 
प्रसार होऊ शकतो.



सध्या भारतात चाललेले प्रपोगंडा/माहितीयुद्ध चीनच्या आत, चिनी सरकार आणि सैन्याच्या विरुद्ध नेण्याची गरज आहे. लडाखमधील ‘मिलिटरी स्टॅण्ड ऑफ’नंतर दुष्प्रचार-युद्धाला खूपच वेग आलेला आहे. भारताच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये अनेक चिनी हस्तक वेगवेगळ्या प्रकारचा दुष्प्रचार राष्ट्रहिताच्या विरुद्ध करताना दिसतात. असे दाखवण्यात येते की, आपण आपल्या सीमेचे रक्षण करण्याकरिता समर्थ नाही आणि चीन आपल्यावर नेहमीच कुरघोडी करतो. हे नक्कीच असत्य आहे. कारण, भारतीय सैन्य चीनच्या प्रत्येक कुरघोडीला जशास तसे उत्तर देत आहे. परंतु, काही विकले गेलेले चिनी हस्तक आणि काही तथाकथित तज्ज्ञ हे दुष्प्रचारयुद्ध चीनच्या बाजूने करून चीनला मदत करत आहेत. ते असे का करतात? याचे कारण त्यांना मिळणारा पैसा किंवा आपल्या देशाविषयी असलेला राग किंवा इतर काही कारणे असू शकतील.


‘प्रपोगंडा’ चीनमध्ये केला जात नाही



असा ‘प्रपोगंडा’ चीनमध्ये केला जातो का? त्याचे थोडक्यात उत्तर आहे, अजिबात नाही! कारण, चिनी मीडियावर चीनचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे तिथे कुणालाही प्रवेश नाही. चिनी भाषेत वर्तमानपत्रे काय लिहितात, हेसुद्धा आपल्याला कळत नाही. मात्र, त्यांचे इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र- ‘ग्लोबल टाइम्स’ आपण इंटरनेटवर वाचू शकतो. त्यामध्ये चीन सरकारच्या विरुद्ध एक शब्दसुद्धा लिहिला जाऊ शकत नाही. जर कोणी लिहिला तर लगेच त्या माहितीला तिथून काढून टाकले जाते. म्हणजे, चिनी जनता कुठल्याही दुष्प्रचार किंवा अपप्रचारापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. माहितीयुद्धापासून अज्ञान आहे आणि त्यांना त्यांचे सरकार जे सांगेल, तेवढेच फक्त कळते. मात्र, भारतामध्ये तथाकथित तज्ज्ञाने दिलेल्या माहितीमुळे, त्यांच्या व्हिडिओजमुळे, लेखांमुळे अनेक भारतीयांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात की, आपला देश सुरक्षित नाही आणि सध्याची लढाई चीन जिंकत चालला आहे. चीन या दुष्प्रचार युद्धात नक्कीच आपल्यापुढे आहे. मात्र, सीमा आणि देश पूर्णपणे सुरक्षित आहे आणि भारतीय सैन्य आपले काम अतिशय चोख पद्धतीने करत आहे.


चिनी सैन्याला गलवानमध्ये शिकवला धडा


याचे एक उदाहरण म्हणजे, गलवानमध्ये चिनी सैनिकांवर केलेला प्रतिहल्ला. ज्यावेळेला ‘१६ बिहार’चे ‘कमांडिंग ऑफिसर’ जखमी झाले, त्यावेळेला बिहारी सैनिकांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इतर सैनिकांनी या अपमानाचा बदला घेण्याकरिता प्रतिहल्ला केला आणि पन्नासहून जास्त चिनी सैनिकांना मारले. अनेकांच्या तर मानासुद्धा मोडलेल्या होत्या. या युद्धात केवळ बायोनेट, चिनी सैनिकांकडून ओढून घेतलेल्या दंडुक्यांचा आणि हाताचा उपयोग करण्यात आला. चिनी सैन्याला इतका मोठा शॉक बसला की, लगेच १७ जूननंतर चिनी सैन्य पुन्हा एकदा 9 मेच्या आधी असलेल्या जागेवर परतले. म्हणजेच चिनी सैन्याला एक असा धडा शिकवला गेला की, ते अनेक दिवस विसरणार नाहीत. नंतर ज्या वेळेला शांतताकाळात या युद्धाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला गलवान लढाईची तुलना ही, याच भागामध्ये १९६२ साली झालेल्या रेझांग लाच्या लढाईबरोबर केली जाईल. या सैनिकांची शौर्यगाथा, धैर्य हे इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये नक्कीच लिहिले जाईल. वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख असलेले जनरल झाओ झोंगकी यांनी या हल्ल्याचे नियोजन केले होते आणि त्यांना चीनने बडतर्फ केल्याचेही समजते. जशास तसे उत्तर दिल्यामुळे चीनला कळून चुकले की, भारतीय सैनिक अतिशय आक्रमक आहेत आणि त्यांच्या मानसिक दबावाला ते बळी पडणार नाहीत. चिनी सैन्य गलवानमधून माघारी फिरले आहे आणि हे सगळे भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे शक्य झाले. परंतु, अजूनसुद्धा आपले काही तज्ज्ञ चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशांना आपण बळी पडू नये.



मृत सैनिकांच्या नावांचीही घोषणा नाही


गलवानमध्ये प्राणाचे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांचा लष्करी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला आणि त्यांच्या अंतिम दर्शनाकरिता हजारो भारतीय नागरिक उपस्थित होते. याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आणि अंत्यसंस्काराचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आणि कृतज्ञ देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, असे काहीही चीनमध्ये घडले नाही. ५० हून जास्त मारल्या गेलेल्या सैनिकांची नावेसुद्धा प्रकाशित करण्यात आली नाहीत. जगाला कळू नये म्हणून त्यांच्यावर गपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे चीनमध्ये सरकार विरोधात रोष पसरला आहे. चीनची सोशल मीडिया ‘विबो’वर अनेक नागरिक आपला राग दाखवत आहेत. आपण अशा या रागाचा आपल्याकरिता उपयोग करून घेऊ शकतो का, याचा विचार भारताने करायला हवा.



भारतात/परदेशामध्ये वसलेल्या चिनी नागरिकांविरुद्ध माहितीयुद्ध



प्रश्न असा आहे की, चीनविरुद्ध आपण प्रपोगंडा/माहितीयुद्ध कसे करायचे? त्यांच्या मीडियामध्ये घुसखोरी कशी करायची? ते त्यांच्या देशात कुठल्याही माहितीयुद्धापासून सुरक्षित आहेत. लक्षात ठेवावे की, आज सात ते आठ कोटी चिनी नागरिक परदेशामध्ये वसलेले आहेत. याशिवाय लाखो चिनी विद्यार्थी म्हणून शिकण्याकरिता परदेशात जातात. गेल्या वर्षी कोट्यवधी चिनी नागरिक पर्यटनाकरिता परदेशात फिरले आहेत. चीनच्या बाहेर असलेली ही चिनी लोकसंख्या आपल्या ‘प्रपोगंडा’चे लक्ष्य असायला हवी. नंतर ही माहिती ते आपल्याबरोबर चीनला घेऊन जातील, ज्याचा चीनमध्ये प्रसार होऊ शकतो.



नेमके हे कोणी आणि आणि कसे करायचे?


माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हे करता येऊ शकते. त्यासाठी लागणारी माहिती त्या त्या देशातील भारतीय दूतावासाकडून गोळा केली जावी. आपल्या सगळ्या लिखाणामध्ये आणि व्हिडिओमध्ये (थीम असावी) हे सांगितले जाईल की, आज चिनी नागरिकांचा सर्वात मोठा शत्रू हा चिनी सरकार आणि चिनी सैन्य आहे. चिनी सैन्य परदेशात कुठेही वापरले जात नाही. परंतु, त्यांचा सर्वात जास्त उपयोग चीनमधल्या शिनझियांग, तिबेट आणि इतर अल्पसंख्याक प्रांतांमध्ये केला जातो. चिनी नागरिकांना आठवत असेल की, या चिनी लष्कराने शांततेने आंदोलन करणार्‍या चिनी नागरिकांवर रणगाडे आणि मोठी शस्त्रं घेऊन हल्ला केला होता, ज्यामध्ये हजारो चिनी नागरिक मारले गेले होते.



सगळ्या राष्ट्रांची चीनविरोधात एकजूट


अशा प्रकारच्या माहितीयुद्धामध्ये आपण अशा सगळ्या राष्ट्रांशी एकजूट करायला पाहिजे, जे चिनी ‘प्रपोगंडा’चे लक्ष्य बनलेले आहेत. उदाहरणार्थ- जपान, व्हिएतनाम, दक्षिण पूर्व आशियामधील देश, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इतर अनेक. आपण सगळे एकत्र आलो, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात माहितीयुद्ध चीनच्या विरुद्ध सुरू करता येईल. यामध्ये चिनी सरकारकडून लपवल्या जाणार्‍या बातम्यांना पुढे आणले जावे. ज्यामुळे सत्य परिस्थिती ही चिनी नागरिकांना कळेल. आज चीनची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे तिथे बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नोकर्‍या कमी झाल्या आहेत आणि नागरिकांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, यामुळे नागरिक रागावलेले आहेत. याशिवाय ‘वन चाईल्ड पॉलिसी’मुळे चिनी समाजामध्ये चिनी मुलांना लग्नाकरिता मुली मिळत नाहीत. यामुळे अनेकदा मुलींचे इतर देशांतून ‘स्मगलिंग’ केले जाते. याशिवाय चिनी सरकार आपल्या आजारी नागरिकांचे ‘ऑर्गन हार्वेस्टिंग’ करण्याकरितासुद्धा मागेपुढे पाहात नाही. अशा घटना कुठल्याही सुसंस्कृत राष्ट्रांमध्ये होत नाहीत, मात्र चीनमध्ये होतात आणि हे चिनी नागरिकांच्या समोर मांडण्याची गरज आहे. अर्थातच, याकरिता माहिती-युद्ध पुष्कळ वेळा, बराच काळ लढावे लागेल. या युद्धाचा मुख्य उद्देश असावा की, सध्याची असलेली चिनी राजवट चिनी लोकांनीच उलथवून टाकली पाहिजे. असे झाले तर चीनची आक्रमकता कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आशा करूया की, आपण अशा प्रकारचे माहितीयुद्ध सुरू केले असावे. चीनने आणि चिनी हस्तकांनी भारतीय मीडियामध्ये चालवलेल्या माहितीयुद्धाच्या एक पाऊल पुढे राहिले, तरच आपल्याला या लढाईमध्ये विजय मिळेल.


(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@