कोरोनाच्या संकटकाळामध्ये नाशिकमधील मजुरांच्या मदतीला धावून जाणार्या भारताच्या धावपटू ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊत-तुंगार यांची यशोगाथा...
सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोनाचे वादळ घोंगावत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. यामध्ये सर्वसामान्य, गोरगरीब, रोजंदारीवर जगणार्या मजुरांचे अतोनात नुकसान झाले. अशावेळी गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक मदतीचे हात पुढे आले व त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. अनेक खेळाडूंनी, नेत्यांनी, अभिनेत्यांनी मजूर तसेच इतर राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांना आपापल्यापरीने मदत केली. आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असले तरीही, अद्याप ‘लॉकडाऊन’मधील पडलेल्या मोठ्या फटक्यातून सावरण्यासाठी देशाला काही कालावधी लागणार आहे. तसेच, कोरोनावर जोपर्यंत कायमचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत याच्याविरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर, पोलिसांसोबतच सर्वजण सज्ज आहेत. अशामध्ये गरजूंना केलेल्या मदतीने अनेकजणांनी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. अशीच एक हेवा वाटावा अशी कामगिरी भारतासाठी अनेक पदके कमवणार्या मूळच्या नाशिकच्या धावपटू कविता राऊत यांनी केली आहे. त्यांनी ‘कविता राऊत फाऊंडेशन’ आणि ‘यशोदीप’च्या माध्यमातून अनेक मजुरांना दैनंदिन आयुष्यात लागणार्या वस्तू आणि किराणामालाचे वाटप केले. यापुढेही अशी समाधानकारक समाजसेवा त्या करत राहतील, असा विश्वासदेखील त्यांनी दर्शविला आहे. ‘अर्जुन पुरस्कार’च्या मानकरी आणि या संकटकाळात माणुसकीसाठी धावणार्या त्यांच्या जीवनसंघर्षाबद्दल जाणून घेऊया...
कविता राऊत यांचा जन्म ५ मे, १९८५ रोजी नाशिकमधील सावरपाडा गावामध्ये झाला. एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कविता राऊत यांची स्वप्न मात्र मोठी होती. घरची परिस्थिती तशी फार चांगली नव्हती. परंतु, कष्टप्रद बालपणामुळे त्यांचे पाय कणखर बनले होते. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. कोणतीही पूर्वतयारी नाही, धावण्यासाठी पुरेशी साधनेही नाही. अशामध्ये त्या स्पर्धेमध्ये अनवाणीच धावल्या आणि त्यांनी चांगली कामगिरी केली. हीच त्यांची जिद्द पाहून प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविता यांच्याकडून नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर धावण्याचे धडे गिरवून घेण्यास सुरुवात केली. सावरपाडा या नाशिकमधील छोट्याशा खेड्यातून आलेल्या कविता यांनी तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली. गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेमध्ये त्यांनी रौप्यपदक पटकावले. त्यांच्या याच विजयासह त्यांचा धावपटू म्हणून प्रवास सुरु झाला. पुढे नाशिक येथे सराव आणि तिथून ५० किलोमीटरवर अंतरावर असलेले हरसूल येथे शिक्षण अशी त्यांची कसरत सुरु होती. पुढे त्यांनी भोंसला मिलिटरी स्कूलमध्येच महाविद्यालयीन शिक्षण घेतले. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन आणि कविता यांची यशासाठी लढण्याची जिद्द यामुळे त्यांनी अनेक यश प्राप्त केले. त्यांची गती आणि यश पाहता, कविता यांना पंचक्रोशीत ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यांची कामगिरी पाहता पुढे त्यांना बाराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रिओ स्पर्धेचे तिकीटही मिळाले. अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास, १२ मिनिटे, ५० सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्यासोबतच १० हजार मीटर अंतराच्या स्पर्धेत ३४ मिनिटे ३२ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली.
कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारतासाठी पदक मिळवणार्या त्या पहिल्या महिला अॅथलिट ठरल्या. त्यांनी या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून नवा विक्रम रचला होता. २०१० मध्ये १० हजार मीटरच्या स्पर्धेत कांस्यपदकाचीही त्यांनी कमाई केली होती. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेमध्ये १० हजार मीटरमध्ये कविता यांनी रौप्यपदक पटकावले होते. २०१२ मध्ये त्यांना ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. पुढे केनियामध्ये आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने त्यांना प्रवेश मिळाला नाही. २०१३मध्ये झालेल्या सतराव्या ‘फेडरेशन कप सिनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत त्यांनी १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर २९ एप्रिल २०१३ रोजी कविता यांचा महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळामध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेल्या महेश तुंगार यांच्याशी विवाह झाला. संसार थाटला असला तरी त्यांनी कारकिर्दीकडे पाठ फिरवली नाही. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांची यशस्वी कारकिर्द चालूच ठेवली. आयुष्याच्या चढ-उतारामध्ये परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आतापर्यंत अनेक पदकांवर स्वतःचे नाव कोरले. जागतिक स्तरावर भारताचा झेंडा फडकवणार्या कविता या अवघ्या महाराष्ट्राच्या आदर्श बनल्या. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी व शिस्त या गुणांचे महत्त्व त्यांनी सिद्ध केले. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळविता येत नाही, तर अपयश आले तरी न खचता त्याचा सामना करायचा, असा मंत्र त्यांच्या या जीवन संघर्षातून मिळतो. दरम्यान, ‘लॉकडाऊन’दरम्यान त्यांनी स्थापन केलेल्या ‘कविता राऊत फाऊंडेशन’अंतर्गत मजुरांना मदत करून संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून वंदन...