भ्रामक ’पोस्ट’मुळे नेत्यांना दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020   
Total Views |
Political_Campaign _1&nbs



लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया साईट्सचे सर्वेक्षण नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. फेक न्यूज, द्विअर्थी किंवा कमरेखालचे विनोद, अश्लाघ्य भाषेतील टीका, चुकीची माहिती पसरवणार्‍यांचे भविष्य अंधःकारात ढकलणारे निष्कर्ष या संशोधनातून उघड झाले आहेत


दादा, ताई, भावी आमदार-खासदार, साहेब सगळ्या लोकप्रतिनिधींना सोशल मीडियाविना आता पर्याय उरला नाही. ज्याचे जितके फॉलोअर्स जास्त, त्याची लोकप्रियताही तितकी जास्त, असे आजचे समीकरण. सरकारी निर्णयांवरच्या प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप आणि त्यासंदर्भात केल्या जाणार्‍या पोस्ट, या सगळ्यावर प्रतिक्रिया देणारे फॉलोअर्स... त्यांच्यात रंगणारे वाक्युद्ध. मग दोन कट्टर विरोधी समर्थकांतील पोस्ट, मीम्स, व्हिडिओज् हा सर्व खेळ भारतासारख्या देशाला काही नवखा राहिलेला नाही. अशाच लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया साईट्सचे सर्वेक्षण नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. फेक न्यूज, द्विअर्थी किंवा कमरेखालचे विनोद, अश्लाघ्य भाषेतील टीका, चुकीची माहिती पसरवणार्‍यांचे भविष्य अंधःकारात ढकलणारे निष्कर्ष या संशोधनातून उघड झाले आहेत.


फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत पोहोचणार्‍या लोकप्रतिनिधींबद्दल युजर्सना काय वाटते, या गोष्टींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतात ज्याप्रकारे सोशल मीडिया अकाऊंट वापरणार्‍या लोकप्रतिनिधींची प्रत्येकाची वेगळी शैली आहे, तशीच इतर देशांमध्येही जगभरातील नेत्यांची आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही याच यादीतले नाव... परंतु, सर्वेक्षण असे सांगते की, व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असला तरीही तो पोस्ट करत असलेल्या गोष्टींवर त्याची विश्वासार्हता ठरते.


सोशल मीडियावर द्विअर्थी विनोद, मीम्स शेअर करणार्‍या लोकप्रतिनिधींना जनता फारसे गांभीर्याने घेत नाही. फेक न्यूज, खोटी माहिती, खोटा इतिहास यांसारख्या चुकीच्या गोष्टी पसरवणार्‍या लोकप्रतिनिधींवरील विश्वासही उडून जातो. याचा थेट परिणाम म्हणजे, फॉलोअर्सची संख्या कमी होते. अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील एका अध्ययनात हे संशोधन करण्यात आले. या दरम्यान, नेत्यांच्या पोस्टबद्दल पाच महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्यात आल्या. सोशल मीडियावर भ्रामक गोष्टी पसरवणार्‍या एखाद्या नेत्याला लोक आपला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारत नाहीत. आपल्या पोस्टद्वारे विनोद करणार्‍या नेत्यावर जनता विश्वास ठेवत नाही, अशा वागण्यामुळे लोक आपल्या समर्थकांसह जनतेचाही विश्वास गमावतात. याचा परिणाम मतदानावरही पडू शकतो.


ओलिविया बल्क हा संशोधक या अभ्यासात सहभागी झाला होता. त्याच्या मते, लोक आपल्या नेत्याकडून कायम गांभीर्यता असलेल्या पोस्ट्स किंवा एखाद्या गोष्टीवरील प्रतिक्रियेच्या अपेक्षेत करतात. आपल्या नेत्याने जनतेशी खोटे बोलू नये, चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. मात्र, असे न करणार्‍या कुठल्याही नेत्याला नेटकरी फारसे गांभीर्याने घेत नाहीत. या अध्ययानानुसार, नेता केवळ खोटे बोलत असेल तर फॉलोअर्स गमावण्याची भीती तर असतेच, परंतु त्या नेत्यावरचा विश्वास आणि मत दोन्ही गमावण्याची शक्यता असते. या सर्वेक्षणात एकूण ४७६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि एलिझाबेथ वॉरेन यांच्याबद्दलची उदाहरणे दिली आहेत.


बरेचदा नेतेमंडळी विरोधकांना डिवचण्यासाठी उगीचच काहीतरी उकरून काढण्याच्या नादात जुनी माहिती, पोस्ट शेअर करून ताशेरे ओढण्याची स्पर्धा सुरू होते. अनेकदा समर्थकही भिडतात, मग जातीयवाचक किंवा अश्लाघ्य भाषेत टीकाही आणि पुन्हा यामुळे होणारा मनस्तापही. सुजाण समाज आणि जनता आपल्या नेत्याकडून असल्या गोष्टींची अपेक्षा कधीच ठेवत नाही. आपला नेता धीरगंभीर असावा, आपल्या समस्या ऐकून घेणारा असावा, सोशल मीडिया साईट्सवर प्रतिसाद आणि मदतीचे आश्वासन देणारा असावा, पथदर्शी असावा, अशी अपेक्षा कुठल्याही जनतेची आपल्या नेत्याकडून असेल, मग तो कुठल्याही देशाचा असो वा कुठल्याही पक्षाचा.


लाईक्स, पोस्ट आणि शेअर्स वाढवण्याच्या नादात अनेक पुढारी आपल्या प्रतिमेचा किंवा विचारधारेचा विसर पडून अनेकदा अशा पोस्ट शेअर करून स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतात. स्मार्टफोन्सच्या दुनियेत आपल्या भोवती फिरणारा प्रत्येकजण इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, याचा विसर अनावधानाने अनेकांना पडतो. नेमका याचाच फटका बसल्याने या नेत्यांची संपूर्ण कारकिर्द धोक्यात येऊ शकते. त्यामुळे माध्यम कुठलेही असो, नेते, लोकप्रतिनिधींनी व्यक्त होत असताना जनतेचा विश्वास गमावणे हे जनतेसाठी हिरमोड करणारे ठरेलच, परंतु, लोकप्रतिनिधींसाठीही धोक्याची घंटा ठरेल.




@@AUTHORINFO_V1@@