कोरोना प्रतिबंधाची सर्व काळजी घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात!
कोल्हापूर : कोल्हापूरजवळील वसगडे येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे. कलाकार, तंत्रज्ञांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.
पुणे, मुंबईतून आलेल्या कलाकारांचा क्वारंटाईन काळ संपला आहे. हे कलाकार कोल्हापुरातील हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. जुन्या युनिटमध्ये ६० हून अधिक लोक होते. नवीन युनिट केवळ १५ लोकांचे आहे. अन्य स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना घेऊन कोल्हापुरात नव्याने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.
वसगडे येथे २०१६ सालापासून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून १७ मार्चपासून या मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले होते. १९ मार्च रोजी मालिकेतील कलाकार व तंत्रज्ञांना पुणे, मुंबई येथे त्यांच्या घरी पाठवण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये काही अटी शिथिल केल्यानंतर कोल्हापुरात चित्रीकरण करण्यासाठी स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांनी पुढाकार घेतला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा केली. त्यानंतर राज्य शासनाकडेही पाठपुरावा करून नियमावली तयार करून घेतली. काही मराठी चॅनेल्सनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चित्रीकरणासाठी परवानगी मागितली. प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांना चौदा दिवस क्वारंटाईन करून चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात लवकरच अन्य मालिका व चित्रपट चित्रीकरणाला गती येण्याची शक्यता आहे.