हवाई : एक धगधगता ज्वालामुखी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020   
Total Views | 62

hawaii_1  H x W

 
 
 

निसर्गसंपन्न असलेल्या जगप्रसिद्ध हवाई बेटांवरील जैवविविधतेचा ज्वालामुखी धगधगू लागला आहे. रासायनिक कीटकनाशके या बेटाला कशा पद्धतीने पोखरत आहेत, त्याविषयी आढावा घेणार हा लेख..



हवाई ! उत्तर-प्रशांत महासागरात, आशिया आणि अमेरिका खंडांच्या बरोबर मध्यभागी असलेली बेटांची रांग. जगाच्या नकाशावर दृष्टीसही पडणार नाहीत एवढी छोटीशी ही बेटं. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे चार हजार किलोमीटर दूर असूनसुद्धा अमेरिकेचाच भाग असलेली ही बेटं कधीकाळी ज्वालामुखीतून निर्माण झाली. आजही तिथे सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. हवाई, काऊई, मॉलकाई, माऊई, ओआहू, लनाई, निहाऊ आणि काकोलाव्ही ही आठ मुख्य बेटं आणि इतर शेकडो लहान-लहान बेटांच्या समूहाला एकत्रितपणे ‘हवाई बेटं’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातले पन्नासावे राज्य म्हणून ही बेटं ओळखली जातात. ‘पॉलिनीशियन’ हे इथले मूळ रहिवासी. मात्र, १८४० मध्ये अमेरिकेने केलेल्या कायद्याने या बेटावरचे बहुसंख्य मूळ रहिवासी भूमिहीन झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीन, जपान, पोर्तुगाल, फिलिपिन्स, कोरिया इ. देशांतून इथे मजूर आणले गेले आणि या बेटांवर मिश्र समाजजीवन तयार झाले. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत ही हवाई बेटं म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच!

वनस्पती-प्राण्यांच्या सुमारे २५ हजार प्रजाती या बेटांवर आढळतात. वनस्पतींच्या १३०० प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद इथे झाली आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या आणि उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांना हवाई बेटं म्हणजे खजिनाच आहे. पर्वतरांगा, धबधबे, बराचसा भूभाग ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला असल्यामुळे इथली जमीन अत्यंत सुपीक! ऊस आणि अननसाच्या लागवडीसाठी ही हवाई बेटं पूर्वापार प्रसिद्ध होती. शेती हा जरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असला, तरी गेल्या काही वर्षांत पर्यटन उद्योग हा हवाई बेटांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ झाला आहे. पण आज या स्वर्गीय भूमीचे वाळवंट होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. इथल्या लोभसवाण्या निसर्गाला वाचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हवाई बेटांवरती जनआंदोलने आणि चळवळी होऊ लागल्या आहेत.

 

 
 
असा नेमका कसला धोका या बेटांना असावा? तो धोका आहे इथली जमीन विषारी होण्याचा! कृषी-जैवतंत्रज्ञान (असीेलहशाळलरश्र) कंपन्यांनी हवाई बेटं ही जनुकीय सुधारित बियाण्याच्या चाचणीसाठी निवडली आणि या बेटांचे रुपडे पालटायला सुरुवात झाली. ‘मोन्सॅन्टो’, ‘सिंजेंटा’, ‘हाय-ब्रेड’, ‘बीएएसएफ’, ’मायकोजेन सीड्स’, आणि ‘अ‍ॅग्रीजेनेटिक्स’ या बलाढ्य जैवतंत्रज्ञान कंपन्यांनी हवाई बेटांना आपल्या तंत्रज्ञानाच्या परीक्षणाचे केंद्र बनवले. निसर्गात ढवळाढवळ करण्याच्या अशा प्रयोगांचे काही भीषण परिणाम होऊ नयेत म्हणून असे प्रयोग एकाकी जागेत करावे लागतात. म्हणून जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी जगाचाच एक भाग असलेल्या, परंतु जगापासून फार दूर असलेल्या या बेटांची निवड केली गेली. साधारणपणे १९९० नंतर या कंपन्यांनी हळूहळू तिथे पाय रोवायला सुरुवात केली. पूर्वी छोट्या छोट्या शेतकर्‍यांकडून या बेटांवर शेती व्हायची. या बड्या कंपन्यांनी काही कालावधीतच छोट्या शेतकर्‍यांकडून जमिनी भाड्याने घेतल्या. हवाई बेटांवरचा बहुतांश भूप्रदेश कंपन्यांच्या अधिपत्याखाली आला. काऊई, मॉलकाई, माऊई आणि ओआहू या चार बेटांवरची सुमारे २५ हजार एकर जमीन कंपन्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याचा पहिला परिणाम म्हणजे इथली पारंपरिक पिकं बंद झाली. ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार १९८० पासून हवाई बेटांवरचे पारंपरिक फळं आणि भाज्यांच्या पिकांखालचे क्षेत्र निम्म्यापेक्षा कमी झाले आहे.
 
 

एकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणार्‍या हवाई बेटांना आज ९० टक्के अन्न आयात करावे लागते. कंपन्यांनी शोधलेल्या जनुकीय सुधारित पपई, सोयाबीन, कापूस यांची प्रायोगिक लागवड इथे सुरु झाली. आज जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्याचे हवाई हे जगातले सर्वांत मोठे केंद्र बनले आहे. ‘जनुकीय तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची राजधानी’ असे आज हवाई बेटांचे वर्णन केले जाते. १९८७ पासून आत्तापर्यंत हवाईमधल्या सुमारे साडेतीन हजार ठिकाणी या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. या पिकांबरोबरच आवश्यक असलेल्या रसायनांचीही फवारणी कंपन्यांकडून होऊ लागली. ‘क्लोरोपायरीफॉस’, ’अ‍ॅट्राझीन’, ’ग्लायफोसेट’, ’डीकंबा’, ’पॅराक्वाट’ अशा जालीम रसायनांची फवारणी कीटकनाशक म्हणून वा तणनाशक म्हणून कंपन्यांकडून होऊ लागली. ही रसायने किती प्रमाणात वापरावी यावर काहीही निर्बंध नव्हता. अमेरिकेच्याच ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या राष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कंपन्यांकडून ९० प्रकारच्या रसायनांचा वापर हा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा १७ पटींनी जास्त होता. हवाई बेटांवरचे हवामान अत्यंत अनुकूल असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने तिथे पिकं घेता येतात. हंगामी पिकं वर्षातून दोन-तीनदा एकाच जमिनीत घेतली जातात. त्यामुळे ३६५ दिवसांपैकी सुमारे ३०० दिवस या शेतांवर सतत रसायनांची फवारणी होते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने बंदी घातलेले ‘क्लोरोपायरीफॉस’ रसायन हवाई बेटांवर चाचण्यांसाठी मात्र सर्रास वापरले जाते. काऊई बेटावरच्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या एका अभ्यासात २०१३ ते २०१५ या दोन वर्षांच्या काळात १८ टन एवढा ‘मर्यादित वापरायोग्य कीटकनाशकांचा’ वापर कंपन्यांकडून झाला होता.

 
 
 

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे आत्तापर्यंत ज्यांचे वर्णन केले जात होते, त्या हवाई बेटांवरचे निसर्गसौंदर्य झपाट्याने या जैव-रसायन कंपन्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. अमेरिकेतल्या एकूण जैववैविध्यांपैकी एक तृतीयांश जैववैविध्य हे हवाई बेटांवर आढळते. मात्र, आज अमेरिकेत होणार्‍या जैववैविध्याच्या र्‍हासापैकी ७५ टक्के र्‍हास हा हवाई बेटांवरच होतो आहे. या बेटांवरच्या वनस्पती-प्राण्यांच्या एकूण ४३७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘अ‍ॅट्राझीन’, ’क्लोरोपायरीफॉस’ या महाघातक रसायनांचे अंश पिण्याच्या पाण्यात आणि हवेत मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. विकृतावस्थतेच जन्माला येणार्‍या मुलांचे प्रमाण वाढले आहे. या विकृतींचा थेट संबंध रसायनांच्या संपर्काशी असल्याचे इथल्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय संशोधकांनी सिद्ध केले आहे.

 
 

गेली सुमारे दहा वर्षं हवाई बेटांवरील स्वर्गीय निसर्गाची वाट लावणाऱ्या कंपन्यांविरोधात जनमानसात एक ज्वालामुखी धगधगतो आहे. लोक एकत्र येत आहेत, आंदोलने करत आहेत, त्याला काही प्रमाणात यशही येत आहे. कंपन्या कोणकोणत्या रसायनांचा वापर करतात त्याची माहिती स्थानिक लोकांना देणे बंधनकारक नव्हते, ते २०१४ च्या एका कायद्याने बंधनकारक करण्यात आले. २०१८ साली हवाई बेटांवर ’क्लोरोपायरीफॉस’युक्त सर्व रसायनांवर बंदी घालण्याचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये पास करण्यात आले. इथल्या जनआंदोलनांचे नेतृत्व करणारी पर्यावरण कार्यकर्ती आणि ’हवाई सीड्स’ संस्थेची संस्थापक जेरी डि पिएत्रो म्हणते, संघर्ष उभा राहिला नसता, तर आज हवाई बेटांवर जे काही निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता टिकून आहे तेही राहिले नसते. आम्हाला आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात घालायचे नाही. अमेरिकन शासन कंपन्यांचे हितसंबंध जपत असल्याने लोकचळवळींना पर्याय नाही. रसायनांच्या लाटेने ही सुंदर बेटं गिळंकृत होऊ नयेत यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू!

 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..