मुंबई : कोरोनाप्रतिबंधासाठी लॉकडाऊनकाळात २२ मार्चपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरीय रेल्वे आज (१५ जून) पासून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी धावली असली तरी पहिल्यात दिवशी नियोजनाचा अभाव आढळल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. जलदगती मार्गावरच ही लोकल धावल्याने प्रवाशांचे हाल झाल्याने ते संतप्त झाले. जलदगती मार्गावर लोकल चालवल्याने त्या काही ठराविक स्थानकांवरच थांबत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे तब्बल ८४ दिवसांनंतर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी लोकल धावली खरी; परंतु रेल्वेचा गोंधळ आणि प्रवाशांचे हाल पाहावयास मिळाले. दरम्यान, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी सध्या सकाळी ५.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत लोकलसेवा सुरू राहणार आहे.
आजपासून सुरू झालेल्या लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. परंतु काही ठराविक स्थानकांवर लोकल थांबत असल्याने मधल्या स्थानकांवरील प्रवाशांना रिक्षा व टॅक्सीला जादा पैसे मोजावे लागले. त्यामुळे रेल्वेने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी सुरू केलेली लोकल सेवा पहिल्याच दिवशी महाग पडली. लोकल ठराविक स्थानकांवर थांबत असल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाला आळा घालावा यासाठी लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यानुसार, पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई कर्मचारी, तसेच उर्वरित पालिका कर्मचारी या काही ठराविक लोकांना प्रवासाची मुभा आहे. सर्व सामान्यांना या लोकलचा वापर करता येणार नाही.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेने १६२ लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. चर्चगेट ते डहाणू मार्गावर एकूण ७३ गाड्या, ८ गाड्या विरार आणि डहाणू रोड या स्थानकादरम्यान धावणार आहेत. अनेक लोकल गाड्या चर्चगेट ते विरारपर्यंत धावणार आहेत. चर्चगेट ते बोरिवली दरम्यान काही जलद लोकल धावणार आहेत. या गाड्या जलद मार्गावरील स्थानकालच थांबणार आहेत. बोरिवलीनंतर त्या पुढील स्थानकात धीम्या गतीने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण २०० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. १०० अप मार्गावर आणि १०० डाऊन मार्गाव फेऱ्या असतील. सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या स्थानकादरम्यान १३० लोकल धावणार, यामधील ६५ या अप, तर ६५ डाऊन मार्गावर धावणार असून काही प्रमुख स्थानकांवर या लोकल थांबवल्या जातील.
लोकल प्रवासाचे नियम
लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जाणार आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळणार आहे, पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. जे कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ आहेत, त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, लोकलमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत ना फेरीवाला आणि नो पार्किंग क्षेत्र असणार आहे. प्रत्येक स्टेशनबाहेर इमर्जन्सी सेवा म्हणून रुग्णवाहिका तत्पर राहणार आहे.
पत्रकार व बँक कर्मचाऱ्यांना रेल्वेबंदी
अत्यावश्यक सेवेत पत्रकार व बँक अधिकारी व कर्मचारी मोडत असल्याने त्यांना लॉकडाऊनच्या काळातही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी धावणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करण्यास पत्रकार व बँक अधिकारी- कर्मचारी यांना बंदी घातली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता प्रत्येकापर्यंत बातम्या पोहोचवणाऱ्या पत्रकारांवर अन्याय केल्याची चर्चा प्रवासी व सर्वसामान्यांमध्ये रंगल्याचे पाहावयास मिळाले. पत्रकार अत्यावश्यक सेवेत मोडत असून रेल्वे प्रवास बंदी का, असा सवाल ट्विटद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना मुंबईकरांसह लोकांनी विचारला आहे.