भारतीय रत्न मीराबाई चानू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020   
Total Views |


mirabai chanu_1 &nbs
‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन पुरस्काराने गौरवलेल्या साइखोम मीराबाई चानू हिच्या नावाची आता ‘अर्जुन पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात आली आहे. तेव्हा, जाणून घेऊया तिचा सुवर्णप्रवास...


क्रिकेट आणि इतर खेळांप्रमाणे ऑलिम्पिकसारख्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे एक वेगळे स्थान आहे. असाच आणखीन एक खेळ म्हणजे वेटलिफ्टिंग. या खेळामध्येही भारतीय खेळाडूंनी जगभरातील अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे. तसा हा खेळ वरवर जरी सोप्पा वाटत असला तरी या खेळामध्ये शक्ती आणि आत्मविश्वास या दोन गोष्टींची गरज नक्कीच लागते. खेळाडूच्या वजनानुसार अनेक गट केले जातात. आतापर्यंत झालेल्या अनेक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भारताला प्रबळ दावेदार मानले जाते. सध्याच्या घडीला भारताकडे काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी या खेळामध्ये कौशल्य प्राप्त केले आहे. कोरोनाच्या या वादळामध्ये जर सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये होणार्‍या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारत नक्कीच चांगली कामगिरी करेल, अशी आशा जागतिक वेटलिफ्टिंग विश्वामध्ये व्यक्त केली जात आहे. यावेळी सर्वांचे लक्ष असेल ते मीराबाई चानूच्या कामगिरीकडे. मागील काही वर्षांत वेटलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या या खेळाडूची शिफारस आता ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
 

मीराबाई चानू म्हणजेच साइखोम मीराबाई चानू हिचा जन्म ८ ऑगस्ट, १९९४ रोजी मणिपूरमधील इंफाळ जिल्ह्यात झाला. तिचे वडील हे लोक निर्माण विभागामध्ये कार्यरत होते, तर तिची आई ही दुकान चालवत असे. तिला एकूण पाच भावंड आणि मीराबाई त्यांमध्ये सर्वात धाकटी. कुटुंबाला तिच्यातील सामर्थ्याची चुणूक वयाच्या बाराव्या वर्षीच लागली होती. तिच्या कुटुंबाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अनेक वेळा सरपणासाठी लागणारी लाकडांची जड मोळी मीराबाई सहजपणे उचलत. यातूनच तिच्यामधील ताकदीची ओळख कुटुंबाला झाली. मीराबाईला तसे लहानपणापासूनच वेटलिफ्टिंगचे कुतूहल होते. इंफाळ जिल्ह्यातून आलेल्या वेटलिफ्टिंग खेळाडू कुंजरानी देवी या तिच्या आदर्श. त्यांचा एक खेळ बघूनच तिने पालकांना सांगितले की, “मलाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे.” यावर तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबाही मिळाला आणि वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली. पुढे २००८ मध्ये इंफाळमधील ‘खुमान लाम्पक क्रीडा संकुला’मध्ये वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली. त्यावेळी तिच्या जवळपास कुठल्याच गावांमध्ये वेटलिफ्टिंगचे केंद्र नव्हते, त्यामुळे दररोज तिला घरापासून ४४ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. या खेळासाठी तिच्या प्रशिक्षकांनी दररोज मांसाहार आणि दुधाचा आहार घेण्यास सांगितले होते. मात्र, तिच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे दररोज हा आहार घेणे तिला शक्य नव्हते. या सर्व संकटांना सामोरे जात तिने यावर मात केली. वयाच्या अकराव्या वर्षी एका स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. यामुळे तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. २०११ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप आणि दक्षिण आशियाई ज्युनिअर गेम्स या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. या विजयापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. २०१३मध्ये तिने गुवाहाटीमध्ये झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि ‘बेस्ट लिफ्टर’चा पुरस्कार पटकावला. अखेर तिला २०१४च्या ग्लासग्लोवमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली. या स्पर्धेमध्ये तिने १७० किलो वेटलिफ्टिंगकरून रौप्यपदक पटकावले.
 
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील तिच्या कामगिरीने सर्व भारतीयांचे लक्ष वेधले. मीराबाईच्या याच कामगिरीवर २०१५ मध्ये भारतीय रेल्वेने तिची वरिष्ठ तिकीट कलेक्टर म्हणून नेमणूक केली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो जो तुम्हाला लढायला शिकतो, असाच एक क्षण तिच्याही आयुष्यामध्ये आला होता. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली. मात्र, या स्पर्धेमध्ये तिची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. या स्पर्धेत तिला कुठलेही पदक मिळाले नाही. या अपयशानंतर ती खचून गेली होती. अनेक स्तरांमधून तिच्यावर टीका होऊ लागली. या सर्वाला कंटाळून तिने खेळ सोडण्याचाच विचार केला होता. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा एकदा तिने मनाची समजूत काढली आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली आणि पुढे तिने इतिहास घडवले. २०१७ मध्ये अमेरिकेमधील अ‍ॅनिहाइम, कॅलिफोर्निया येथे आयोजित ‘वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप’मध्ये मीराबाईची ४८ किलो गटामध्ये निवड झाली. तब्बल २२ वर्षांनंतर या स्पर्धेमध्ये मीराबाईने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. २०१८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने ४८ किलो वजनी गटामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले. याचवर्षी तिला ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तसेह याचवर्षी तिला ‘पद्मश्री’ पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले. पुढे २०१९ मध्ये कतारमध्ये झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत तिने सुवर्णपदकाची कमाई केली आणि टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. आता ‘अर्जुन पुरस्कारा’साठी तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 
@@AUTHORINFO_V1@@