मराठमोळा ‘ऑस्कर’प्रवास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020   
Total Views |
bhanu_1  H x W:



चित्रपट जगतात सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ऑस्कर’ पुरस्कारावर ‘पहिली भारतीय महिला ऑस्कर विजेती’ म्हणून आपले नाव कोरणार्‍या भानू अथैय्या यांच्या कलाप्रवासाचा लेखाद्वारे घेतलेला हा आढावा...




कोल्हापूरच्या अण्णासाहेब राजोपाध्ये यांच्या घरी २८ एप्रिल, १९२९ रोजी भानुमतीचा जन्म झाला. कुटुंब कर्मठ आणि परंपरावादी असले तरी अण्णासाहेबांनी चौकट मोडत चित्रकलेच्या क्षेत्रात करिअर केले. वडिलांना चित्र काढताना पाहणं लहानग्या भानूला फार आवडे. चित्र काढून झाल्यावर बाबा तिला रंग, ब्रश साफ करायला सांगत. हे सगळं करत असताना चिमुकल्या भानूला चित्रकलेची गोडी लागली. वयाच्या नवव्या वर्षी भानूचे पितृछत्र हरपले आणि त्याचबरोबर तिने आपला चित्रकलेचा एकमेव गुरुही गमावला. मात्र, तिची चित्रकलेतील रुची पाहून आई शांताबाईंनी तिला घरीच चित्रकला शिकवण्याची व्यवस्था केली. त्याकाळी स्त्रियांनी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे, या गोष्टीला मान्यता नव्हती. त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. घरीच चित्रकला शिकणार्‍या भानूंना रेखाचित्र काढण्याची आवड होती.


शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे त्यांनी चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘फाईन आर्ट्स’ शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी त्या सुवर्णपदक पटकावत उत्तीर्ण झाल्या. शिक्षण घेत असताना त्या त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावरसुद्धा त्या अशी प्रदर्शने आयोजित करत होत्या. त्यानंतर त्यांनी मासिकांमधून ‘फॅशन इलिस्ट्रेटर’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक फॅशन बुटीकसाठी त्यांनी काम केले. त्यांनी केलेले डिझाईन अनेक कलाकारांना आवडल्यामुळे त्यांना चित्रपटासाठी कपडे डिझाईन करण्याची कामे मिळू लागली. १९५५ साली आलेल्या गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘प्यासा’, ‘साहब बिबी और गुलाम’, ‘वक्त’, ‘तिसरी मंजिल’, ‘गाईड’, ‘लीडर’, ‘गंगा जमुना’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘खिलौना’सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. १९६०च्या दशकात ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘ईव्हज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नर्गिस प्रभावित झाल्या. नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री ४२०’च्या वेशभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दरम्यानच्या काळात सत्येंद्र अथैय्या यांच्याशी भानू यांनी विवाह केला आणि ‘भानुमती राजोपाध्ये’ ‘भानू अथैय्या’ झाल्या.


त्यांनी डिझाईन केलेल्या वेशभूषा १९६० आणि १९७०च्या दशकात खूप गाजल्या. चुडीदारची फॅशनही त्यांच्यामुळेच ट्रेंडमध्ये आली. ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी १९८० मध्ये महात्मा गांधींवर चित्रपट करण्याचे ठरवले. त्यासाठी ते भारतात आले. त्याकाळातील पेहराव व्यवस्थित दिसावे, यासाठी त्यांनी भारतीय वेशभूषाकारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.


दरम्यानच्या काळात भानू अथैय्यांना हिंदी चित्रपटक्षेत्रात काम करून २५ वर्षं झाली होती. त्यांनी ‘सिद्धार्थ’ या इंग्रजी चित्रपटासाठीदेखील काम केले होते. त्यांनी दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांची भेट घेतली. तब्बल १५ मिनिटे त्यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान अटनबरोंना अथैय्यांची भारत आणि भारतीय जीवनाबद्दल असलेली समज लक्षात आली आणि त्यांनी ‘गांधी’ या चित्रपटासाठी भानू अथैय्यांची निवड केली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा भानू यांच्या जीवनावर विशेष प्रभाव होता. ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांनी इतर कामे बाजूला ठेवून या चित्रपटावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले.


इंडो-ब्रिटिश को-प्रोडक्शनचा हा महत्त्वपूर्ण चित्रपट होता. वेशभूषा विभागात इतर सहकारी, मदतनीस होते. मात्र, डिझाईनिंगची संपूर्ण जबाबदारी अथैय्यांवर होती. यात त्यांना गांधी आणि कस्तुरबांच्या जीवनातील कपड्यांचा बदल म्हणजे स्वदेशी आणि खादी असा तो काळ हुबेहूब दाखवायचा होता. त्यासाठी कपडा कोणता, त्यावरची कलाकुसर, मेकअप, दागिनेही या सर्व बाजू त्या समर्थपणे सांभाळत होत्या. ‘गांधी’ हा चित्रपट ३० नोव्हेंबर, १९८२ला जगभरात इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. १९८२ मध्ये या चित्रपटाच्या वेशभूषेसाठी भानू अथैय्यांना ‘ऑस्कर’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. ‘ऑस्कर’ पटकावणार्‍या त्या पहिला भारतीय महिला ठरल्या. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर पुरस्कारांनीदेखील त्यांना सन्मानित केले गेले. ‘प्यासा’, ‘गांधी’, ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ हे चित्रपट त्यांच्या करिअरमधे मैलाचा दगड ठरले. ‘स्वदेस’ चित्रपटानंतर त्यांनी काम करणे मात्र थांबवले.


आपल्या मागे आपण मिळवलेल्या मानाच्या पुरस्काराची योग्य ती देखभाल केली जाणार नाही, त्यापेक्षा ‘ऑस्कर’ संग्रहालयात त्याला अधिक सन्मान मिळेल, असे कारण देत २०१२ साली त्यांनी ‘ऑस्कर’ पुरस्कार संग्रहालयाकडे सुपूर्द केला. सर्वोच्च मानाचा ‘ऑस्कर’ पुरस्कार पटकावणार्‍या या पहिल्या भारतीय महिलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा सलाम!!


@@AUTHORINFO_V1@@