चीनच्या आक्रमकतेला भारताचे जशास तसे उत्तर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020   
Total Views |


india china_1  


एकीकडे भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई चालू असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि चीनबरोबर संघर्षही वाढत आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या विरोधातील चकमकी वाढत आहेत आणि त्याच वेळी सीमेवर चीनबरोबरील तणाव वाढतो आहे. पण, भारताने चीनला जशात तसे उत्तर दिल्याने चीनने सध्या तरी नमते घेतलेले दिसते.


लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन सीमावाद उकरून काढत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावर भारतासह ७२ देशांनी चीनची कोंडी केल्यानंतर, भारताला जखडून ठेवण्यासाठी चीनने सीमेवर आक्रमक कारवाया सुरू केल्या आहेत आणि आता चीनचा समाचार घेण्याची हीच वेळ आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय उपखंडात, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार या सर्व देशांत चीन आपले जाळे विणत आहे. या सर्व देशांत अफाट गुंतवणूक करीत, भारताला उपखंडात अडकवून ठेवण्याची चीनची चाल आहे. लडाखमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून, दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारने सीमा भागामध्ये सुरू असलेली विकास कामे कुठल्याही परिस्थितीत थांबवायची नाहीत, हा निर्धार केला आहे. चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्या वेळीच दाखवून दिले होते. त्यामुळे आतासुद्धा लडाखमध्येही दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. सीमेवर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी तंबू ठोकले असून तिथे अतिरिक्त सैन्य तुकड्यांची कुमक, साहित्य आणि आवश्यक रसद पाठवण्यात आली आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही. भारताने आतापर्यंत फक्त एकदाच या संपूर्ण वादावर अधिकृत भाष्य केले असून, चीनला या संघर्षाच्या स्थितीसाठी जबाबदार धरले आहे.
 


भारत-चीन सीमेवर तणाव
 


वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. चीनने लडाखच्या पूर्व भागतल्या पँगोंग त्सो तलावात गस्तीनौका वाढवल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी याच तलावाजवळ भारत आणि चिनी जवानांमध्ये चकमकही झाली होती. लडाखमधील नियंत्रण रेषेजवळचा हा परिसर आहे. २०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली, तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या लडाख भागातल्या आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणार्‍या पूर्व लडाखमधले आहेत. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. नथुला पासजवळ भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त याच वर्षी १० मे रोजीचं आहे. ही खिंड भारतात सिक्कीम आणि तिबेटमध्ये दक्षिणेकडच्या चुम्बी खोर्‍याला जोडते. लडाखच्या गॅलवान व्हॅली या भागामध्ये मोठा तणाव आहे. कारण, भारतातर्फे बांधकाम सुरू आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने अत्याधुनिक धावपट्टीसुद्धा बनवली आहे. ही जगातील सर्वात उंचावरील धावपट्टी असून इथे इंडियन एअर फोर्सचे सी-१३० जे विमान उतरू शकते. सामरिक दृष्टीने भारतासाठी ही महत्त्वाची बाब आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डी याच मार्गाने भारत काराकोरम हायवेपर्यंत पोहोचू शकतो. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंतचा रस्ता २०१९ सालीच बांधून पूर्ण झाला आहे.
 


अक्साई चीनमधल्या गॅलवान खोर्‍याजवळ चिनी सैन्याचे तंबू सॅटेलाईटमधून काढलेल्या फोटोग्राफमध्ये स्पष्ट दिसून आले. अर्थात भारतानेही सीमेजवळच्या आपल्या भागात सैन्याची तैनात वाढवली. गॅलवान खोर्‍याजवळ भारत संरक्षणविषयक बेकायदेशीर बांधकाम करत असल्याचा चीनचा आरोप आहे. यामागचं कारण म्हणजे, भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका करारात दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलं आहे. मात्र, चीनने आपल्याकडच्या भागात या आधीच आवश्यक सैन्यउभारणी केली आहे आणि आता मात्र आहे ती परिस्थिती कायम ठेवावी, असं चीनचं म्हणणं आहे. मात्र, आपली सैनिकी बाजू बळकट करण्यासाठी भारतालाही लष्करी बांधकाम करायचं आहे. १३४ किमी लांब पँगोंग त्सो तलाव हिमालयात समुद्रसपाटीपासून जवळपास १४ हजार फुटांहून अधिक उंचीवर आहे. या तलावाच्या ४५ किमी क्षेत्रफळाचा भाग भारतात आहे, तर ९० किमीचा परिसर चीनमध्ये आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या तलावाच्या मधून जाते. पश्चिम सेक्टरमध्ये चीनकडून होणार्‍या अतिक्रमणाच्या घटनांपैकी एकतृतीयांश घटना याच पँगोंग त्सो तलावालगतच्या परिसरात होत आहेत. २०१७ साली डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात बराच वाद झाला होता. ८२ दिवस हा वाद पेटला होता. भारतीय सैन्याने अखेर चीनला येथून माघार घेण्यास भाग पाडले. हा भूभाग सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. चीनने डोकलाममध्ये रस्ता बांधला असता, तर ईशान्य भारताला देशाशी जोडणार्‍या २० किमीच्या अरुंद सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेकपर्यंत पोहोचणे शक्य झाले असते, ज्यामुळे युद्धकाळामध्ये ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करता येणे शक्य होते. आठवत असेल की, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये काही उग्रवादी आणि दहशतवादी संघटनांनी आम्ही हा अरुंद रस्ता बंद करू, अशीच धमकी दिलेली होती.


चीन नेपाळच्या मानगुटीवर


अमेरिकेप्रमाणे चीनला आव्हान देऊ शकेल किंवा चीनच्या दडपणासमोर निर्भीडपणे उभा राहू शकेल, असा भारत एकुलता एक देश आहे. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आर्थिक मांडलिकत्व निर्माण करणे आणि त्यांच्यामार्फत भारतविरोधात अन्यायाचा, दडपशाहीचा आरोप हा चीनचा मार्ग आहे. हेच नेपाळमध्ये होत आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान ओली यांची खुर्ची स्थिर नाही. पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड आणि माधव नेपाळ या माजी पंतप्रधानांकडून त्यांना आव्हान मिळत आहे. चीनच्या, नेपाळमधील राजदूताने ओलींना पाठिंबा दिला व त्यांच्या विरोधकांना सरळ केले. त्याची किंमत अभूतपूर्व आहे. ओलींना म्हणावे लागले की, “भारत कोरोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहेत.” कारण, चीन नेपाळच्या मानगुटीवर बसलेला आहे.


काय करावे?


गेल्या तीन आठवड्यांपासून लडाख, सिक्कीम भागात चीन घुसखोरी करून भारतावर दबाव आणत आहे. त्याचबरोबर नेपाळला भारताविरोधात फितूर केले आहे. भारताने चीनविरोधात कणखर भूमिका घ्यायला हवी, जशी आपण डोकलाम प्रसंगात घेतली होती. सध्या जग कोरोनामुळे हैराण झाले आहे आणि चीनविरोधात गेले आहे. चीन, पाकिस्तानच्या मदतीने भारतीय उपखंडात दहशतवाद आणि अराजकता माजवून भारताला अडकविण्याचा प्रयत्न करत आहे आणि खेदजनक म्हणजे, भारतात काही व्यक्तींकडून याकामी त्यांना मदतही मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची चौकशी व्हावी यासाठी जगभरातून दबाव तयार होत आहे. जून महिन्यापासून भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार आहेत. चौकशी होऊ नये, यासाठी चीन भारतावर दबाव टाकत आहे. कोरोनामुळे सर्व देशांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. जगभरात अशी परिस्थिती असताना त्या तुलनेत भारत मजबूत स्थितीत उभा आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर ज्याप्रमाणे गोळीबार होतो, तसा भारत-चीन सीमेवर होत नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की होते. चीन आपल्या वस्तू भारतात विकून प्रचंड नफा कमवितो. त्यामुळे त्यांची आर्थिक ताकत वाढते. ही आर्थिक ताकद चीन लष्कर बलाढ्य करण्यास वापरतो. म्हणजे भारतात कमावलेल्या पैशांचा वापर करून चिनी सैन्य भारताला त्रास देते. त्यामुळे भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायलाच हवा. यामुळे चीनची आक्रमकता कमी करण्यात आपल्याला यश मिळेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@