’१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ची मूळ मराठी प्रत सौजन्यः स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये प्रचंड संशोधन करून लिहिलेला ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सगळ्याच दृष्टीने ऐतिहासिक ठरला. ‘क्रांतिकारकांची गीता’ ठरलेल्या या ग्रंथावर प्रकाशनाआधीच बंदी आली होती. प्रकाशनाआधीच बंदी आणलेला बहुधा हा जगातील पहिलाच ग्रंथ असावा. या ग्रंथाने इतिहास निर्माण केला, तसेच त्याच्या मूळ हस्तलिखिताचा आणि प्रकाशनाचा इतिहासही रोमहर्षक आहे.
सावरकर आणि त्यांच्या लंडनमधील सहकार्यांनी या पुस्तकाचे हस्तलिखित लंडनबाहेर नेऊन भारतीय सीमाशुल्क अधिकार्यांची कडक दक्षता चुकवून भारतात आणण्यास यश मिळवले. बाबाराव सावरकरांनी मुद्रक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, कोणीही नसती जोखीम घ्यायला तयार नव्हते. शेवटी साप्ताहिक ’स्वराज’चे संपादक, सोलापूरचे लिमये छापण्यास तयार झाले, पण इंग्रजांना याचा सुगावा लागताच त्यांना छापा टाकण्याच्या धमक्या येऊ लागल्या. परिणामी, लिमयेंनी माघार घेतली. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक नामांकित मुद्रणगृहांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याने भारतात पुस्तक प्रकाशित करणे जवळजवळ अशक्य झाले होते. म्हणून मग बाबारावांनी हस्तलिखित पॅरिसला परत पाठवले. पण तिथेही फ्रेंच गुप्तहेरांनी फ्रान्समधील क्रांतिकारक चळवळी दडपण्यासाठी इंग्रजांसह हातमिळवणी केली होती, त्यामुळे तिथेही कोणी फ्रेंच मुद्रक मिळू शकला नाही.
जर्मनी ही ‘इंडोलॉजी’ आणि संस्कृत शिकण्याचे ठिकाण असल्याने त्यांच्याकडे देवनागरी लिपी असण्याची शक्यता होती. मग जर्मनीमध्ये हे पुस्तक छापण्याचे ठरले. परंतु, तेथील जुळार्यांना मराठीचा कसलाच गंध नसल्याने त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. मग असा विचार करण्यात आला की, या मराठी ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केल्यास प्रकाशन करण्यासही सोपे जाईल व मोठा वाचकवर्गही लाभेल. म्हणून मग या उद्देशाने लंडनमध्ये कोरेगांवकर, फडके आणि कुंटे या अभिनव भारतच्या काही सदस्यांनी व्ही. व्ही. एस. अय्यरांच्या देखरेखीखाली पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्याचे ठरवले. पुन्हा एकदा मराठी व इंग्रजी प्रत फ्रान्स व जर्मनीमधून प्रकाशित करण्याचे प्रयत्न करून पाहिले पण त्यात पुन्हा अपयश आले. शेवटी १९०९ला हा ग्रंथ हॉलंडला ’The Indian War of Independence of १८५७’ या नावाने प्रसिद्ध झाला. ब्रिटिश गुप्तहेर आणि आरक्षींना हूल देऊन त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पुस्तक फ्रान्समध्ये छापले जात आहे अशी क्रांतिकारकांनी अफवा पसरविली आणि अखेर पुस्तक यशस्वीरित्या छापून वितरणासाठी सिद्ध झाले.
’१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ची इंग्रजी प्रत सौजन्यः संकेत कुलकर्णी, लंडन
इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी नसल्याने गुप्तपणे विक्री करून अनेक ठिकाणी वितरीत करण्यात आले. ‘द स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज’ (SOAS) व इंडिया ऑफिस लायब्ररी (IOL) मध्ये पहिल्या आवृत्तीच्या प्रती ठेवण्यात आल्या आहेत. अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी हे पुस्तक भारतात पाठवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या होत्या. 'The Posthumous Papers of the Pickwick Club', 'Scott’s Works' आणि 'Don Quixote' यासारख्या निरुपद्रवी आणि बनावट नाव असलेल्या कलात्मक वेष्टनात प्रती लपवून, खोक्यावर खोटी लेबलं लावून भारतात पाठवण्यात आले. याची दुसरी आवृत्ती अमेरिकेत गदर पार्टीतर्फे ’लाला हरदयाळ’ यांनी तर तिसरी आवृत्ती ’सरदार भगतसिंग’ यांनी व चौथी आवृत्ती ’नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांनी प्रसिद्ध केली होती. काँग्रेस शासनाने १९४६ ला या ग्रंथावरील बंदी उठवली. पॅरिसला असणार्या मादाम भिकाजी कामा यांनी दहा शिलिंगला प्रती उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांनी फ्रान्समधून दुसरी आवृत्तीही प्रकाशित केली होती. सावरकरांनी मूळ मराठी हस्तलिखित सुरक्षित ठेव म्हणून त्यांच्याकडे दिले होते व त्यांनी ते पॅरिसला बँक लॉकरमध्ये ठेवले होते. तथापि, पहिल्या महायुद्धात बँकेसह हस्तलिखितही नष्ट झाले असा एक सर्वसाधारण समज झाला होता.
पण, १९०९च्या उन्हाळ्यात सावरकरांनी ’१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाचे मूळ मराठी हस्तलिखित रेशमी दोरा बांधून ‘डॉ. जोकीम डी सिक्वेरा कुटीन्हो’ यांना दिले. त्याच मध्यरात्री डॉ. कुटीन्होंनी हस्तलिखितासह लंडन सोडले व गुप्तपणे लिस्बनला प्रयाण केले. त्या हस्तलिखिताभोवती इंग्रजी, फ्रेंच, व अमेरिकन रुक्ष पुस्तकांची वेष्टन घालून पोर्तुगीज क्रांतिकारकांच्या साहाय्याने पोर्तुगीज वकिलातीत ठेवले. १९०९च्या मध्यात लिस्बनला एमपीटी आचार्य व डॉ. कुटीन्होंची भेट झाल्यावर हस्तलिखिताचे स्थान पुन्हा बदलले. आचार्य लंडनला गेले व त्यांनी ’१८५७ चे स्वातंत्र्यसमर’चे इंग्रजी भाषांतरित पुस्तक (कच्ची मुद्रित प्रत तांबड्या जाड पुठ्ठ्याची) डॉ. कुटीन्होंकडे गुप्तपणे पाठविले. नंतर डॉ. कुटीन्हो बर्लिनला गेले व नंतर तेथून अमेरिकेत स्थायिक झाले.
डॉ. कुटीन्होंनी इंग्रजी प्रतीवरून फ्रेंच भाषेत भाषांतरीत करून पॅरिसला पाठविले. तेथे लाला हरदयाळांचे स्नेही व मार्सेलिस प्रकरणाला प्रथम आपल्या पत्रात वाचा फोडणारे प्रसिद्ध समाजवादी पुढारी मॉ. अर्नेस्ट पायरी (Ernst Pierrot) यांनी जुलै १९१४ ला आपल्या 'Le Europµenn' या मासिकात 'Le Savarkar martyr nationaliste hindou' या शीर्षकाखाली चार पानी उत्कृष्ट अभिप्राय दिला. त्याच्या प्रती हॉलंड, बर्लिन, अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड, पोर्तुगाल येथे पाठविण्यात आल्या होत्या. चाळीस वर्षे ती हस्तलिखित प्रत डॉ. कुटीन्होंनी जतन करून ठेवली व नंतर त्यांचे शिष्य, भोसला सैनिकी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व लखनौ विद्यापीठाचे प्रा. द. त्र. गोहोकरांकडे १५ ऑगस्ट १९४७ ला सकाळी ७.३० ला सुपूर्द केली. त्यासोबत अभिनव भारताचे गुप्त कागदपत्र, पत्रके, ’वंदे मातरम’ व ’तलवार’ वृत्तपत्राची बाडेसुद्धा दिली. गोहोकरांद्वारे त्यांनी डॉ. मुंजेंना पत्र लिहिले व लगेच सावरकरांना ही वार्ता कळविण्यात आली, अशाप्रकारे जगभर प्रवास करून मूळ मराठी हस्तलिखित प्रत भारतात आली. अनेक संकटे येऊनही चाळीस वर्षे ते हस्तलिखित सुरक्षितपणे जतन करून पुन्हा योग्य वेळ येताच ग्रंथकर्त्यास सुपूर्द करणार्या डॉ. कुटीन्हो यांचेही स्मरण करणे आवश्यक आहे.
’स्वातंत्र्यसमर’चे जतनकर्ते- डॉ. कुटिन्हो- लेखक- वसंत, हिन्दू- अभिनव भारत अंक, १० मे १९५३
www.savarkar.org http://www.savarkar.org/
Sampath, Vikram, Savarkar: Echoes From A Forgotten Past- १८८३-१९२४, Penguin Publication, २०१९