अंदमानातून इंग्रजांना माफीची पत्रे पाठवून आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करून सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली. या गोष्टीचं भांडवल करून त्यामागची सत्य परिस्थिती काय होती, हे जाणून न घेता काही लोक सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवतात. असे लोक ‘सावरकरांची माफीपत्रे’ पुरावा म्हणून दाखवतात. ज्या लोकांना या पत्रांमागील सत्य काय आहे, हे ठाऊक नसतं ते या लोकांची शिकार होतात.
एखाद्या धूर्त व्यक्तीशी धूर्तपणे वागणेच गरजेचे असते. तुम्ही आपल्याच मतांना चिकटून राहिलात तर तुमचेच नुकसान होते.
ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट।
खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥
रामदासांचा हा श्लोक सावरकरांनी आचरणात आणला.
सावरकर माफीपत्र लिहून सुटले. मान्य ना, अगदीच मान्य! पण, मला सांगा शत्रूला गाफील ठेवणे ही युद्धनीती नाही का? इंग्रजांच्या सर्व अटी तात्पुरत्या मान्य करून जर इतक्या वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका करून घेता येत असेल, तर का करू नये त्यांनी तसं? जिथे चिटपाखरूही येऊ शकत नाही, अशा जागी राहून देशाची सेवा करता आली असती? सावरकरांना खूप मोठं कार्य करायचं होतं. अंदमानातही ते तेच करत होते. पण, हिंदुस्तानात येऊन ते केल्यास त्याचा आवाका मोठा असणार होता. केवळ सुटकेसाठी त्यांनी इंग्रजांच्या वाट्टेल त्या अटी मान्य केल्या नाहीत की इंग्रजांसमोर लाळघोटेपणा केला नाही. सुटकेसाठी देशाशी गद्दारीही त्यांनी केली नाही.
सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला होता. शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी आपण शत्रूला घाबरलोय हे भासविणे गरजेचे असते. त्याच्या अटी मान्य करून आधी स्वतःची सुटका करून घेणे आवश्यक असते. सुटका झाल्यानंतर शत्रूला दिलेला शब्द पाळायला शत्रू काय आपला सगेसोयरा असतो का? हातात सत्ता आल्यानंतर ती अधिक बळकट करून त्याच शत्रूवर प्रतिहल्ला करणे हीच तर खरी कूटनीती! ही कूटनीती न कळलेलेच सावरकरांना दूषणं देतात.
सावरकरांना तुरुंगातही इतर कैद्यांपासून वेगळे ठेवले होते. ’Dangerous' कैदी म्हणून त्यांच्या बिल्ल्यावर ’D' अक्षर कोरलेले होते. तब्बल ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली होती. सहा महिने कठोर एकांतवासात त्यांना ठेवले होते. इथे स्वतःच्या घरात १४ दिवस विलग राहा, सांगितल्यावर माणूस वेडापिसा होतोय, तर तिथे सहा महिने कोणाचेच दर्शन नसताना स्वतःचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी सावरकरच हवेत! तुमच्या आमच्यासारख्यांचं काम नव्हे ते. आम्हाला फक्त सावरकरांवर चिखलफेक करता येते.
इतर कैद्यांना साधारण दोन-तीन वर्षांनंतर बाकी कैद्यांच्यात मिसळता येत असे. पण सहा वर्षे झाली तरी सावरकरांना मात्र कसलीही सवलत मिळाली नव्हती. सावरकर आपल्या पत्नीला आठ वर्षांनंतर भेटू शकले होते आणि ते ही सर्वांसमक्ष. सावरकरांना शिक्षेत कोणतीही सवलत मिळू नये, यासाठी मुंबई सरकार प्रयत्नशील होते. सार्वजनिक शिक्षामाफीमध्ये सुद्धा त्यांचे नाव येऊ नये यासाठी ते जागरूक होते. एवढेच नाही तर सावरकर बंधूंना अंदमानातून भारतातल्या तुरुंगात हलविण्यासही त्यांचा आक्षेप होता. सावरकरांना अतिशय कठोरातल्या कठोर शिक्षा इंग्रज सरकार करत होते आणि सावरकर त्या सर्व शिक्षा भोगतही होते. जर सावरकरांनी इंग्रजांचं लांगूलचालन केलं असतं, तर त्यांच्याबाबतीत इंग्रज असे वागले असते का? त्यांना खूप सार्या सवलती मिळाल्या नसत्या का? पण नाही, आम्हाला या गोष्टी जाणून घेण्यात रस नाही. कारण, आम्हाला फक्त सावरकरांवर चिखलफेक करायची आहे.
११ वर्षांत सावरकरांनी सरकारला पाठवलेल्या आवेदनांचा उल्लेख सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात केला आहे. लपवून ठेवले नाही. क्रांतिकार्य करताना क्रांतिकारकांनी अकारण प्राणत्याग करू नये, असे सावरकरांचे ठाम मत होते. आपल्या हातून अजून मोठे आणि भरीव काम व्हावे, असे वाटत असेल तर देशाला आपली गरज आहे हे क्रांतिकारकांनी स्वतःच्या मनावर ठसविले पाहिजे. प्रसंगी थोडीशी माघार घ्यावी लागली तरी भविष्यात आपल्या हातून भरीव कामगिरी होण्यासाठी ती गरजेची आहे, असे सावरकरांना वाटत होते. आततायीपणा हा त्यांचा स्वभाव नव्हताच. क्रांतिकारकांनी क्षुल्लक कारणासाठी प्राणत्याग करू नये, असे त्यांना वाटायचे आणि आपले हे विचार वेळोवेळी त्यांनी मांडले आहेत.
सावरकरांनी केवळ स्वतःच्या सुटकेची मागणी करणारी पत्रेच इंग्रज सरकारला पाठवली नाहीत तर वेळोवेळी इतर कैद्यांच्या सुटकेसाठीसुद्धा त्यांनी प्रयत्न केले आहेत. पहिल्या महायुद्धानंतर सगळे देश अंतर्गत कैदी सोडून देत होते, तेव्हा सावरकरांनी “मला न सोडता इतर राजबंद्यांना सोडावे. त्यांच्या मुक्ततेत मला माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल,” असे निःस्वार्थी निवेदन सरकारला दिले होते. हे निवेदन देताना त्यांची तब्येत सततच्या कष्टांमुळे ढासळली होते. वजन खूप घटले होते. या पत्रात त्यांनी ‘मला सोडा’ अशी मागणी नव्हती केली. पण, सावरकरांच्या या पत्राचा उल्लेख करण्याएवढं मोठं मन असलं तर ना!
खरंतर सावरकर इंग्रजांना फसवायला बघत होते. पण, त्यांच्या जाळ्यात इंग्रज न फसता स्वकीयच फसले. ज्या देशवासीयांसाठी सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, अनेक कष्ट उपसले तेच लोक आज त्यांच्यावर प्रश्न विचारत आहेत. बाहेरचा शत्रू परवडला, पण घरातल्या शत्रूशी लढताना दमछाक होते. सावरकरांच्या बाबतीत दुर्दैवाने ते गेल्यानंतर आज इतक्या वर्षांनी हेच होतंय आणि ज्या माफीपत्रांचे उल्लेख करून सावरकर बाहेर आले असं म्हटलं जातं, ती कोणत्याही अटींशिवाय होतं का? म्हणजे मागितली माफी आणि केलं माफ, असं झालं होतं का? तर नाही. दोन अटींवर त्यांची तुरुंगातून सुटका केली गेली. एक म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि दुसरी म्हणजे रत्नागिरीच्या बाहेर परवानगीशिवाय जायचं नाही.
सावरकरांनी सुटकेसाठी इंग्रजांची कोणतीही अवाजवी मागणी मान्य केली नाही. प्रत्यक्ष राजकारणात भाग घेणार नाही, असे इंग्रजांना लिहून दिले. परंतु, राजकारण म्हणजेच राष्ट्रसेवा असते का? सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वाड्.मय अशा अनेक प्रकारे राष्ट्रसेवा केली जाते. प्रत्यक्ष हातात शस्त्र न घेताही कृष्णाने युद्धात भाग घेतला होताच की! सावरकरांनी सुद्धा प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय भाग घेतला नसला तरी समाजसुधारणेचं मोठं काम त्यांनी हाती घेतलं. समाजसुधारणा, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा, विज्ञाननिष्ठा याद्वारे त्यांनी राष्ट्रसेवा केली. रत्नागिरीमधील पतितपावन मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देणारे आणि त्यांच्या सोबत जेवणारे सावरकरच होते. समाजातून अनिष्ट चालीरीती नष्ट करून एक आदर्श समाज घडवण्यात सावरकरांचे योगदान भरपूर आहे.
सावरकरांप्रमाणे अनेकांनी ब्रिटिशांना माफीपत्रे पाठवली आहेत. मग सावरकरांनी पाठवली तर त्यात गाजावाजा करण्यासारखं काय आहे? बरं, सावरकरांनी माफीपत्र पाठवलं आणि इंग्रजांनी ते लगेच मान्य करून सावरकरांची सुटका केली, असं झालंय का? सावरकरांनी माफी मागितल्याने देशाचं काही नुकसान झालं का? सावरकर बाहेर आल्यावर हातावर हात घेऊन शांत बसले का? त्यांनी उर्वरित आयुष्य इंग्रजांच्या मर्जीनुसार व्यतीत केलं का? माफीपत्र हे सावरकरांच्या देशभक्तीचं मापन असू शकतं का? माफी मागितल्याने त्यांचं कार्य किंवा त्यांचा त्याग कमी ठरतो का? या सगळ्याचा विचार का केला जात नाही? सावरकर ‘माफीवीर’ होते म्हणून हिणवताना सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा काय होती, हे तरी या लोकांना माहीत आहे का? एकांतवास, खडी दंडाबेडी, खोडाबेडी, आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, आढाबेडी, साखळबेडी ही नावं तरी कुणी ऐकली असतील काय? जे सावरकरांनी भोगलं त्याची नावंसुद्धा माहीत नसलेले लोक आज त्यांच्याबद्दल असे उद्गार काढण्यास धजावतात हीच खरी शोकांतिका आहे.
(संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)
- प्राची चितळे-जोशी