त्रावणकोर, नेपाळ संस्थान पाठिंबा विवाद

    27-May-2020
Total Views | 382


savarkar_1  H x

 
तात्यारावांच्या आयुष्यातील अशीच एक घटना ज्यावरून त्यांच्यावर आक्षेप नोंदवला जातो ती म्हणजे, त्रावणकोर आणि नेपाळ सारख्या संस्थानांना त्यांनी दिलेला पाठिंबा. पण, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच सावरकरांनी त्रावणकोर व नेपाळला पाठिंबा दिला हे स्पष्ट होते.



क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपल्या देशातील जनतेच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ते निर्माण झालेले नसून एका विशिष्ट हेतूने निर्माण करण्यात आल्याचे अनेक पुरावे इतिहास अभ्यासल्यावर मिळतील. १९६६ साली सावरकरांचा मृत्यू झाला आणि लगेचच त्यांच्या विचारांची विपर्यस्त मांडणी सुरू झाली. तात्यारावांच्या आयुष्यातील घटना, त्यांची राजकीय मते, त्यांनी भाषणात उद्गारलेले, पुस्तकात किंवा वृत्तपत्रात छापून आलेले वाक्य संदर्भ सोडून लोकांपुढे मांडण्यात आले व सावरकरांची जनमानसात असलेली आदराची प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तात्यारावांच्या आयुष्यातील अशीच एक घटना ज्यावरून त्यांच्यावर आक्षेप नोंदवला जातो ती म्हणजे, त्रावणकोर आणि नेपाळ सारख्या संस्थानांना त्यांनी दिलेला पाठिंबा.
 

त्रावणकोर संस्थान व सावरकरांचे विचार

त्रावणकोर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील दक्षिणेतील एक अत्यंत प्रगतशील संस्थान होते. त्याकाळी सर सी. पी. रामस्वामी अय्यर हे त्या संस्थानाचे दिवाण होते. होमरूल लीगचे उपाध्यक्ष, मेधावी कायदेतज्ज्ञ, कुशल प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक म्हणून सर अय्यर विख्यात होते. त्रावणकोरच नव्हे, तर त्या काळातील सगळीच संस्थाने काँग्रेसचे मंत्रिमंडळं असणार्‍या प्रांतापेक्षा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत होती आणि हे सर्व राज्यकर्ते देशभक्त असल्यामुळे सावरकरांना विश्वास होता की, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा ही संस्थाने सर्व कृत्रिम भेद बाजूला ठेवून एकतेचे ध्येय साध्य करण्याच्या कार्यात भारतासोबत नक्की उभी राहतील. सावरकरांच्या मते, हिंदू संस्थानं ही शक्तिकेंद्रे असून त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत गडाप्रमाणे उपयोग करायला हवा आणि याच संस्थानांच्या एकत्रिकरणाच्या हेतूने १९४४ साली शिमोगा येथे ’अखिल भारतीय हिंदू सभा परिषद’ भरवली. तेथे वेगवेगळ्या संस्थानांमधून ५००च्या आसपास प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
त्रावणकोर सोबतच म्हैसूर, ग्वाल्हेर, औंध आणि विशेषतः बडोदा संस्थानांनी घडवून आणलेल्या सुधारणा खरोखरच चकित करणार्‍या होत्या. समाजाला काळीमा असणार्‍या अनेक कुप्रथांवर या संस्थानांमध्ये बंदी घालण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर प्रजेला व विशेषतः स्त्रियांनासुद्धा राज्यकारभारात सहभाग घेऊ देण्यात आला होता आणि म्हणून अशी प्रगत संस्थानं ब्रिटिश राज्यात विलीन होऊ नये, असं सावरकरांना वाटे. वरील सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की, सावरकरांना हुकूमशाही करणारी किंवा एकहाती राज्य करणारी सत्ता होती म्हणून नव्हे तर एकहाती असूनसुद्धा लोकशाहीच्या मार्गाने जाणारी ही संस्थाने असल्यामुळे त्यांना ती प्रिय होती. मग एवढं सगळं असूनसुद्धा सावरकरांनी त्रावणकोर स्वतंत्र ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, यासाठी त्या काळातील परिस्थिती कारणीभूत होती. १९४६ साली मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये घडवून आणलेल्या दंगलींकडे काँग्रेसच्या नेत्यांनी साफ दुर्लक्ष केले; उलट सावरकर सदनाची झडती घेण्यात आली. काँग्रेसच्या ठरावातून ‘अखंड हिंदुस्थान’ हा शब्द वगळण्यात आला होता. फाळणी अटळ आहे, असे दिसताच सावरकरांनी, आपले कमीत कमी व शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान व्हावे, यासाठी काही सूचना दिल्या व त्यानुसार हिंदू महासभेच्या बंगाल आणि पंजाब मिळवण्याच्या मोहिमेला यश आले.
 
सर सी.पी.रामस्वामी अय्यर यांना काँग्रेसच्या आत्मघातकी धोरणापासून भारताच्या एकतेवर ओढवणारे संकट जाणवू लागले होते. ७ जुलैला प्रार्थना सभेनंतर गांधींजी म्हणाले की, “हिंदू समुदाय आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे सर्वजण उठून, आम्हाला सैन्याची गरज नाही किंवा किमान भारत अथवा पाकिस्तानात राहणार्‍या त्यांच्या मुस्लीम बांधवांच्या विरुद्ध हे सैन्य वापरले जाणार नाही अशी शपथ घेतील का?” ’‘सैन्यच नको,” हे गांधीजींचे उद्गार ऐकून त्रावणकोर संस्थानचे दिवाण संतप्त झाले. ते म्हणाले, “हे विचार ऐकून जनता मूढ होईल.” त्यांनी तत्काळ व्हॉईसरॉयच्या कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आणि १८ जून, १९४७ साली त्रावणकोरच्या महाराजांनी त्रावणकोर स्वतंत्र ठेवण्याची घोषणा केली. अय्यर यांना पाठवलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, “अखंड हिंदुस्थानच्या हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निजामाने त्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा पूर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे पुरेसे धैर्य असलेल्या हिंदू संस्थानिकांनी तत्काळ एकत्र येऊन आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरून येणार्‍या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास सिद्ध व्हावे. हिंदूविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करणारी सध्याची घटना समिती हिंदूजगताचा विश्वासघात करून मुसलमानांच्या आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घटना समितीत सहभागी होणार्‍या हिंदू संस्थानांनी घटना समितीचे हे हिंदूविरोधी निर्णय मान्य करण्याचे बंधन स्वीकारू नये.” हे पत्रच पुरेसे बोलके आहे. फक्त परकीय आक्रमणांचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीनेच सावरकरांनी त्रावणकोर स्वतंत्र ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. एकट्या सावरकरांनीच नव्हे, तर आर. शंकर आणि ए. ए. रहिम या काँग्रेस नेत्यांनीसुद्धा त्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. परंतु, त्यांच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही, लट स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना अनेक मंत्रिपदं देण्यात आली.
 
नेपाळ आणि सावरकर


भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर निसर्ग ही भारताची सर्वात मोठी ढाल आहे. उत्तरेत हिम शिखरे, दक्षिणेतील सिंधू सागर, पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला रणरणती मरूभूमी! त्यामुळे शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास हे सगळे अडथळे पार करावे लागतील. परंतु, अंतर्गत शत्रूंमुळे भारताचे खूप नुकसान होत होते. खैबरघाटचा विश्वासघात झाल्यानंतर १० जुलै, १९४७ ला काढलेल्या पत्रकात सावरकर म्हणतात, “म्हणून नेपाळ नि काश्मीर यांनी संयुक्त फळी उभारून देशाच्या सीमांचे परकीय आक्रमणापासून रक्षण करावे.” कारण, त्याकाळचे नेते हे करू शकणार नाही, हे सावरकरांना कळून चुकले होते.
 

नेपाळच्या राजघराण्यातील हेमचंद्र समशेरजंग यांच्यावर सावरकरांचा खूप प्रभाव होता. त्यांनी १९३१ साली रत्नागिरी येथे सावरकरांची भेट घेतली. त्यांनी सावरकरांच्या लेखांचे अनुवाद ’तरूण गुरखा’ आणि ’हिमालय टाईम्स’मध्ये प्रसिद्धही केले होते. पतितपावन मंदिरात भरलेल्या सभेत भाषण करताना ते म्हणाले की, “गुरखे हे हिंदू धर्माचे तारणकर्ते आहेत आणि हिंदुस्थानच्या ऐक्यावर जर काही अंतर्गत वा बहिर्गत संकट ओढावले, तर त्या संकटाशी झुंझ देण्यात गुरखे आघाडीवर राहतील.” त्यामुळे सावरकरांचा नेपाळवर पूर्ण विश्वास होता. त्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी कायम नेपाळकडे दुर्लक्ष केले. तुर्कस्तानशी संबंध ठेवले, पण नेपाळकडे ढुंकूनही बघितलं नाही. सावरकर म्हणायचे की, “ज्याप्रमाणे इंग्रजांनी १८५७च्या युद्धात नेपाळचा उपयोग भारताच्या विरोधी केला होता, तसा आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी का करू नये? चहुकडे आपले तेजोवलय प्रस्थापित करणारे हिमालय नेपाळचाही एक भाग आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळची नाळ अगदी घट्ट जोडलेलीच आहे. या कारणाने नेपाळविषयी ममत्व वाटणे म्हणजे देशबाह्य निष्ठा नव्हे.” वरील सर्व मुद्दे लक्षात घेता केवळ भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच सावरकरांनी त्रावणकोर व नेपाळला पाठिंबा दिला हे स्पष्ट होते. म्हणून सावरकरांवर केला जाणारा हा आरोप अत्यंत निरर्थक आहे हेसुद्धा स्पष्ट होते.


 
(संदर्भ: स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)
 

- मृण्मयी गालफाडे

 
 

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121