अमेरिका आणि चीनमध्ये मागील वर्ष-दीड वर्षापासून व्यापारयुद्ध चालू होते आणि आता कोरोनावरुन दोन्ही देश आमने-सामने उभे ठाकले आहेत. मात्र, या दोन्ही मुद्द्यांव्यतिरिक्त दक्षिण चिनी समुद्रावरील वर्चस्वासाठीही अमेरिका व चीनमध्ये सातत्याने तणातणी होत आली. चीन दक्षिण चिनी समुद्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असल्याचे दिसते तर अमेरिका चीनच्या उचापत्यांवरुन इशारे देते. नुकताच जगातील सर्वात मोठ्या-अमेरिकन नौदलाच्या एका पथकाने दक्षिण चिनी समुद्रापासून जवळच एक जबरदस्त प्रयोग केला आणि तो चीनच्या दृष्टीने अधिक गंभीर मुद्दा आहे. अमेरिकन नौदलाने शुक्रवार, दि. २३ मे रोजी एक चित्रफित जारी केली व आपण नेमके काय करु शकतो, हे दाखवून दिले. सदर चित्रफितीत एका युद्धनौकेवर तैनात केलेल्या लेझर गनद्वारे ड्रोनवर हल्ला केल्याचे पाहायला मिळते. लेझर गनद्वारे केलेल्या हल्ल्यात हवेत उडणार्या ड्रोनवर अचूक निशाणा साधला गेल्याचे आणि ते खाली पडल्याचेही चित्रफितीत दिसते. अमेरिकन नौदलाच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ने चीनपासून काही हजार किलोमीटर अंतरावरील प्रशांत महासागरातल्या युएसएस पोर्टलॅण्ड येथून लेझर गनच्या साहाय्याने हे परीक्षण केले. मात्र, हे केवळ परीक्षण नाही, तर कोट्यवधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांना, विमानांना, ड्रोन्सना किंवा युद्धनौकांना आपण केवळ एक डॉलर इतक्या कमी खर्चात नष्ट करु शकतो, हा इशारा अमेरिकेने त्यातून दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकन नौदलाने परीक्षण केलेले हाय-एनर्जी लेझर शस्त्रास्त्र या शस्त्रप्रकारातील आतापर्यंतचे एकमेव शस्त्र आहे. तसेच हे शस्त्र पाणी वा हवा अशा दोन्हीतील अगदी लहानातल्या लहान लक्ष्याचाही भेद करु शकते. या शस्त्राला ‘सॉलिड स्टेट लेझर वेपन’ असे म्हटले जाते आणि याला अमेरिकेच्या नौदल संशोधन कार्यालयाने तयार केले आहे. तसेच अमेरिकन नौदलाच्या ‘पॅसिफिक फ्लीट’मध्ये प्रथमच या शस्त्राचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाचे संकट अवघ्या जगावर घोंघावत असताना आणि अमेरिकेत तर यामुळे हाहाकार माजलेला असताना, या शस्त्राचे परीक्षण शनिवार दि. १६ मे रोजी करण्यात आली. परीक्षणाच्या वेळेवरुन आणि दक्षिण चिनी समुद्राजवळील प्रशांत महासागरक्षेत्रातील जागेवरुन अमेरिकेचे हे परीक्षण चीनवर दबाव टाकण्यासाठीच होते, हे स्पष्ट होते. सोबतच अमेरिका चीनला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हेही यातून दिसून आले. नुकत्याच दक्षिण चिनी समुद्र आणि तैवानजवळ चीन आणि अमेरिकेच्या युद्धनौका एकमेकांच्या समोरासमोर आल्याची घटना घडली होती, तर चीनने अशाचप्रकारे लेझरच्या साहाय्याने अमरिकेच्या सर्वात आधुनिक टेहळणी विमान ‘पी-८’ वर हल्ला केला होता. तथापि, त्यामुळे अमेरिकेचे फार काही नुकसान झाले नाही, हे खरेच. पण, चीनच्या या आगळिकीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने तयारी केली आणि आपले अतिशय घातक शस्त्र जगासमोर आणले. कोणत्याही नौदल पथकाला भीती दाखवण्याची, घाबरवण्याची या शस्त्रात क्षमता आहे, तसेच चीन अमेरिकेसमोर दर्पोक्ती करत असेल तर अमेरिकादेखील युद्धापासून मागे हटणार नाही, हा संदेशही अमेरिकेने यातून दिल्याचे समजते.
अमेरिकन नौदलाने चाचणी केलेल्या लेझर शस्त्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अमेरिकेने हे घातक शस्त्र दक्षिण चिनी समुद्रात टेहळणी करणाऱ्या आपल्या युद्धनौकांवर तैनात केले आहे. अमेरिकेचे हे शस्त्र ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ श्रेणीमध्ये येते. अमेरिकेत ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ या शस्त्रप्रकारावर १९६० पासून काम किंवा संशोधन सुरु करण्यात आल्याचे म्हटले जाते. आता तयार केलेल्या या शस्त्राची खासियत म्हणजे, आपल्या टप्प्यातील लक्ष्याला ऊर्जेद्वारे ते उडवते. तसेच या शस्त्रात लेझर बीम, मायक्रोवेव्ह आणि पीर्टीकल बीमचादेखील वापर करता येऊ शकतो. अमेरिकेने आतापर्यंत ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ शस्त्रप्रकारामध्ये ‘नॉन लिथल’ शस्त्रे तयार केली होती आणि इराक युद्धात त्याच्या साहाय्याने मोठ्या प्रदेशातील वीज बंद केली होती. तसेच जगातील अनेक भागात गर्दी किंवा जमाव नियंत्रणासाठी त्याचा वापर होतो. आता मात्र अमेरिकेने ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’द्वारे ‘लिथल’ शस्त्र तयार केले आहे. नव्या शस्त्राच्या साहाय्याने शत्रुदेशाच्या सैनिकांना, क्षेपणास्त्रांना अमेरिका हवेतच नष्ट करु शकते, हेलिकॉप्टरवर लक्ष्य साधू शकते आणि लष्करी वाहनांनाही उद्ध्वस्त करु शकते, इतके ते घातक आहे.