
चीनमधील गाशा गुंडाळून जर्मन फुटवेअर कंपनी भारतात सुरु करणार प्रोडक्शन युनिट
नवी दिल्ली : चीनच्या एका शहरातून उत्पन्न झालेल्या आणि आता जगभर फैलावलेल्या करोना विषाणूचे परिणाम आता चीनी उद्योग क्षेत्रावर दिसू लागले असून, अनेक परदेशी कंपन्या चीन मधून त्यांचा गाशा गुंडाळू लागल्या आहेत. जर्मन फुटवेअर कंपनी वॉन वेल्स कंपनीनेही त्यांचा चीन मधला उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चीनमधून बाहेर पडल्यावर भारतात आग्रा येथे ही कंपनी त्यांचे उत्पादन सुरु करणार आहे. त्यासाठी कंपनीने लॅट्रीक इंडस्ट्री बरोबर करार केला असल्याचे समजते.
वॉन वेल्स फुटवेअर कंपनी विशेष प्रकारची पादत्राणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून हेल्दी फुटवेअर ब्रँड अशी त्याला जगमान्यता आहे. या कंपनीच्या पादत्राणामुळे ज्यांना पाय, गुढघे, पाठ दुखीचा त्रास आहे त्यांना आराम मिळतो, असे सांगितले जाते. ही पादत्राणे स्नायुंना झटका बसण्यापासून संरक्षण देतात आणि त्यामुळे शरीराचा तोल योग प्रकारे सांभाळले जातो. सुमारे ८० देशात या कंपनीच्या पादत्राणांची विक्री केली जाते.
जगभरात तब्बल १० कोटी ग्राहक असलेल्या या कंपनीची २०१९ मध्ये सुरुवात झाली आहे. जगभरात कंपनीची ५०० रिटेल स्टोर्स आहेत आणि ऑनलाईन विक्रीही केली जाते. यापूर्वी मोबाईल कंपनी ‘लावा’ने चीन मधून त्यांचा प्रकल्प भारतात आणण्याची घोषणा केली असून येत्या पाच वर्षात लावा भारतात ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या प्रमुखांनी या बाबत बोलताना आम्ही भारतातून चीन मध्ये मोबाईल निर्यात करण्याची स्वप्न पाहतो आहोत, असे सांगितले.