सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याकाळात अनेक कलाकार पुढे येऊन वेगवेगळ्या स्तरावर मदतीचा हात देत आहेत. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री नर्स बनून मुंबईतील एका रुग्णालयात रुग्णसेवा करत आहे.
कोरोनाच्या या विळख्यात सगळ्याच स्तरांतून गरजूंना मदतीचा ओघ सुरु असताना, मुंबईच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अभिनेत्री शिखा मल्होत्रा परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा करत आहे. ‘कांचली’ या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा सध्या कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईकरांची मदत करताना दिसते. “या महाभयंकर विषाणूशी लढताना आपणही थोडे फार योगदान देऊ शकतो आणि आपल्या समाजाच्या कामी येऊ शकतो, यात समाधान वाटते,” असे शिखा सांगते.
शिखा मुळची दिल्लीची! वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. शास्त्रीय संगीतासोबतच तिने कथक आणि इतर नृत्य प्रकारांचेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. लहानपणापासूनच हुशार असलेल्या शिखाचे प्राथमिक शिक्षण दिल्लीत झाले. आठवीत असताना तिला पक्षाघाताचा झटका आला. पक्षाघातामुळे तिचे संपूर्ण शरीर लुळे पडले. या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी तिला तीन वर्षांचा कालावधी लागला. हा माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. मात्र, आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी यातून लवकर बाहेर पडू शकल्याचे शिखा सांगते.
इच्छाशक्तीच्या जोरावर ती या आजारातून पूर्णपणे बाहेर पडली. मात्र, यानंतर तिचे शाळेत जाण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. शिक्षण पूर्ण करायचेच, असा निर्धार मनाशी पक्का करून तिने बाहेरून दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यावर तिच्यातला आत्मविश्वास अधिक दुणावला. आजारपणातून बाहेर पडल्यावर तिने ठरवले की, आपण आता वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घ्यावे. याच उद्देशाने तिने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली. बारावीत शिखा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. यानंतर तिने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालयातून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला.
नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना ती वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ती आवर्जून सहभागी व्हायची. अर्थार्जनासाठी ती अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची कामेही करायची. नृत्य कार्यक्रमांतही तिला रस होताच. यामुळे तिच्या कलागुणांनाही वाव मिळाला. शिखा प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायिका असल्याने ती संगीत कार्यक्रमही करायची. याचा तिला पुढे करिअरमध्ये फायदा झाल्याचे ती सांगते. ‘कांचली’ या तिच्या चित्रपटात तिने एक गाणेदेखील गायले आहे. “पहिले गाणे हे स्वतःसाठी गायचे, हे माझं स्वप्न होतं आणि ते या चित्रपटामुळे पूर्ण झाले,” असे शिखा सांगते.
नर्सिंग पूर्ण झाल्यावर तिने आई-वडिलांना आपल्याला कलाक्षेत्रात काम करायचे आहे, अशी इच्छा बोलून दाखवली. यावर तिच्या आईवडिलांनीही तिला पाठिंबा दर्शवला. पालकांच्या संमतीनंतर शिखाने दिल्लीतून चित्रपटांच्या ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातला संघर्ष तिने जाणला होता, तरीही तिचे अथक प्रयत्न सुरूच होते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले. तापसी पन्नुच्या चित्रपटात तिला एक छोटीशी भूमिका मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिखाला शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका मिळाली. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून फार कौतुकही झाले.
एका चित्रपट महोत्सवात शिखाच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. तिथे लागलेल्या चित्रपटांपैकी ‘सांकल’ या चित्रपटाने शिखाचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या विषय आणि मांडणीने प्रभावित होऊन शिखाने चित्रपटाचे दिग्दर्शक दैदीप्य जोशी यांच्याशी संपर्क केला. चित्रपट आवडल्याचे सांगतच तिने आपल्यालाही अशाच एखाद्या चित्रपटात काम करायचे आहे, असा मानस बोलून दाखवला. त्याचवेळी दैदीप्य जोशींनी तिला त्यांच्या आगामी चित्रपट ‘कांचली’साठी अभिनेत्री म्हणून निवडले. राजस्थानी भाषेत हा चित्रपट असल्याने ती भाषा शिकून घेणे, त्यांची बोलण्याची आणि इतर हावभावांची लकब शिकून घेण्यासाठी शिखाने दोन वर्ष खूप मेहनत केली. शाहरुख खान, दिया मिर्झा, कुणाल कपूरसारख्या नावाजलेले कलाकारांची अभिनय शाळा म्हणून ओळखल्या जाणार्या ‘बॅरी जॉन अॅक्टिंग स्कूल’मधून तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. यावेळचे सगळे अनुभव ‘कांचली’ करताना तिच्या कामी आले. शिखाचा ‘कांचली’ हा चित्रपट याच वर्षी ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याच्या बातम्या कानी येऊ लागल्या. भारतातही कोरोनाने शिरकाव केला. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याची बातमी कानी पडताच शिखाने आपल्या शिक्षणाचा समाजसेवेसाठी वापर करण्याचे ठरवले. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्राशी असलेला तिचा संबंध जवळ जवळ तुटलाच होता. मात्र, या महामारीशी लढण्यासाठी तिने पुन्हा एकदा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. रुग्णसेवा करता यावी म्हणून तिने बृहन्मुंबई महापालिकेकडे विनंती अर्ज केला. हा अर्ज मंजूर झाल्यावर लगेचच ती वैद्यकीय सेवेत रुजू झाली. सध्या शिखा मुंबईतल्या रुग्णालयात तिचे कर्तव्य बजावत आहे. करिअर बहरत असतानाच चित्रपट सृष्टीच्या झगमगाटापासून दूर होऊन देशसेवेत रुजू होणार्या अभिनेत्री शिखा मल्होत्राला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा!