हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांची भारताकडे केली मागणी
वॉशिंग्टन : कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिकेने भारताकडे मदतीचा हात मागितला आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी केली आहे. कोरोनावर उपचार म्हणून मलेरियावर उपचार म्हणून वापरण्यात येणारे हे औषध परिणामकारक आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. भारताने हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांचा साठा अमेरिकेला पाठवावा, अशी विंनंती मी त्यांना केली आहे. याद्वारे आम्ही कोविड-१९ वरील उपचार योग्य पद्धतीने करू. मीही हे औषध घेणार असून माझ्या डॉक्टरांशी या संदर्भात चर्चा करणार आहे. भारत मोठ्या प्रमाणात या औषधाची निर्मिती करत आहे. भारताकडे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हे औषध मिळाल्यास आपण कोरोनावर अत्यंत परिणामकारक इलाज करू शकतो. भारताने आपल्याला मदत केल्यास आपण धन्यवाद देऊ."
दरम्यान, भारताने या औषधाच्या निर्यातीवर तसेच त्याचा फॉर्म्युला इतर देशांना देण्यास सध्या बंदी आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या चर्चेची माहिती दिली आहे. अमेरिका-भारत एकत्र येऊन या संकटाशी एकत्र मुकाबला करू, असेही ते म्हणाले.
अमेरिकेत तणावात्मक परिस्थिती
अमेरिकेत कोरोनामुळे ८,४०० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. न्युयॉर्क शहरात २४ तासांत ६३० जण मृत पावले आहेत. ट्रम्प यांनी आणखी काही शेकडो मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. लष्कराला पाचारण करण्यात आले असून सर्व प्रकारच्या वैद्यकीय मदतीसह ठिकठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ब्राझील आणि स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्याशी महामारीशी लढण्याबद्दल चर्चा केली. एकत्र येऊन या संकटाला तोंड देऊ, असे ते म्हणाले. ब्राझीलला लागणारी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. बोल्सोनारो म्हणाले, ‘‘आम्ही मोदींना औषधांचा पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्मितीत भारताने सहयोग करावा, असेही ते म्हणाले. मोदींनीही यावर सकारात्मक प्रतिक्रीया देत नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी आपण कुठलीही कसूर सोडणार नाही, असे सांगितले.
मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज पेरेज-कास्तेजन यांच्याशी चर्चा करत सर्व कोरोनाबाधितांच्या बरे होण्याची प्रार्थना केली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल, युनायटेड किंग्डमचे प्रिंस चार्ल्स, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों, कुवेतचे पंतप्रधान शेख सबा अल-खालिद अल-हमद अल-सबा यांच्याशीही चर्चा केली.