कलाप्रवृत्ती कलाकाराला कधीही स्वस्थ बसू देत नाही. आवडती कला जोपासण्यासाठी कलाकाराचे आयुष्यही अपुरे पडते. अशीच एक आगळी वेगळी शिल्पकला जपणार्या अहमदनगरच्या अशोक डोळसे यांच्याविषयी...
आपल्या आयुष्यात कलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. संबंध मानवजातीच्या विकासाचा व संस्कृतीचा परिचय करून देणारी पौराणिक शिल्पे ही पुरावा आहेत. ही कलाप्रवृत्ती कलाकाराला कधीही स्वस्थ बसू देत नाही. आवडते चित्र-शिल्प घडविणे, रेखाटणे व रंगवणे यासाठी कलाकारास संपूर्ण आयुष्य अपुरे पडते. आज अशीच एक आगळी वेगळी शिल्पकला जपणार्या अहमदनगरच्या अशोक डोळसे यांच्याविषयी जाणून घेऊया.
एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नातून अशोक डोळसे यांनी साकारलेली खडूशिल्पे ही कला आज त्यांची ओळख बनली आहे. पेशाने अहमदनगरमधील सीताराम सारडा या विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे अशोक डोळसे हे सर्वच ‘रिअॅलिस्टिक’ कलाप्रकारांत काम करीत आहेत. अशोक डोळसे यांचा जन्म २ जून १९७२ रोजी झाला. अहमदनगर शहरातच त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द घडली. घरात चित्रकलेचा कोणताही वारसा नसताना केवळ छंद व अध्यापनाची आवड म्हणून ते या क्षेत्राकडे वळाले. त्यांचे शिक्षण अहमदनगरमधील सीताराम सारडा विद्यालय येथे झाले. इथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपण कलाशिक्षक व्हावे असे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताच पुढील शिक्षण कला या शाखेतून करायचे ठरविले. प्रगतकला या शासकीय कला महाविद्यालयातून कलाशिक्षक पदविका व नाशिक येथील चित्रकला महाविद्यालयातून ए.एम. ही पदवी घेतली.
कलाशिक्षणाचा मूळ हेतू मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला कलात्मक वळण लावून आनंदी जीवन जगणे शिकविणे हा आहे. लहान मुलाच्या मनात दडून बसलेल्या भाव भावना, सुप्त निर्माणक्षम शक्ती यांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट साकारणे आहे. कलाशिक्षक म्हणून काम करत असतानाच विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील एका तासापुरतं चित्रकला या विषयाकडे न पाहता अधिकाधिक कलासंपन्न व्हावे याकरिता कलाशिबिरे, छंदवर्ग व कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचे त्यांनी ठरविले. अगदी सुरुवातीच्या काळात नगर शहरात चित्रकला, शिल्पकला व एकूणच कलेबाबत तितकीशी जागरूकता नव्हती. पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात मोठी मोठी चित्रकला व शिल्पांचे प्रदर्शन असतात.अशाप्रकारची प्रदर्शने आपल्या इथेही सुरू करावी या उद्देशाने त्यांनी अहमदनगर शहरात २०१३ मध्ये ’अशोका आर्ट गॅलरी’ सुरू केली. ज्याच्या माध्यमातून गेली काही वर्षे ते शहरात एक कलात्मक वातावरण निर्मितीस हातभार लावत आहे.
निरनिराळ्या शिल्पांसोबतच अशोक यांची चित्रे देशातच नाही तर परदेशातील कलाप्रेमींनादेखील भुरळ घालतात. संपूर्ण भारतात त्यांच्या चित्रांना मागणी आहे. त्यांनी नामांकित मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम केले आहे. सध्या ते ऑनलाईन चित्रकला अध्यापनातून कलेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकूणच अशोक डोळसे यांचा जीवनप्रवास पाहता प्रत्येक व्यक्तीमध्ये कलेचा अंश ठेवलेला आहे. त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतु तो अंश आपल्यात आहे, हे ओळखण्याचा व त्याच्या आविष्काराचा प्रयत्न करणे म्हणजे कलेची उपासना करणे. कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा कलेतून मिळणारा आनंद निश्चित उच्च प्रतीचा असतो. अशा या कालसाधकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप शुभेच्छा!