जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील असताना चीनशी सीमा भिडलेल्या व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही! इथे कोरोना विषाणू संक्रमणाची प्रकरणे समोर आली, पण तीही अन्य देशांच्या तुलनेत अगदीच कमी!
२३ एप्रिलपर्यंत तर व्हिएतनाममध्ये केवळ २६८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु, हे झाले कसे? तर व्हिएतनाममधील कोरोनाग्रस्तांची अतिशय कमी संख्या आणि शून्य मृत्युदरामागे तेथील सरकारने लगोलग घेतलेल्या निर्णयांचा फार मोठा वाटा आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असतानाच व्हिएतनाम सरकारने त्याचे वेळीच गांभीर्य ओळखले व या महामारीविरोधात लढण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली. आता तर इथल्या सरकारने विविध गतिविधींवर लावलेले निर्बंध हटवण्यास सुरुवात केली असून काही दिवसांत शाळाही सुरू होतील.
तत्पूर्वी जानेवारी अखेरीस व्हिएतनाममध्ये कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण उद्भवले होते. तद्नंतर व्हिएतनाम सरकारने तातडीने कार्यवाही करत चीनला लागलेली आपली सीमा पूर्णपणे बंद केली, तसेच सर्व प्रमुख विमानतळांवर अन्य देशांतून येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली. कारण, कोरोना संक्रमण परदेशातून होत असल्याचे व्हिएतनाम सरकारला समजले होते. उल्लेखनीय म्हणजे, व्हिएतनाम सरकारने परदेशातून येणार्या प्रत्येक व्यक्तीला अनिवार्यपणे १४ दिवस ‘क्वारंटाईन’मध्ये ठेवण्याचे आदेश दिले.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व्हिएतनामने परदेशातून येणार्या व्हिएतनामी वंशाच्या आणि व्हिएतनामी नागरिकांच्या कौटुंबिक सदस्यांसह सर्वच प्रवाशांवर बंदी घातली. व्हिएतनाम कोरोना संक्रमित रुग्णांना ‘क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात यशस्वी झाला. तथापि, यासाठी कित्येक ठिकाणी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधनेही आणावी लागली. प्रशासन आणि सशक्त सुरक्षा व्यवस्थेमुळे व्हिएतनामने काही बाबतीत संपूर्ण जिल्ह्याला ‘क्वारंटाईन’ करण्यात यश मिळवले. परंतु, युरोपियन देशांप्रमाणे व्हिएतनामने आपल्या देशात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू केले नाही. व्हिएतनामची राजधानी हनोई आणि डझनभर मोठ्या शहरांत ‘लॉकडाऊन’चे नियम लागू केले होते, तेही आता हटवण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली गेली आणि नंतर ‘कॉन्टॅक्ट (सी) ट्रेसिंग (टी)’ यांवर भर दिला. अशा सर्वच नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ‘सी व टी पद्धती’ अवलंबल्याने व्हिएतनाम कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाला. इतकेच नव्हे, तर व्हिएतनामने आपल्या देशांतच कमी किंमतीतील टेस्टिंग किट्स विकसित करण्यात यश मिळवले. व्हिएतनामकडे दक्षिण कोरिया किंवा जर्मनीसारखी मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करण्याची साधने नाहीत. साधनसंपत्ती कमी असूनही व्हिएतनामी सरकारने किमान खर्चात संक्रमणाच्या प्रकरणांना आक्रमकरित्या ट्रॅक केले, तसेच संक्रमित लोकांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली. व्हिएतनाम सरकारने लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबविण्यावर भर दिला. यात छोट्या-छोट्या व्हिडिओ आणि पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या पद्धतींबाबत जागरुक केले.
ऐतिहासिक व्हिएतनाम-अमेरिका युद्धातील व्हिएतनामच्या रणनीतीची आठवण करू देत पंतप्रधान ग्युएन जुआन फुक यांनी लोकांना दीर्घकाळापर्यंत महामारीशी लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तसेच ज्या देशांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि घरात राहण्याच्या नियमांचे पालन केले नाही, तिथल्या नागरिकांच्या मृत्यूचे आकडे कुठवर पोहोचले, याची माहितीही व्हिएतनाम सरकार सातत्याने देत होते. व्हिएतनामने आपल्या देशांतील नागरिकांना याबाबत सांगितले आणि असे आवाहन केले की, “जर तुम्ही सहकार्य केले नाही, तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि त्याचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागतील.” याचाही इथल्या लोकांवर सकारात्मक परिणाम झाला.
तथापि, कोरोना रोखण्यासाठी व्हिएतनामने अवलंबलेल्या पद्धतींमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालाच. कितीतरी उद्योग बंद झाले. व्हिएतनाम सरकारच्या मालकीच्या ‘व्हिएतनाम एअरलाइन्स’ला अमेरिका, युरोपीय संघ आणि पूर्व आशियातील प्रीमियम मार्गावरील उड्डाणे रद्द केल्याने कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले. दरम्यान, व्हिएतनाममधील तीन जिल्ह्यांत अजूनही संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’ आहे आणि या तीन ठिकाणी जवळपास साडेचार लाख लोक राहतात. सध्या या भागाची सुरक्षा व्यवस्था लष्कर पाहत असून त्यांची नजर चुकवून कोणीही तिथून बाहेर पडू शकत नाही.