अन्न हे पूर्णब्रह्म (भाग-३) : आहार कसा निवडावा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


health_1  H x W


आहार निवडताना व्यक्तीचे वय (बाल, तरुण वा वृद्ध) निरोगी अवस्था का रोगी, पचनशक्तीची क्षमता, भुकेची जाणीव आणि ऋतुमानाचा नक्की विचार करावा.
 

सध्या कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’चे दिवस सुरु आहेत आणि घरबसल्या वेळच वेळ असल्यामुळे घराघरांतून खाद्यसंस्कृतीचा खमंग सुवास दरवळताना दिसतो. स्वतः उत्साहाने करणे, ते खाऊ घालण्याआधी त्याचे फोटो काढणे आणि विविध समाजमाध्यमांवर ते टाकणे, हे जोमाने सुरु आहे. मग त्याची कृती, त्याची चव यावर कमेंट करणे आणि ‘तुम्हीही करून पाहा!’ असे चॅलेन्ज देणे. मग इतर कुणी पुन्हा याच पद्धतीने अजून एक वरचढ जिन्नस करणे, त्याला गोंडस नाव देणे, उत्तम मांडणी करणे. हुश्श... किती ते कष्ट! ‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा!’अशी म्हण आहे, पण हल्ली तर ‘खाटेवरून ताटावर’ आणि ‘ताटावरून खाटेवर’ हेच सुरू आहे. (खाटेवर बसून ‘वर्क फ्रॉम होम’ करत पुन्हा थोडं खाणं, नाहीतर पेंग येईल, या सबबीखाली सुरुच राहते.)


आहार पचल्याची काही ठराविक लक्षणे आयुर्वेदाने सांगितली आहेत- १) उद्गारशुद्धी : म्हणजे जे ढेकर सकाळी येतील, त्यात दुर्गंध, अन्नाची चव किंवा अन्नाचे कण नसावेत. फक्त हवा असणे अपेक्षित आहे. २) उत्साह : म्हणजे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणे. मरगळलेले, आळसावलेले वाटू नये. सकाळी उठणे हे सूर्योदयापूर्वी अपेक्षित आहे. त्यानंतर कफकाळ सुरू होतो आणि ८-९ वाजता पित्तकाळ. म्हणजे त्यांचा जोर अधिक असतो. ते जर दूषित असले, बाधित असले, तर त्याने होणारे त्रास वारंवार उद्भवतात किंवा झाल्यावर लवकर बरे होत नाही. जसे सकाळी उठून नाक वाहणे, शिंका सुरू होणे, घशाशी येणे इ. या जर तक्रारी असतील, तर लवकर उठल्याने (फक्त एवढाच बदल केल्यानेही या तक्रारी थांबतात.) ३) वेगांचा उत्सर्ग : आयुर्वेदानुसार, आडव्याचे उभे झाल्या झाल्या (म्हणजे झोपून उठल्या उठल्या) मलोत्सर्गाचा वेग जाणवावा. हे अन्न (आदल्या दिवशीचे, रात्रीचे) पचल्याचे द्योतक आहे. मलप्रवृत्ती हीदेखील कशी आहे, यावरून पचन कसे झालंय हे कळते. मल नीट बांधलेला असावा, पाणीदार किंवा खूप बांधून (घट्ट) शौचास होऊ नये. शौचास दुर्गंध नसावा, खूप वेळ लागत असल्यास तेही बरोबर नाही. शौचास थोडे थोडे होणे, चहा प्यायल्यावर, व्यायाम केल्यावर, जेवण झाल्यावर, खाल्ल्यावर, सिगारेट ओढल्यावरच होणे हे स्वस्थकर नाही. कुंथून होणे, गुदभागी ठणका लागणे, औषधे घेतल्याशिवाय न होणे इ. लक्षणे ही प्राकृत नाहीत. जसे आपण बँकेत किती बचत ठेवी आहेत, ते बघूनच खर्च करतो, तसेच सकाळी उठल्याउठल्या वरील तीन लक्षणे तरी प्राकृत आहेत का, हे तपासून नंतर दिवस आखावा.


आहार निवडताना व्यक्तीचे वय (बाल, तरुण वा वृद्ध) निरोगी अवस्था का रोगी, पचनशक्तीची क्षमता, भुकेची जाणीव आणि ऋतुमानाचा नक्की विचार करावा. त्याचबरोबर जे अन्नप्राशन करणार आहोत, त्याचे गुणधर्म जाणून घ्यावे. ते पचायला जड आहे का हलके? गरम आहे का थंड? (स्पर्शाने नव्हे गुणाने), पथ्यकर आहे का अपायकर? ताजे आहे का शिळे? त्याचे प्रमाण भूक शमन (शांत) होईल इतकीच आहे का अधिक? या सगळ्या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. एक-एक अन्नपदार्थामध्ये उत्तमोत्तम गुण असतात, पौष्टिक असतात, शरीराला फायदेशीरही असतात. पण कधी, तर ते शरीरात पचल्यानंतर आणि पचविण्यासाठी पाचकाग्नी म्हणजेच जठराग्नी उत्तम, प्राकृत असणे गरजेचे आहे. पचनशक्ती जर मंदावली, बिघडली तर रोजचे जेवणही पचत नाही. अजीर्ण होते. असे वारंवार होत राहिल्यास शरीर वाढताना दिसते. पण, ताकद, उत्साह, व्याधी, प्रतिकारशक्ती, भूक इ. कमी होताना दिसते आणि शारीरिक असमतोल झाल्यास त्याचा मनावरही परिणाम होतो. मग सतत त्रागा करणे, चिडचिड, छातीत धडधडणे, झोप शांत न लागणे, सतत जाग येणे, भीती वाटणे इ. होऊ लागते आणि याचे कारणही कळत नाही. बरेचदा पोटाच्या अनियमित कार्यामुळे असे विविध पद्धतीने शरीर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. त्याचेही ऐकणे गरजेचे आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार सात (Permutation) आणि (Combinations)ने प्रकृती होतात. या प्रकृतीनुरूप, विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्तींना स्वभावतःच काही पदार्थ आवडतात आणि ते प्रमाणात खाल्ल्यास पचतातही. पण, ‘अति तेथे माती’ याचा प्रत्यय इथेही येतो. तसेच, काही पदार्थ मूलतःच शरीराला बाधक ठरतात. ते थोडेही खाल्ले की लगेच त्रास होतो. उदा. कफ प्रकृत्तीच्या लोकांना थंड खाल्ले, केळे-सीताफळ खाल्ले, रात्री गार दूध प्यायले, खूप पाणी प्यायले इ. ने सर्दीचा त्रास उद्भवतो. पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये (रुग्ण नाही, स्वस्थ व्यक्तींमध्ये) विशिष्ट अन्न पदार्थाने अ‍ॅसिडिटी होते. काहींना काकडी बाधते, तर काहींना तिखट, काहींना तूरडाळ तर इतर कुणाला लोणचं आणि गंमत म्हणजे, हे पदार्थ प्रियही असतात. त्यांचा मोह सुटत नाही.


काही वेळेस विशिष्ट ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींना विशिष्ट आजार भेडसावतात. जसे पावसाळ्याच्या सुरुवातीस वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये सांधेदुखी, सांधे जड होणे, कठीण होणे, हालचालींमध्ये त्रास होणे इ. लक्षण उद्भवू शकतात, तर ऑक्टोबरच्या हीटमध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये गळवे येणे, डोळे येणे, नागीण होणे, कावीळ होणे इ. त्रास होऊ शकतात. आजाराची आणि रुग्णाची प्रकृती जर सारखीच आली, तर त्याची लक्षणे अधिक प्रखर होतात. म्हणजे वात प्रकृतीला वात प्रकाराचा खोकला झाला, तर तो बरा होण्यास अधिक काळ लागू शकतो. यावरून असे लक्षात येते की, एकच एक आहार वर्षभर तर खाऊ नयेच. पण, एका प्रदेशातील आहारही दुसर्‍या प्रदेशात खाल्ल्यास तोही बाधू शकतो, हे लक्षात ठेवावे. एकाने केले म्हणून इतराने त्याचे अंधानुकरण करणे टाळावे. लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये सुपाच्य आहार, नियमित व्यायाम आणि साधना होणे महत्त्वाचे आहे. शरीराबरोबर मनही ताजेतवाने ठेेवणे गरजेचे आहे. एखादा छंद, नवीन अभ्यास जोडून घ्यावा. सकारात्मक आचारविचारांसाठी स्वस्थ शरीर आणि मन असणे गरजेचे आहे. निरोगी शरीराची गुरुकिल्ली आपल्या हातात आहे. तेव्हा- डू दी राईट चॉईस ! (क्रमशः)
 

@@AUTHORINFO_V1@@