मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनुसार संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा कमी पडून लागल्या आहेत. त्यामुळे आता संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर करण्यात येणार आहे. प्रभादेवी, वरळी परिसरात शिक्षण खात्याने तसा निर्णय घेतला आहे. शिक्षण समिती सदस्या भाजपच्या आरती पुगावकर यांनी तशी मागणी केली होती.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रभादेवी, वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथ विभागातच ५३४ कोरोनाबाधित आहेत. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना किंवा संसर्ग झालेल्यांना क्वारंटाईन करायचे कुठे, असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे. होम क्वारंटाईन करायचे तर रूम लहान असून तेथे दाटीवाटीने माणसे राहत आहेत. जी साऊथ विभागात वरळी कोळीवाडा, डिलाईल रोड, धोबीघाट, जे. आर. बोरिचा मार्ग, जिजामाता नगर या परिसरात अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे. या परिसरात लहान लहान घरे असून ८-१० माणसे कुटुंबात राहत आहेत. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन केल्यास रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जी दक्षिण विभागातील महापालिका शाळांचे सभागृह आणि वर्गखेल्या क्वारंटाईनसाठी देण्यात याव्यात अशी मागणी शिक्षण समिती सदस्या भाजपच्या आरती पुगावकर यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा शिक्षण विभागाने सकारात्मक विचार केला आहे.