मुंबई : मुंबईत कोरोनाचा विळखा झपाट्याने बसत असून कंटेनमेंट झोनही झपाट्याने वाढत आहेत. आजघडीला ७२१ हून अधिक कंटेन्मेंट झोन सील करण्यात आले आहेत.
विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने मुंबई हा कोरोनाचा केंद्र बिंदू ठरत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत त्या वेगाने कंटेनमेंट झोन जाहीर केले जात आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा ३,५०० च्या वर पोहोचला असून कंटेनमेंट झोन म्हणून ७२१ परिसर सील करण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण १२ मार्चपासून समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीला या विषाणूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. मात्र एप्रिल महिना सुरू होताच रुग्णांचा संख्येत वाढ होऊ लागली. मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्या विभागाला कंटेंमेन्ट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.
मुंबईत एप्रिलच्या सुरुवातीला असे १४६ प्रतिबंधित क्षेत्र होती. ३ एप्रिलला त्यात वाढ होऊन २४१, ९ एप्रिल ३८१, त्यानंतर ४५२ प्रतिबंधित क्षेत्र झाली असून आता कंटेनमेंट झोनची संख्या ७२१ वर पोहोचली आहे .
मुंबईमध्ये बहुसंख्य ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. अशा विभागामधून इतर ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती असल्याने येथील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
वरळी, दादर, प्रभादेवी परिसराला कोरोनाचा विळखा बसला आहे. वरळी जीजामाता नगर, जनता कॉलनी, सुदंर नगर या ठिकाणी आतापर्यंत ४८७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर वरळी पाठोपाठ भायखळा, अंधेरी, धारावी हे परिसर कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरले आहेत.