जबरदस्त कलाकृतीने प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचा खजिना खुला करणारे, प्रसिद्ध दिग्दर्शक, एक अफलातून आणि अस्सल रुबाबदार व्यक्तिमत्व, कसलेला अभिनेता, माणसांच्या गर्दीत रमणारा हुकमी एक्का, मराठी चित्रपटसृष्टीचा ‘बिग बॉस’ म्हणजे अर्थात महेश मांजरेकर.
एक नवा चित्रपट येणार होता. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कामे केली होती. त्या चित्रपटाचे नाव ठरत नव्हते. शूटिंग पूर्ण झाले होते. निर्माता आणि दिग्दर्शकाने एक वेगळी शक्कल लढवली. एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेत चित्रपटाचे नाव जो प्रेक्षक उत्तमरीत्या सुचवेल, त्या काही भाग्यवंत प्रेक्षकांना, त्या चित्रपटातील कलावंतांसोबत एक दिवस ‘लवासा’ ची सफर करायला मिळणार होती. २० प्रेक्षकांची निवड झाली. त्यात मी होतो. सिनेसृष्टीतील अनेक तारे जवळून बघायला मिळणार होते. त्यात आनंदाची पर्वणी म्हणजे संपूर्ण एक दिवस, त्यांच्या सोबत फिरण्याची संधी भेटली होती. हा सगळा योगायोग जुळून आला होता. दादरहून आमची बस ‘लवासा’च्या दिशेने निघाली. कलाकार भेटीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण, मला या कलाकारांच्या ‘बॉस’ला भेटण्यात जास्त रस होता, ज्यामुळे हे सर्व कलाकार एका चित्रपटात एकत्र आले होते. ‘लवासा’ला पोहोचलो. निसर्गाचा अद्भुत अलंकार तिथे पाहायला मिळाला. जसा मी बसच्या खाली उतरलो, तसे ते भारदस्त व्यक्तिमत्व मला दिसले. आमच्या सगळ्यांचे स्वागत त्यांच्या हस्ते करण्यात आले. एक एवढा मोठा माणूस असून, ते प्रत्येकाशी आदराने बोलत होते. प्रवास कसा झाला, याची विचारपूस करत होते. मी जवळ गेल्यावर त्यांच्या पाया पडायला खाली वाकणार; तेव्हा त्यांनी माझे हात धरले आणि ‘पाया पडू नका. तुम्ही प्रेक्षकच आमचे सर्वेसर्वा मायबाप आहात,’ असे म्हणत हात जोडले. असा उत्तम विचार असणारा, कलाकारांची आणि त्याचबरोबर रसिकप्रेक्षकांची जाणीव ठेवणारा, मराठी आणि हिंदी चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक, कसलेला अभिनेता, माणसांच्या गर्दीत रमणारा हुकमी एक्का, मराठी चित्रपटसृष्टीचा ‘बिग बॉस’ म्हणजे अर्थात महेश मांजरेकर.
महेश मांजरेकर यांना त्यानंतर मी अनेकवेळा भेटलो. प्रत्येकवेळी त्यांच्यातील कलाकार आणि माणूस मला नव्याने उमजत गेला. ‘महेश वामन मांजरेकर’ हे नावही ऐकले, तरी मराठीतील ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘मी शिवाजी पार्क’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट डोळ्यासमोर येतात. महेश मांजरेकर यांच्या करिअरवर नजर टाकता, त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात काम केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अभिनयापासून ते दिग्दर्शन, निर्मिती, संकलन, गायन सगळीकडे त्यांनी उत्तम कामे केली आहेत. इव्हेंटमध्येही त्यांचे भरपूर मोठे योगदान आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करणारा कलावंत अशी महेश मांजरेकर यांची ओळख.
महेश मांजरेकर यांचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास हा अत्यंत रंजक आणि तेवढाच प्रेरणादायी. एखाद्या क्षेत्रात यश मिळत असतानाही, दुसऱ्या क्षेत्रात आपल्याला काम जमते का, याचा ते कायम अंदाज घेत राहिले. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांची उपस्थिती कायम जाणवत राहिली. मराठी कलाकार असूनही महेश यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले आणि हिंदीमध्ये मोठे झाल्यानंतर मराठीत एकापेक्षा एक सरस कलाकृती तयार केल्या, हे महेश यांचे वैशिष्टय. त्यामुळेच आजही ते या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभे आहेत.
महेश वामन मांजरेकर हे नाव ज्या सिनेमात असेल, त्या सिनेमात काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की जाणवतं. या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीत एक निराळा बदल घडवून आणला. निर्माता, दिग्दर्शक, गायक, अभिनेता, लेखक या सर्व भूमिकांमधून त्यांनी प्रवास केला. त्यांनी आपल्या कलेची जाण रसिकांना करून दिली.
महेश मांजरेकर यांचा जन्म १९५८ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात मुंबईत झाला. १९८४ साली त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदाच त्यांनी ‘अफलातून’ या नाटकामधून केलेला अभिनय रंगभूमीवर बराच गाजला आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात वाटचाल करायला सुरुवात केली.’गिधाडे’, ‘ऑल द बेस्ट’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. निर्मिती सोबतच त्यांना दिग्दर्शनातही तितकाच रस होता.
१९९०च्या दशकात त्यांनी ‘आई’ हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यांचं नशीब इतकं बलवत्तर की, या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. अभिनेत्री नीना कुलकर्णी व अभिनेते शिवाजी साटम यांच्या त्यात भूमिका होत्या. अतिशय संयत हाताळणी केलेला हा चित्रपट चांगला चालला होता. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीकडून हिंदी चित्रपट सृष्टीत झेप घेतली. ‘निदान’ या सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना या सिनेमामध्ये पाहुणे कलाकार म्हणून ज्याने अभिनय केला, त्या अभिनेते संजय दत्तला ‘वास्तव’ या चित्रपटाची कथा महेशजींनी ऐकवली आणि कथा ऐकताच संजय दत्त या सिनेमासाठी तयार झाला. १९९९ मध्ये ‘वास्तव’ हा चित्रपट प्रदर्शित देखील झाला. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर नावारूपाला आले. मुंबईतील गुन्हेगारी विश्व मांजरेकरांनी ‘वास्तव’ या चित्रपटाद्वारे पडद्यावर आणले. गुन्हेगारीत अडकलेली मुले व त्यांचे भावविश्व त्यांनी अतिशय छान रेखाटले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ या चित्रपटातही गुन्हेगारी असली तरी त्याला प्रेमकथेची जोड होती. पण, मांजरेकरांनी ‘वास्तव’ मांडताना त्याला कुटुंबाशी जोडले. त्यामुळे त्याचा परिणामही व्यापक झाला. या पहिल्याच चित्रपटाने त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या. ‘वास्तव’ नंतर अगदी वेगळा विषय मांडणारा त्यांचा ‘अस्तित्व’ हा चित्रपट आला. पतीच्या अनुपस्थितीत परपुरूषाशी संग करणाऱ्या व ही बाब खूप वर्षांनी उघडकीस आल्यानंतर त्याची कबुली देऊन प्रसंगी घराबाहेरची वाट धरणारी स्त्री, असा या चित्रपटाचा विषय. मांजरेकरांनी या कथेची हाताळणी उत्तमरीत्या केली. त्यामुळे चित्रपटाचा तोल कुठेही ढासळत नाही. विशेष म्हणजे, पतीशी कोणतीही तडजोड न करता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेणारी स्त्री दाखवून मांजरेकरांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीच्या पारंपरिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व दिले. यात प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने कमालीचा सुंदर अभिनय केला. समीक्षकांनीही या चित्रपटाचे तुफान कौतुक केले. या चित्रपटाने मांजरेकरांच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब झाले. त्यांचा ‘निदान’ हा चित्रपट एड्स विषयावरचा होता. त्याची हाताळणीही छान केली होती. यानंतर मांजरेकर व्यावसायिक सिनेमाच्या धारेला लागले. पण, त्यात त्यांना तुलनेने कमी यश मिळाले, फक्त चर्चा जास्त झाली. ‘रक्त’, ‘जिंदा’, ‘हथियार’, ‘कुरूक्षेत्र’, ‘पिता’, ‘जिस देश में गंगा रहता है’ यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले.
त्यानंतर कधीच त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एकामागोमाग एक हिंदी चित्रपट बनवत असताना त्यांचे काही चित्रपट यशस्वी झाले, तर काही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाही. तरीसुद्धा ते खचले नाही. दिग्दर्शक संजय गुप्ताच्या ‘कांटे’ या सिनेमात अभिनय करायची संधी महेश मांजरेकरांना मिळाली. खलनायकी शेड असलेली भूमिका त्यांनी विनोदी पद्धतीने साकारली आणि ‘अभिनेता’ म्हणून त्यांचं खूप कौतुक झालं. मराठी आणि हिंदी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही त्यांनी झेप घेतली. खलनायकाच्या अनेक भूमिका त्यांनी केल्या. असं म्हणतात सलमानच्या ज्या चित्रपटात महेश मांजरेकर असतील, तर तो चित्रपट सुपरहिट होतोच. ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘जय हो’ व ‘दबंग ३’ आणि असे बरेच सिनेमे त्यांनी सलमानसोबत केले. या व्यतिरिक्त ‘ओ माय गॉड’, ‘हिम्मतवाला’, ‘शूटआऊट ऍट वडाला’, ‘वन्स अपॉन टाइम- इन मुंबई अगेन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘विरूद्ध’ या चित्रपटाने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. व्यवस्थेविरोधात टक्कर घेणारा वृद्ध अशी या चित्रपटाची थीम होती. मांजरेकरांनी त्याची हाताळणी अतिशय छान केली. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन व अभिनेत्री शर्मिला टागोर यांना एकत्र आणून चरित्र अभिनेत्यांचे नवे कॉम्बिनेशन त्यांनी मांडले. ते यशस्वीही ठरले.
हिंदीमध्ये काम करत असताना त्यांनी कधी मराठी चित्रपटसृष्टीला दुय्यम स्थान दिले नाही. मांजरेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटात मराठी अभिनेत्यांना ते बराच वाव देतात. त्यामुळे चांगले अभिनेते असलेले, पण केवळ मराठीपुरते मर्यादित राहिलेल्या अनेकांना हिंदी चित्रपटांचे मोठे आभाळ खुले झाले. मराठीमधले कलाकार हिंदीमध्ये नावारूपाला यावे म्हणून त्यांनी ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या चित्रपटात बहुतांशी मराठी कलाकार घेतले. तसेच हिंदी मधल्या ‘अस्तित्व’ या चित्रपटाचा इंग्लिश रिमेक प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिला घेऊन बनवला आणि त्या चित्रपटाचं नाव होत ‘इट व्हॉज रेनींग नाईट.’ या सर्व भूमिकांसोबत त्यांनी संकलन क्षेत्रातही काम केलं. त्यासोबतच त्यांना गाणंही छान जमतं. विशेष म्हणजे, त्यांनी मराठी पुरस्कार सोहळ्यांच रूप पालटलं आणि स्थापित केला ‘मिफ्टा पुरस्कार’ सोहळा.
महेश मांजरेकर यांनी खूप दर्जेदार चित्रपट बनवले. अनेक कलाकारांना नावारूपाला आणलं आणि मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत होतेय अशी प्रचिती सर्वांना झाली. ‘मातीच्या चुली’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. ‘नटसम्राट’ या चित्रपटासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सर्वांनीच पाहिली. या चित्रपटाने घवघवीत यश तर मिळवलेच, पण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक, संकलनकार अशा विविध भूमिकांमधून प्रवास करणाऱ्या प्रतिभावंत कलाकार महेश मांजरेकर यांचे योगदान मोठे आहे. विषयांचे वेगळेपण, त्याची वेगळी मांडणी करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये महेश मांजरेकर या मराठी माणसाचे नाव फार उंचीवर आहे.आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या महेश मांजरेकर यांचे आयुष्यही फिल्मीच आहे.त्यांचे दोनदा लग्न झाले. महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणांनी महेश आणि दीपा वेगळे झाले आणि अश्वमी-सत्या ही दोन्ही मुले महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात. दीपा मेहता या ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रॅण्ड चालवतात. त्यांची मुलगी अश्वमी या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंगचे कामही करते. मेधा यांना पाहताच पहिल्याच नजरेत महेशजी त्यांच्या प्रेमात पडले होते. मेधा मांजरेकर यांनी ‘आई’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या महेश मांजरेकर यांनी मेधा यांना पाहताच त्यांची या चित्रपटासाठी निवड केली होती. त्यानंतर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर सोबत संसार थाटला. मेधा मांजरेकरांना घेऊन त्यांनी अनेक मराठी चित्रपट बनवले. ‘निदान’, ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘दे धक्का’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या आणि या जोडप्याने ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केलं. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई दिसायला फारच देखणी असून ‘काकस्पर्श’ या चित्रपटात मेधा यांच्यासोबत त्यांची मुलगी सई झळकली होती. नुकत्याच आपल्या ‘दबंग ३’ या चित्रपटात सई ही प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्यासोबत चित्रपटात झळकली होती. महेश मांजरेकर यांचा मुलगा ‘सत्या’ याने ‘एफ यु’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ‘सैराट’ फेम आकाश ठोसरचीही मुख्य भूमिका होती; पण हा चित्रपट फारसा चालला नाही.
महेश मांजरेकर यांनी मराठी ‘बिग बॉस’ शोचे होस्ट म्हणून दोन सिझन काम केले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्व, कणखर आवाज आणि करारी नजर असलेल्या महेश मांजरेकर यांची मराठी, तसेच हिंदी चित्रपटक्षेत्रातही फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. मराठीत महेशजी दिग्दर्शक म्हणून काम करत असले, तरी हिंदीत अजूनही दिग्दर्शक म्हणून ते तेवढे अॅक्टिव्ह नाहीत. मुळात सिनेमा या प्रकाराला भाषेचं बंधन नसतं, असे त्यांचं प्रामाणिक मत आहे.
नुकत्याच प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आलेल्या त्यांच्या ‘भाई’ व ‘भाई-२’ या दोन्ही चित्रपटांवर खूप टीका झाली. पण, त्यांना जे मांडायचं होतं, ते त्यांनी या चित्रपटातून मांडलं आहे. त्यांना त्यांच्या कलाकृतीवर विश्वास होता.राजकारणात देखील त्यांना फार यश मिळालं नाही. सध्या ते वेबसीरिजच्या कामात व्यस्त आहेत. महेश मांजरेकर हे नेहमीच परखड बोलतात. त्यामुळे काही माणसं दुखावली जातात हे खरं. पण, चांगुलपणाचा खोटा आव ते आणू शकत नाही. यामुळे अनेकजण त्यांना घाबरतात. पण, तो आदरयुक्त दरारा आहे. काही लोकांना त्यांचा हा स्वभाव माहीत आहे. त्यांच्या जवळची माणसं मात्र त्यांना घाबरत वगैरे नाहीत. त्यांच्याबरोबर ते अगदी मनमोकळे असतात.
‘क्रिकेट’ हा खेळ त्यांच्यासाठी जीव की प्राण. पूर्वी त्यांनी क्रिकेटचं प्रशिक्षणही घेतलं होतं. क्रिकेट हा खेळायला छान असला तरी बघायला तो काहीसा कंटाळवाणा आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांना बघायला आवडतो तो ‘फुटबॉल’. त्यांच्या घरी टीव्हीवर सतत क्रीडा वाहिन्या सुरू असतात. त्यांना फुटबॉलची इत्थंभूत माहिती आहे .अर्थात, क्रिकेट खेळायला त्यांना खूप आवडतं.तसेच त्यांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. अनेक मित्रांचे मोबाईल नंबर त्यांचे तोंडपाठ आहेत. विविध हिंदी तसेच मराठी मालिका, चित्रपटातून काम केलेल्या महेश मांजरेकर यांचा मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नाटक, सिनेमांच्या एकामागोमाग एक कलाकृतींनी प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचा खजिना खुला करणारे महेश मांजरेकर म्हणजे एक अफलातून आणि अस्सल व्यक्तिमत्त्व. त्यांची प्रत्येक भूमिका लक्षात राहते आणि त्यांचा ‘स्पर्श’ लाभलेली प्रत्येक कलाकृती खुलते. मनोरंजनसृष्टीपलीकडे जात, एक माणूस म्हणून, संवेदनशील नागरिक व मित्र म्हणूनही ते परिचित आहेत. अशा मोठ्या मनाच्या ‘वास्तव’ कलाकाराला मनापासून सलाम.
- आशिष निनगुरकर