नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात चिथावणी खोर भाषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरजिल इमामवर दिल्ली पोलिसांनी साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी २८ जानेवारी रोजी शरजीलला बिहारच्या जहानबादमधून अटक केली होती. यानंतर तब्बल दोन-अडीच महिन्याच्या कालावधीनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीविरोधात आंदोलने सुरु असताना शरजिलच्या व्हिडिओची एक क्लिप व्हायरल झाली होती. १३ डिसेंबर २०१९ रोजी जामिया मिलियात त्याने एक चिथावणीखोर भाषण केले होते. ज्यात इशान्येकडील राज्य भारतापासून तोडण्याची भाषा वापरण्यात आली होती. १५ डिसेंबर रोजी जामिया परिसरात मोठा दंगा व हिंसाचार झाला. १३ डिसेंबर २०१९रोजी जामियात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणात शरजीलवर दिल्ली पोलिसांनी शरजिलवर चिथावणीखोर भाषणे करणे व दंगल घडवून आणल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम १२४ए आणि १५३ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.