
कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावी आणि वरळी परिसरातील नागरिकांना ड्रोनद्वारे दिल्या जाणार सूचना!
मुंबई : मुंबईतील दाट लोकवस्ती असेलेल्या धारावी आणि वरळी कोळीवाड्यांसारख्या भागांवर आता ड्रोनची करडी नजर असणार आहे. या भागांमध्ये मुंबई पोलिस ड्रोनला स्पीकर लावून त्याद्वारे नागरिकांना गर्दी करु नका, घरीच बसा अशा सूचना देणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरळी कोळीवाड्याची पाहणी करत या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले की, 'मुंबईतील दाटलोकवस्ती असलेल्या धारावी, वरळी कोडीवाडा या सारख्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या भागात स्पीकर ड्रोनच्या माध्यमातून लोकांना सूचना देण्यात येणार आहे.' कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता ड्रोनचा वापर मुंबई शरहातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात केला जात आहे. ५ ते ६ ड्रोन मुंबईत आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, घराच्या बाहेर पडू नये, फक्त भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. 'घरी रहा सुरक्षित रहा' हा संदेश देण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. लोकांना वारंवार आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी सहकार्य केले जात आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी बोलून दाखवली.