
मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे. यामध्ये मुंबईत ११३, रायगड एक, अमरावती एक, पुणे चार, मीरा-भाईंदर सात, नवी मुंबई दोन, ठाणे परिसर दोन, भिवंडीत एक, वसई विरार दोन, पिंपरी चिंचवड एक, असे १३४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. पुण्यात कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.
पुण्यात ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा स्लिप अपनिया आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी महिला ५६ वर्षीय असून सोमवार पेठेत राहत होती. तिला ५ एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिलाही रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी तिचे अवयव निकामी झाल्यामुळे तसेच करोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण आधीच्या करोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तसेच मालेगावमधील करोना रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे.
नागपूर - मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना लागण
नागपूरमध्ये रविवारी कोरोनाचे १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील ८ नमूने मेडिकल आणि ६ नमूने मेयोत तपासले गेले. त्यापैकी मेयोत उपचार घेत असलेले चार जण मरकझशी निगडीत आहेत. उर्वरित दोघे सहवासात आल्याने लागण झाली.
भिवंडीत रविवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंब्रा येथे जमातच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या घरापासूनचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.