भारतीय रसायनशास्त्राचे जनक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी उपचार म्हणून संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष वेधायला भाग पाडणारे औषध ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चे निर्माते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्याविषयी...
'ड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ हे नाव गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत प्रमुख शस्त्र म्हणून जगासमोर आले. १००वर्षापूर्वी भारतात तयार झालेल्या या औषधाची मागणी जगभरातून होताना दिसते. मलेरियावर वापरल्या जाणार्या या औषधाचा भारत एक प्रमुख उत्पादक देश. हे औषध बनविणारी ‘बंगाल केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ ही देशातील एकेकाळची सर्वात मोठी कंपनी. भारतीय रसायनशास्त्राचे जनक आणि या कंपनीचे संस्थापक भारताचे महान वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्याबद्दल जाणून घेणे अधिक संयुक्तिक ठरेल.
‘भारताने अशी प्रगती करावी की, किमान जीवनरक्षक औषधांसाठी तरी आपल्याला पाश्चिमात्य देशांपुढे हात पसरावे लागणार नाही,’ असे स्वप्न आचार्य रे यांनी पाहिले होते. विशेष म्हणजे, आज कोरोनाचे संकट गडद होत असताना जगातील अनेक देश भारताकडे मदत मागत आहे. आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म बंगालच्या खुलना जिल्ह्यातील रुरुली कटिरा (सध्याचे बांगलादेश) येथे २ ऑगस्ट, १८६१ रोजी झाला. प्रफुल्लचंद्र यांचे वडील हरिश्चंद्र रे हे पर्शियन विद्वान होते. त्यांचे इंग्रजी भाषेकडे विशेष आकर्षण असल्या कारणाने त्यांनी आपल्या गावातच शाळा सुरू केली. त्याच शाळेत प्रफुल्लचंद्र यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या बाराव्या वर्षी जेव्हा मुलांना परिकथा ऐकण्यात रस असतो, त्यावेळी प्रफुल्लचंद्र यांना गॅलिलियो आणि न्यूटन यांसारख्या शास्त्रज्ञांची चरित्रे वाचण्यात रस होता. या शास्त्रज्ञांच्या कार्याचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. तत्कालीन प्रसिद्ध आणि नावाजलेल्या १०० इंग्रजी लेखकांच्या यादीत केवळ एका भारतीय व्यक्तीचे म्हणजेच राजा राममोहन रॉय यांचे नाव पाहिल्यावर प्रफुल्लचंद्र यांना धक्का बसला. या यादीत आपलेही नाव असावे, या ध्यासाने त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. पुढे त्यांनी कोलकात्याच्या प्रसिद्ध ‘हेअर' व 'अल्बर्ट विद्यालया’तून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
कोलकाता विद्यापीठातून डिप्लोमा पूर्ण होताच त्यांना १८८२मध्ये ‘गिलक्रिस्ट स्कॉलरशिप’द्वारे परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यानुसार एडनबर्ग विद्यापीठातील सहा वर्षांमध्ये रसायनशास्त्रातील प्रख्यात अभ्यासक प्रोफेसर जेम्स वॉकर, अलेक्झांडर स्मिथ आणि हफ मार्शल या वर्गमित्रांच्या संगतीत प्रफुल्लचंद्र यांचा रसायनशास्त्राकडे कल वाढला. १८८७ साली डीएससीची परीक्षा त्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. १८८७-८८ मध्ये एडनबर्ग विद्यापीठाच्या रसायनशास्त्र सोसायटीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. भारतात परतताच जुलै १८८९ मध्ये ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’मध्ये रसायनशास्त्राच्या साहाय्यक प्राध्यापक पदावर २५० रुपये मासिक पगारावर ते रुजू झाले. त्याचवर्षी ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाईट’ही पदवी दिली. १९१६ मध्ये ते ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’मधून रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर १९१६ ते १९३६ पर्यंत त्यांनी त्याच ठिकाणी ’मानद प्राध्यापक’ म्हणून काम केले. १९३३मध्ये ‘बनारस हिंदू विश्वविद्यापीठा’चे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांनी प्रफुल्लचंद्र यांना ‘डीएससी’ची ‘मानद पदवी’ प्रदान केली. दरम्यानच्या काळात त्यांनी परदेशातील अनेक विज्ञान संस्थांच्या सदस्यपदी काम केले. प्रफुल्लचंद्र यांनी रसायनशास्त्र क्षेत्रात १२०शोधनिबंध प्रकाशित केले. ‘म्युररस नायट्रेट’ आणि ‘अमोनियम नायट्रेट’ नावाच्या संयुगांच्या पहिल्या निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली.
‘प्रेसिडेन्सी कॉलेज’मध्ये काम करत असताना त्यांना तत्कालीन महान फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ बार्थेलोना यांचे ’द ग्रीक एल्केमी’ हे पुस्तक वाचायला मिळाले. ताबडतोब त्यांनी बार्थेलोना यांना एक पत्र लिहिले की, भारतात प्राचीन काळापासून रसायनशास्त्राची परंपरा आहे. बार्थेलोनांच्या आग्रहाने आचार्य यांनी नागार्जुनच्या ’रसेन्द्रसारसंग्रह’ या पुस्तकावर आधारित ’प्राचीन हिंदू रसायनशास्त्रा’बद्दल एक दीर्घ परिचयात्मक लेख पाठविला. आचार्य रे यांच्या कार्याचे कौतुक करत ’जर्नल डे सावंट’मध्ये हा लेख प्रकाशित केला. यामुळे प्रोत्साहित होऊन अखेर आचार्य रे यांनी आपल्या ‘हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री’ या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले. ते पुस्तक जगप्रसिद्ध झाले. या पुस्तकातून प्राचीन भारताच्या महान रसायनशास्त्राचा ठेवा संपूर्ण जगासमोर आला. दरम्यान, १८९२साली रे यांनी कोलकाता येथे ‘बंगाल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स’ नामक एक प्रयोगशाळा स्थापन केली. बंगालमधील तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना जागृत करणे, ही त्यांची यामागील कल्पना होती. पुढे १९०१मध्ये दोन लाख रुपये खर्च करून ‘बंगाल केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून स्थापना केली. औषधे तयार करण्याच्या दृष्टीने हा छोटासा प्रयत्न म्हणून त्यांनी ही कंपनी स्थापन केली.
रे यांच्या नेतृत्वात ‘बंगाल केमिकल्स’ची झपाट्याने वाढ झाली. १९०५मध्ये कोलकाताच्या माणिकलता येथे त्यांचा पहिला कारखाना सुरू झाला. १९२०मध्ये त्यांनी पानीहाटी येथे दुसरा कारखाना सुरू केला आणि त्यानंतर १९३८मध्ये मुंबईत तिसरा कारखाना सुरू झाला. ‘कोलकाता केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ ही मलेरियाविरोधी औषधांची निर्मिती करणारी एकमेव सरकारी संस्था आहे. ‘बंगाल केमिकल्स’ने एचक्युसीचे उत्पादन सुरू केले. परंतु काही दशकांपूर्वी उत्पादन बंद केले. कोरोना विषाणूमुळे ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ची मागणी वाढल्यामुळे ‘अॅण्टिमलेरियल’ औषध निर्मितीच्या परवान्यासाठी पुन्हा अर्ज करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अशा या महान वैज्ञानिकाचे १६जून १९४४ रोजी निधन झाले. १९६१ साली भारतीय टपालसेवेने आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित केले होते. अशा भारतीय रसायनशास्त्राच्या निर्मात्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विनम्र अभिवादन...!