श्री क्षेत्र टेरवमध्ये सुरु होणार शिमगोत्सव!

    09-Mar-2020
Total Views | 69
shimga_1  H x W




रत्नागिरी : निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात १० मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.


९ मार्च रोजी रात्री वाडीतील ग्रामस्थ पूजन करून होळी प्रज्वलीत करतील. १० मार्च रोजी सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई मंदिरासमोर लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधिवत पुजा करण्यात येईल. मंदिरातून पालखी सजवून मंदिरा समोरील सहाणेवर आसनस्थ होईल. सकाळी ९ वाजता ढोल, ताशे व वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करून ग्रामस्थ होमात श्रीफळ अर्पण करतील सुवासिनी सहाणेवर देवीच्या ओट्या भरतील व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न होईल. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात येणाऱ्या ह्या होळीला भद्रेचा शिमगा असे सुद्धा संबोधले जाते.


संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर येथील पुरातन शंकर मंदिर जवळील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखी मिरवणुकीने निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्री मंदिरात आणली जाईल. यास देवीचा छबिना असे म्हणतात. छबिन्याच्या वेळी वाडी - वाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाईसह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करतात व गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत करतात. वाडीवाडीतीलसुवासिनी छबिन्याच्या वेळी ठिकठिकाणी आरती करून ओट्या भारतात.११ रोजी पालखी प्रथम गावच्या दोन मानकऱ्यांच्या घरी जाईल व नंतर निम्मेगाव येथे घरोघरी नेण्यात येईल व अशा प्रकारे १२ रोजी लिंगेश्वरवाडी व १३ रोजी राधाकृष्णवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात येईल. १३ रोजी पालखी चार वाजता परत मंदिरात आणून रूढी परंपरेप्रमाणे पूजन व विधी करून धुळवड (रंगपंचमी) साजरी करण्यात येईल, यालाच शिंपणे असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थ मंदिरात उपस्थित असतात.


१४ रोजी पालखी तळेवाडी - दत्तवाडी, १५ रोजी कुंभारवाडी, १६ रोजी तांदळेवाडी, गुरववाडी व खांबेवाडी, १७ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर). १८ रोजी वेतकोंड वाडी, १९ रोजी भारतीवाडी, २० रोजी तांबडवाडी आणि २१ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात येईल. घरोघरी पालखी नेण्यात येते यास भोवनी असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवात अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जून उपस्थित राहतात. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत -गाजत वाडी - वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होते. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्याप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी उपस्थित राहतात. सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविला जातो. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजवितात, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता रुपी भंडारून करण्यात येते. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात, अशी माहिती स्थानिक सुधाकर कृष्णाजीराव कदम यांनी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121