गुढीपाडवा- हिंदू नववर्षाचा आरंभ !!

    24-Mar-2020
Total Views | 192
gudhi padwa_1  



वसंत ऋतूचे आगमन होताच वृक्षांना नवी पालवी फुटते. आंबा,कडुनिंब मोहरून जातो. पळसालाही बहर येतो. कोकिळा सुद्धा स्वर आळवायला सुरुवात करते. अशा या सुगंधित वातावरणात चाहूल लागते ती नववर्षाची. चैत्र शुद्ध प्रतिपदेची.




गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ. नवीन वर्षाची सुरुवात. राम अयोध्येत आले तो दिवस! चैत्री श्रीराम नवरात्र! वासंतिक देवी नवरात्र आरंभ,विक्रम संवत आरंभ. संघ संस्थापक डाँ. हेडगेवार यांचा जन्मदिवस! वसंत ऋतूचा आरंभ! या काळात निसर्गाचे नवे रंग-रूप बघायला मिळतात. आंब्याचा मोहराचा सुगंध याच काळात पसरतो. खरंतर सर्व उत्सवांचे प्रवेशद्वार म्हणजे वर्षप्रतिपदा!! महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा हा सण म्हणजे नवे संकल्प,नव्या योजनांची सुरुवात असते. याच दिवशी या संकल्पनांची, योजनांची अंमलबजावणी करून सर्वत्र गुढी उभारली जाते.

गुढी आमुची उभी राहते, आकाशी उंचावुन मान ।
भारतीयांची उच्च संस्कृती, मिरवीतसे अभिमान ।।


अशी ही गुढी संस्कृती आणि अभिमानाने मान उंचावून उभी असते. पृथ्वीच्या आपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरणाऱ्या काळाला 'वर्ष' हे नाव आहे. हा काळ तीनशे पासष्ट दिवस, पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे व शेहेचाळीस सेकंद एवढा असतो. इंग्रजी वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे मानले जाण्याचे कारण हेच. हिशेब पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यात दर चार वर्षांनी एक दिवस मिळवतात या वर्षालाच लीप इयर किंवा प्लुत वर्ष म्हणतात. भारतामध्ये वर्षगणना करण्याचे ब्राह्म, पित्र्यू, दैव, प्रजापत्य, गौरव, सौर, सावन, चांद्र आणि नक्षत्र असे नऊ प्रकार मानले जातात. भारतात सौर गणना प्रचलित असून त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला कालगणना सुरू होते. तिलाच वर्षप्रतिपदा असे म्हणतात. शालीवाहनशकाचे वर्ष याच दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व इतरत्रही नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेसच होतो. यात काही धार्मिक विधीही करावयाचे असतात त्यात ब्रह्मपुजा हा प्रधान विधी असतो. त्याचा इतिहास आपल्याला स्वतंत्रपणे ब्रह्मपुराणात बघायला मिळतो. ब्रह्मदेवाने याच दिवशी सकाळी विश्वनिर्मिती केली व कालगणनाही सुरु केली.


या दिवशी शुचिर्भूत होऊन दाराला तोरण बांधावे. देवपूजा करून गुढी उभारावी. खरं तर सोबत ध्वज ही उभारावा. सातत्याने होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून जरीचे वस्त्र उभारण्यास सुरुवात झाली. “ब्रह्मध्वजाय नमः” असे म्हणून गुढीचे पूजन करावे. सर्व उत्सवाच्या प्रवेशद्वारावरील उत्सवाची मांडणी ही जाणीवपूर्वक व विचारानेच केली आहे. गुढीवरील कलश यशाचे प्रतीक तर कडुलिंब आरोग्यासाठी, पुष्पहार मांगल्याची खूण तर साखर गाठी माधुर्य भाव प्रदर्शित करण्यासाठी,जरीचे वस्त्र वैभवासाठी तर काठी सामर्थ्य उन्नतीसाठी. नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प. त्या संकल्पपूर्तीची गुढी उभारूया. वसंत ऋतू म्हणजे झाडाला नवी पालवी फुटण्याचा काळ. यातून निसर्गाशी, ऋतूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अपेक्षित असावा. आणि सहजपणे वाटून जाते की आपल्या सणांची मांडणी ही जाणीवपूर्वक केली आहे.


गुढीपाडव्यापासून सर्वत्र श्रध्दाकेंद्रामधून उत्सवी वातावरण असते. वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण यांची पारायणे चालू असतात. राम नवरात्र ही ह्याच काळात असते. कीर्तने चालू असतात, गीत रामायण सारखी अजरामर काव्य सगळीकडे ऐकायला मिळतात त्यामुळे वातावरण भक्तीमय असते. रामनवमी संपली की हनुमान जयंतीची लगबग सुरू होते. रामाच्या मानाने हनुमानाची देवळे अधिक असतात. त्या सर्वठिकाणी मंडप उभारलेले जातात. तोरणे लावली जातात आणि हनुमानचालिसा पाठ सुरू असतात. रामजन्म ऐन माध्यान्ह आणि हनुमान जन्म सूर्योदयाचा. दोन्ही कार्यक्रम गैरसोयीचे असले तरीही भाविकांची गर्दी तुडूंब असते. कारण श्रद्धेला काळ आणि वेळेचे बंधन नसते. यावर्षी आणखीन गौरवशाली क्षणांचे आपण साक्षीदार होणार आहोत. अयोध्येतील रामजन्म भूमीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात आला आणि भव्य मंदिर लवकरच डौलाने उभे राहणार आहे. आपण भाग्यवान आहोत की या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार आहोत.


या काळात सकाळ व संध्याकाळ अतिशय प्रसन्न असते. संध्याकाळी तर कातरवेळ असून सुद्धा हुरहूर लागत नाही. मंद व सुखद झुळूक वाहत असतात. स्वच्छ चांदण शीतलता प्रदान करत असतं. सगळीकडे धार्मिक वातावरण असताना मन आनंदून जातं. भुकेसाठी विविध फळ उपलब्ध असतात. प्यायला माठातील वाळामिश्रित थंड पाणी असतं. झोपेसाठी पतली पांघरूण असतात. रात्रीच्या वेळी बागेतील मोगऱ्याचा सुगंध अनुभवता येतो. हे सर्व मानवी मनाला चैतन्य, उत्साह व रमणीयता प्रदान करतात. पण सध्या कोरोना सारख्या विषाणूचं सावट संपूर्ण जगावर आहे. आणि या परिस्थितीत आपण आपली संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. लवकरच त्यातून आपण पूर्णपणे बाहेर येऊच हा विश्वास आहे. विश्वशांतीसाठी या शार्वरी संवत्सरात प्रार्थना करत सगळीकडे निरामय आरोग्य व शांतीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे.


भारतीय सणांमधील शास्त्रीय,सामाजिक,व धार्मिक कारणे समजून घेतले तर जाणीवपूर्वक हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल आणि त्याचा आनंद अधिक द्विगुणित करणारा असेल. आपल्याला येणारे नवे वर्ष सुख,शांती,समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच मंगलकामना.


नूतन वर्षाभिनंदन !!



- सर्वेश फडणवीस

अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121