‘कोरोना गो’चा विनोद...

    22-Mar-2020   
Total Views | 106


corona_1  H x W


कोरोनाबद्दल अशा अफवा अज्ञानातून का होईना, पसरवल्या जात आहेत. या गोष्टी अर्थातच हसण्यावारी नेण्यासारख्या नाहीतच. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुरू आहे आणि या असल्या गोष्टींमुळे कळत नकळत याही परिस्थितीमध्ये चेहर्‍यावर हसू उमटते.


कोरोनाच्या या युद्धस्थ स्थितीमध्ये आढळलेल्या विसंगतीतही मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडत आहेत. या पैलूमुळे या गंभीर स्थितीतही चेहर्‍यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. ‘कोरोना गो, कोरोना गो’ हा रामदास आठवले यांचा मंत्र तर आज सर्वच ठिकाणी मंत्रोच्चारासारखा उच्चारला जात आहे. कोरोना कुणी माणूस नाही, कुणी प्राणी नाही, कुणी रोबोट नाही की त्याला सूचना दिल्या की तो जाईल. पण हा मंत्र आज सगळेच म्हणत आहेत. ‘सायमन गो बॅक’सारखा इफेक्ट ‘कोरोना गो’ या मंत्राला झाला आहे. कुणी पूजा करते आहे, कुणी हवन करते आहे, कुणी प्रार्थना करते आहे तर कुणी गो कोरोनाचा केक कापत आहे.



एक व्हिडिओ पाहिला, हवन करताना, पूजा करताना एक भगवे वस्त्रधारी सांगतात, “जिथे करुणा संपली, तिथे कोरोना तयार झाला. त्या कोरोनाला शांत करण्यासाठी ही पूजा आहे.” अर्थात बुद्धीवाद्यांच्या नजरेतून हे अतिच झाले असे वाटू शकते. पण चीन अमेरिकेच्या जैविक युद्धाची बात तूर्तास बाजूला ठेवली आणि पाहिलं तर? तर आढळते की, वुहानच्या मासळी, मटण बाजार हे कोरोनाचे केंद्र आहे. तिथली कुणाही प्राण्याला मारून खाण्याची पद्धती वगैरे वगैरे केंद्रबिंदू आहे, असे जग म्हणत आहे. थोडक्यात सजीव जीवांविषयी करुणा संपली म्हणून कोरोना झाला, तर दुसरीकडे एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यात बुरखाधारी खाला म्हणते की, “आम्ही का कोरोनाला घाबरू? कोरोना आमच्या कुराणमधून आला आहे. अजून वाईट वाईट आजार येतील.यावर काय म्हणावे? हे सगळे यांना कोण सांगते? इतकी अंधश्रद्धा असू शकते? पण अशी अंधश्रद्धा आहे, हेही सत्य आहे. कोरोना आपल्याला होणारच नाही, असा आत्मविश्वास चांगला. पण आपण विशिष्ट धर्माचे आहोत म्हणून कोरोना आपल्याला घाबरतो या अतर्क्य अंधश्रद्धेचे काय? इराणमध्ये आज कोरोनाने हाहाकार माजवलाच ना. जात-पात-धर्म अगदी देशाच्या सीमा लांघून कोरोना सर्वांचा बळी घेत आहे. अशा वेळी कोरोनाबद्दल अशा अफवा अज्ञानातून का होईना, पसरवल्या जात आहेत. या गोष्टी अर्थातच हसण्यावारी नेण्यासारख्या नाहीतच. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुरू आहे आणि या असल्या गोष्टींमुळे कळत नकळत याही परिस्थितीमध्ये चेहर्‍यावर हसू उमटते.



हेही सामाजिक गुन्हेगार...



परिस्थिती आल्यावरच माणसाची सज्जनता आणि दुर्जनता समोर येते, हे नक्की. आपण किंवा आपल्यामुळे दुसरे कोणीही कोरोनाचे शिकार होऊ नये यासाठी सज्जनशक्ती प्रयत्नशील आहे. मात्र, याच परिस्थितीमध्ये काही लोकांच्या सज्जनतेचे मुखवटे फाटले आहेत.कनिका कपूरवर गुन्हा दाखल झाला आहे. कारण, ही बेबी डॉल स्वतः कोरोनाग्रस्त आहे, तिला माहिती असून तिने लखनौमध्ये उच्चपदस्थांच्या पार्टीमध्ये सहभाग घेतला. इतकेच नाही तर नातेवाईकांच्या कौटुंबिक कार्यक्रमालाही तिने हजेरी लावली. परदेशातून भारतात आल्यावर एअरपोर्टवर परदेशातून आली आहे म्हणून कोरोनाची प्राथमिक तपासणी होऊ नये म्हणून ती एअरपोर्टवर लपूनही राहिली आणि संधी मिळताच पळून गेली. दुसरीकडे इगतपुरी आणि इतरत्रही काही ठिकाणचे क्वारंटाईन केलेले रुग्ण पळून गेले. श्रीनगरच्या विमानतळावर बांगलादेशाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार देत धिंगाणा घातला. बांगलादेशातून भारतात परतलेले विद्यार्थी म्हणे बांगलादेशात शिकायला गेले होते. काय फायदा त्यांच्या उच्च शिक्षणाचा? ‘अल्लाहची मर्जी कोरोना झाला,’ असे म्हणत उपचार नाकारू पाहणार्‍या केरळच्या चार मुस्लीम विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागूण होऊनही उपचाराला नकार दिला. ‘अल्लाहची मर्जी आहे, म्हणून त्यांना कोरोना झाला,’ असे त्यांचे मत असले तरी त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले निष्पापही नाहक कोरोनाग्रस्त होतील. होतीलच. पण याबद्दल त्यांना काही वाटत नाही. कारण त्यांच्यात दुसर्‍यांविषयीची आत्मीयताच मेली आहे. हे कोणते इमान आहे? हे असे वागणे कोणत्या धर्मग्रंथात सांगितले आहे? कोणत्याच नसावे. पण तरीही यांचे नाटक सुरू आहे. या सगळ्यांना असे का वाटले नाही की, आपल्यामुळे दुसर्‍यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होईल. कशाला समाजाचे नुकसान करायचे? पण नाही. या लोकांना समाजाशी काही देणेघेणे नाही. कोरोना झाला म्हणून भारतात ते आले आहेत. या देशात ते स्वत:हून आपल्या मर्जीने आले, असे वाटत नाही. त्यांचे शिक्षण, त्यांची पदप्रतिष्ठा सगळे सगळे शून्य झाले आहे. समाजाविषयीची करुणा संपलेल्या या अशा कोरोनाग्रस्तांचे वागणे गुन्हेगारापेक्षा कमी नाही. ते समाजाचे आणि देशाचेही गुन्हेगारच आहेत.


- योगिता साळवी

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121