घुसखोरांनो चालते व्हा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020   
Total Views |
intruders_1  H




संपूर्ण जगभरात बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून प्रवेश करणार्‍या अवैध घुसखोरांवरून वादंग सुरू असल्याचे दिसते. सीरियासह अफगाणिस्तान, इराक वगैरे देशांतील अंतर्गत बंडाळी-संघर्ष, दहशतवाद्यांची धर्माच्या कट्टरतेवरून सुरू असलेली निर्घृण-अमानवी कृत्ये यामुळे या देशांतील लाखो लोक परागंदा होतात. आपल्या देशांतून पलायन करणारे हे घुसखोर मात्र नजीकच्या अन्य देशांत कोणत्याही वैध प्रक्रियेशिवाय प्रवेश करतात. घुसखोरांनी अशाप्रकारे अवैध प्रवेश केलेल्या देशांत युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्रिटन वगैरेंचा समावेश होता. परंतु, जीव वाचवण्यासाठी आलेले हे लोक नंतर जिथे आश्रय घेतला, तिथली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वीण उसवण्याचे किंवा उखडून टाकण्याचे काम करतात, स्थानिकांच्या डोक्यावर बसतात. आपल्या धार्मिक अट्टाहासापायी त्या देशांतील मूळच्या नागरिकांनीही तसेच वागावे, अशी अपेक्षा बाळगतात. तसे झाले नाही तर कायदा हातात घेऊन चाकू, ट्रक, बंदुकीच्या साह्याने हल्ले करतात किंवा स्थानिकांच्या सण, उत्सव वगैरेंत धुमाकूळ घालतात. महिलांना पुरुषांची गुलाम मानणार्‍या मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करणारे हे घुसखोर युरोपातील मोकळ्या वातावरणात धुडगूस घालतात आणि मुली-महिलांनाही लक्ष्य करतात. म्हणूनच एका बाजूला जगातील बहुतांश मानवाधिकार संघटना निर्वासित घुसखोरांना निवारा द्या, असा विविध देशांना आग्रह करत असतानाच कितीतरी लोक त्यांच्यामुळे गुन्हेगारीत वाढ होईल, असे म्हणतानाही दिसतात. जर्मनीतील पेगिडा संघटना किंवा फ्रान्समधील मरीन ली पेन यांनी तर ही भूमिका घेऊन आपल्या देशांत घुसखोरविरोधी आंदोलनेही सुरू केली. याच मालिकेंतर्गत युरोपियन संसदेचे सदस्य डॉमिनिक टारजिंस्की यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरावे.


डॉमिनिक टारजिंस्की युरोपियन कन्झर्व्हेटिव्ह अ‍ॅण्ड रिफॉर्मिस्टचे उपाध्यक्ष असून पोलंडमधील सत्ताधारी लॉ अ‍ॅण्ड जस्टिस पक्षाचे ते नेते आहेत. लॉ अ‍ॅण्ड जस्टिस पक्षाला उजव्या विचारसरणीचा पक्ष मानले जाते आणि आगामी काळात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर या पक्षाने ‘पोलंड फर्स्ट’ हा नारा दिला आहे. पक्षाची ही घोषणा पोलंडमध्ये लोकप्रिय होत असून त्यावरून चर्चाही झडत आहेत. दरम्यान, पंतप्रधान मॅट्यूस्ज मोरविकी यांनी तर युरोपला एक नवा आकार देऊन ख्रिस्ती रंगात रंगवण्याचेही ठरवले आहे. अशा पक्षाचे डॉमिनिक टारजिंस्की सदस्य असून घुसखोरांविरोधात सातत्याने आवाज उठवण्याबद्दल ते ओळखले जातात. डॉमिनिक टारजिंस्की यांनी घुसखोरांना कडक शब्दांत इशारा दिला असून स्वहितरक्षण करायचे असेल तर पोलंडच्या सीमेवर येऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे. घुसखोरांना इशारा देत डॉमिनिक टारजिंस्की यांनी ठणकावले की, “अवैधरित्या प्रवेश करणार्‍या सर्वांना मी इशारा देतो की, आपली सुरक्षा हवी असेल किंवा तुम्हाला बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडायचे नसेल वा तुरुंगात जावेसे वाटत नसेल तर पोलंडच्या सीमेपासून दूर राहा. पोलंडची सीमा पार करून आत घुसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका.” पुढे ते म्हणाले की, “आम्ही, आमचे लोक किंवा आमचे पोलीस तुम्हाला मारहाण करायला आले नव्हते. उलट तुम्हीच आमच्या देशांत बेकायदेशीरपणे घुसखोरी केली आणि इथली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवून टाकली. म्हणूनच आत्मसुरक्षेसाठी पोलिश सीमेपासून दूर राहा,” अशा कडक आणि थेट शब्दांत डॉमिनिक टारजिंस्की यांनी इस्लामी देशांतून झुंडीच्या झुंडीने येणार्‍यांना इशारा दिला आहे.


दरम्यान, पोलंडमधील सत्ताधारी पक्ष व त्या पक्षाच्या सदस्यांनी अशी विधाने केलेली असतानाच दोन-तीन दिवसांपासून तुर्कीमार्गे युरोपांत जाणार्‍या सीरियन घुसखोरांचे संकट उभे ठाकले. तुर्कीने आपल्या देशांच्या युरोपला लागून असलेल्या सीमा खुल्या केल्या असून घुसखोरांना ग्रीस व तिथून पुढे युरोपात आश्रय घेण्यासाठी तो देश प्रोत्साहन देत असल्याचेही म्हटले जाते. सध्या ग्रीसच्या सीमेवर १५ ते २० हजार निर्वासित असून ग्रीसने त्यांना तिथे रोखून धरले आहे. तसेच जे दंडेली करत प्रवेशाचे प्रयत्न करत आहेत, अशांना हाकलून लावण्याचे कामही ग्रीक पोलीस करत आहेत तर तुर्कीने घुसखोरांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव वाढवला आहे. यावरूनच आगामी काही काळात युरोपात घुसखोरांचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता वाटते.

@@AUTHORINFO_V1@@