'येस' बँक, 'नो' बँकिंग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020   
Total Views |


Yes Bank Article_1 &


'पीएमसी' बँकेनंतर आता 'येस' बँकही कोसळली. पण, याचा परिणाम केवळ 'येस' बँकेच्या ग्राहकांवरच नाही, तर विविध बँकांच्या खातेदारांनी याचा चांगलाच धसका घेतलेला दिसतो. आज 'येस' बँक बुडाली, उद्या आपलीही बँक बुडू शकते, ही भीती जवळपास सर्वच खातेदारांच्या मनात डोकावली असेल. तेव्हा, ज्यांची खाती 'येस' बँकेमध्ये होती त्यांनी काय करावे, यासोबतच इतर बँकांमधील खातेदारकांनीही नेमकी काय काळजी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...


भारतीय रिझर्व्ह बँकेने ३ एप्रिल, २०२० पर्यंत 'येस' बँकेतून ग्राहकांना फक्त ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार, असा फतवा जारी केल्यानंतर बँकेचे ठेवीदार, कर्जदार व गुंतवणूकदार या सर्वांना जबरदस्त धक्का बसला. या प्रकरणानंतर देशभरातील बँकांमध्ये नेमके चाललयं तरी काय, असा आधीच प्रश्न पडलेल्या भारतीयांनाही याचा तितकाच धक्का बसला. ज्या ठेवीदारांची या बँकेत ५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक आहे, त्यांना १ एप्रिल, २०२० पासून ठेवींवरील विमा संरक्षणाची रक्कम ५ लाख रुपये होणार असल्यामुळे जास्त काळजीचे कारण नाही. 'येस' बँकेवर ५ मार्चपासून बंधने आली. ५ मार्च म्हणजे महिन्याचा पहिला आठवडा. साधारणपणे ईएमआय, एसआयपी शुल्क, भाडे तसेच युटिलिटी बिल यांचे पेमेंट पहिल्या आठवड्यातच केले जाते. पण, बँकेच्या या घोळामुळे बऱ्याच जणांचे हे पेमेंट रखडले. यासाठी त्यांना विलंब शुल्कही भरावे लागले ते वेगळे. त्यातच 'येस' बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येत नाहीयेत. दुसऱ्या बँक खात्यात पैसे वळते करायला या ग्राहकांना डिजिटल बँकिंगचा पर्यायही उपलब्ध नाही. इथे पैसे अडकल्यामुळे आर्थिक व्यवहार तर ठप्प होत नाहीत, ते करावेच लागतात. अशावेळी इतर ठिकाणच्या गुंतवणुकीतून मुदतपूर्व पैसे काढून घ्यावे लागतील व त्यामुळे गुंतवणूकदारांना, ठेवीदारांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल.

 

तुम्ही तुमची कसली तरी पेमेंट्स करायला 'येस' बँकेमार्फत ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस) पर्याय स्वीकारला असेल तर तो पर्याय रद्द करून, इतर बँकेचा पर्याय द्या. समजा, तुमचे 'येस' बँक सोडून दुसरीकडे कुठेही बँक खाते नसेल तर ते उघडता येते. ते उघडताना सार्वजनिक उद्योगातील बँकेला प्राधान्य द्या. जर तुमची 'ईसीएस'द्वारा होणारी पेमेन्ट 'येस' बँकेच्या घोटाळ्यामुळे मार्च महिन्यात झाली नसतील, तर निदान एप्रिल महिन्यापासून तरी ती नियमित होतील. 'ईसीएस'प्रमाणेच 'एसआयपी' व इतर पेमेंटसाठी दिलेल्या 'स्टॅण्डिंग इन्स्ट्रक्शन्स' दुसऱ्या बँकेला द्या. तुमचे गुंतवणुकीवरील व्याज, शेअरवरील लाभांश जर 'येस' बँकेत के्रडिट होत असेल, तर या क्रेडिटसाठी ही बँक बदला. 'येस' बँकेच्या कित्येक ग्राहकांना आता तुमची रक्कम कुठे क्रेडिट करायची किंवा डेबिट करायची, या विषयीची माहिती क्रेडिट किंवा डेबिट करणाऱ्या यंत्रणा व्हॉटस्अॅपवर किंवा एसएमएसवर विचारीत आहेत. याबाबत तुम्ही कारवाई सुरू करण्यापूर्वी, त्या यंत्रणांनीच कारवाई सुरू केली आहे. जर तुमचे ईएमआय पेमेंट वेळेत न भरल्यामुळे, खाते ब्लॉक झाले, तर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो व क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम झाला तर नवे कर्ज मिळणार नाही. जीवन विम्याचा हप्ता भरण्यात जर 'येस' बँकेमुळे उशीर झाला असेल, तर त्यामुळे काही परिणाम होणार नाही. कारण, जीवन विमा कंपन्या प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांचा 'ग्रेस पिरियड' देतात. त्या कालावधीत तुम्ही तो भरू शकता.

 

तुम्ही तुमचे 'येस' बँकेतील खाते जर पेमेंट अ‍ॅप्सशी, तसेच इतर सेवा आधारित अ‍ॅप्सशी त्या म्हणजे स्विगी, उबेर इत्यादीशी जोडले असले तर ती संलग्नता रद्द करा. पण, ही प्रक्रिया मात्र कटकटीची आहे. प्रत्येक कंपनीच्या एचआर खात्याने मार्चअखेरचे वेतन (या महिन्यात आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे काही कंपन्या वेतन लवकर देतात.) क्रेडिट करताना काळजी घ्यावयास हवी. कोणत्याही परिस्थितीत 'येस' बँकेत वेतन क्रेडिट करू नये. ते कर्मचाऱ्याला काढता येणार नाही, ते ब्लॉक होईल. कर्मचाऱ्यांनीही लवकर आपल्या नवीन खात्याचा तपशील एचआर खात्याला द्यावयास हवा. सुरुवातीला तरी रिझर्व्ह बँकेने 'येस' बँकेवर एक महिन्याचे बंधन घातले आहे, पण हा कालावधी वाढला तर काय? स्टेट बँक 'येस' बँकेत गुंतवणूक करण्यास तयार असून या बँकेच्या पुनर्बांधणी प्रक्रियेत सहभागी व्हायला तयार आहे, अशा बातम्या माध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. तसे पाहिले तर केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने ही बँक वाचावी म्हणून स्टेट बँकेच्या कुबड्या घेऊन, या बँकेला कार्यरत केले तरी लोकांचा जो या बँकेवरचा विश्वास उडाला आहे, तो पुन्हा प्रस्थापित होणे आता सहज शक्य नाही. खातेदार, ठेवीदार ही बँक समजा कार्यरत झाली, तर आपले सर्व पैसे काढून घेऊन खाते बंद करण्याचाच निर्णय घेतील. कर्जदारांना यामुळे फारसा फरक पडत नाही. त्यांच्याकडे या परिस्थितीत गमावण्यासारखे काही नाही. समजा, स्टेट बँकेने, 'येस' बँकेला संजीवनी दिली तरी हा घोटाळा पूर्ण शोधून काढला जायला हवा. याची पाळेमुळे खणून काढायला हवीत व यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हव्यात.

 

नीरव मोदी, विजय मल्ल्या, नरेश गोयल, चंदा कोचर आणि असे असंख्य मोठी नावे आर्थिक गुन्ह्यांत समोर येतात. पण, पुढे त्यांच्यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही. यामुळे लोकांचा बॅँकाबरोबरच सरकारवरचा व न्यायालयावरचा विश्वासही उडत चालला आहे. पीएमसी, सिटी को-ऑपरेटिव्ह, येस व अन्य कित्येक बँका आर्थिक अडचणीत आल्या आणि या सगळ्यात नाहक भरडला गेला तो ठेवीदार. भारतात ठेवींवरील व्याजाचे दर सातत्याने घसरत आहेत. गृहबांधणीत गेली कित्येक वर्षे मंदी असल्यामुळे, लोक त्यातही गुंतवणूक करीत नाहीत. सोन्याचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे त्यातही गुंतवणूक कमी झाली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढली होती. पण म्युच्युअल फंडांच्या ३२ योजनांचे सुमारे २,८४८ कोटी रुपये 'येस' बँकेत अडकले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्यांनाही याची झळ बसू शकते. त्यामुळे अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांत किंवा सरकारी कर्जरोखे, बॉण्ड्स यांच्यात किंवा पोस्टाच्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करावी. यात परतावा कमी मिळेल, पण मनाला शांती जास्त मिळेल व बँकिंग व्यवहारांसाठी सरकारी बँकेत खाते ठेवावे, तसेच एकाच योजनेत सर्व गुंतवणूक नसावी. वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करावी. नाहीतर येस बँकेनंतर आणखीही एखादी बँक अडचणीत येऊ शकते. काही बँकिंग तज्ज्ञांच्या मते, आणखी बऱ्याच बँका अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानता बाळगा नाहीतर तुमचे पैसे बँकेत असून, तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही, अशी अवस्था होईल, जी सध्या पीएमसी, येस बँक वगैरेंच्या ग्राहकांची झाली आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@