महाराष्ट्राची कर्तृत्ववान कन्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


dr madhuri kanitkar_1&nbs



नवी दिल्ली येथे डॉ. माधुरी कानिटकर यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस-वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. लष्करात उच्च श्रेणीचे पद मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी डॉ. माधुरी कानिटकर यांच्याविषयी...


समाजाच्या सर्वच स्तरांवर विकासाची समान संधी मिळावी याकरिता महिलांनी आजपर्यंत मोठा लढा दिला आहे
. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्करात महिलांना समान संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे महिला लष्करी अधिकार्‍यांनी स्वागत केले होते. याच पार्श्वभूमीवर डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘एकात्मिक संरक्षण विभागा’च्या उपप्रमुख (सीडीएस-वैद्यकीय) म्हणून सूत्रे स्वीकारली. या निर्णयाने डॉ.माधुरी या देशभरातील भारतीय लष्करात येऊ पाहणार्‍या महिलांसाठी एक आदर्श ठरल्या. त्रितारांकित अधिकार्‍यांचे पद नौदलात व्हाईस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. पुनिता अरोरा यांचा लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान आहे. यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. आता लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर या मराठमोळ्या महिलेला भारतीय लष्करात उच्चपदस्थ होण्याचा मान मिळाला.



डॉ
. कानिटकर यांचे कधीही स्वप्न नव्हते की, आपण लष्करात भरती व्हावे, एवढेच नव्हे तर बारावीपर्यंत त्यांना आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजविषयीदेखील माहिती नव्हती. डॉ. कानिटकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले आहे. वैद्यकीय शिक्षण बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे झाले आहे. पुढे त्यांना ‘एएफएमसी’ या लष्करात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तयार करणार्‍या महाविद्यालयाविषयी माहिती मिळाली आणि त्याचठिकाणी प्रवेश घ्यायचा निश्चय केला. डॉ. माधुरीने ‘एएफएमसी’मधून एमबीबीएस केले. तेथे त्या सुवर्णपदक विजेत्या ठरल्या. त्यांच्या शिक्षण व शिक्षणेतर उल्लेखनीय सेवांसाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.


dr madhuri kanitkar_1&nbs


डॉ
. माधुरी यांनी ३७ वर्षे भारतीय लष्करात सेवा दिली आहे. त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकारतज्ज्ञ आहेत. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. माधुरी यांचे पती राजीव कानिटकर हेदेखील भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते ‘परमविशिष्ट सेवा’ पदक, ‘अतिविशिष्ट सेवा पदक’, ‘विशिष्ट सेवा पदक’, ‘सेवा पदक’ विजेते आहेत. एका दाम्पत्याने लष्करात लेफ्टनंट जनरलपद स्वीकारल्याची ही पहिलीच घटना आहे. आजही जे क्षेत्र पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते. मात्र अशावेळी, डॉ. कानिटकर यांनी हॉस्पिटल नसलेल्या ठिकाणी तात्पुरत्या बराकीत राहून सुद्धा सैनिकांना आरोग्यसेवा दिली. आसाम, अरुणाचल प्रदेश याबरोबर दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. डॉ. कानिटकर भारतीय लष्करातील पहिल्या प्रशिक्षित पेडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत. पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडाच्या विकारांवर उपचार करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथे त्यांनी या विषयातील प्रशिक्षण घेतले आहे. ’एएफएमसी’मध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

 



dr madhuri kanitkar_1&nbs


पदव्युत्तर पदवी घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. कानिटकर यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ‘एएफएमसी’मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कर्तव्याप्रति असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेले योगदान यासाठी डॉ. कानिटकरांना २०१४ साली ‘विशिष्ट सेवा पदक’ मिळाले आहे. २०१८ साली त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरवण्यात आले. २०१८ मध्ये ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात येणार्‍या त्या एकमेव महिला अधिकारी होत्या. तब्बल चार दशके भारतीय लष्करात उल्लेखनीय सेवा दिल्यानंतर त्यांना मिळालेले लेफ्टनंट पद हे त्यांच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

 




dr madhuri kanitkar_1&nbs

स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल, दिव्या अजित कुमार, गुंजन सक्सेना यांच्यासह सागरी मार्गाने जगभ्रमंती करणार्‍या सहा नौदल अधिकार्‍यांचे शौर्य कमी लेखता येणार नाही. संधी मिळाल्यास महिला कोणतीही आघाडी सांभाळू शकतात, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “भारतीय लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.” त्यांचे हे प्रेरणादायी कर्तृत्व पुढील कित्येक पिढ्या महिलांना देशसेवेसाठी प्रोत्साहन देणारे आहे. यानिमित्ताने महिलांना लष्करातही समानतेचा अधिकार तर मिळालाच आहे. पण महिलांच्या भारतीय लष्करातील सक्षमतेवरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे संकुचित मानसिकता झुगारून भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल या उच्चपदावर विराजमान झालेल्या या महाराष्ट्राच्या कन्येला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम !

 

@@AUTHORINFO_V1@@