मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हा उन्माद असाच सुरूच राहिला तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. त्याचबरोबर 'सीएए'त गैर काय ? असा सवाल ही त्यांनी सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्यांना केला आहे. ते पुढे म्हणाले “मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होते. तसे कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत,” असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला.
देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला राज्यभरातून गर्दी होती. मरिन ड्राइव्ह येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व खुद्द राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला संबोधन करताना राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.
राज ठाकरे म्हणाले, “पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललेच पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएएबद्दल काहीच माहिती नाही. फक्त व्हॉट्सअॅपवर चर्चा करतात आणि मेसेज पुढे पाठवतात. हा १९५५ सालचा कायदा आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यानंतर १९५५ साली हा कायदा झाला. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज २००० मधील परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. पण आज काय परिस्थिती आहे त्या देशांची आणि खासकरुन पाकिस्तानची,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी आपण वेळोवेळी केंद्र सरकारच्या योग्य निर्णयाची स्तुती केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले “केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपाविरोधी आणि स्तुती केली तर भाजपाच्या बाजूने म्हटले आहे. याच्या मधे काही आहे की नाही. जेव्हा चुकीचे निर्णय झाले तेव्हा त्यावर टीका केली. पण जेव्हा ३७० कलम काढलं तेव्हा अभिनंदन केले. न्यायालयाकडून राम मंदिराला परवानगी देण्यात आली तेव्हा बाळासाहेब असते तर आनंद झाला असता असे म्हटले होते. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे ठरले तेव्हाही अभिनंदन केले. त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभेल. आपण फुकट नाही मेलो असे त्यांना वाटेल,” असेही ते म्हणाले.