पनवेल : नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी यांची जयंती, तसेच प्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे संस्थापक सभासद पद्मश्री डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर आणि पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, संस्कार भारती, रायगड विभाग, पनवेल समितीने ‘कलांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सर्व दिग्गजांना कलेच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि. ९ फेबुवारी रोजी रात्री ८.३० ते ११.३० या वेळेत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आणि संस्थेच्या सर्व विभागांच्या सहभागातून हा कार्यक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे. या सर्व दिग्गजांच्या कार्याविषयी पुढील पिढीलाही माहिती व्हावी यासाठी हा कार्यक्रम विनामूल्य सादर करण्यात येणार आहे. कलांजली कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून नाट्यगृहाच्या आवारातच या दिग्गजांची काही चित्रं, शिल्प व रांगोळीची एक छोटीशी प्रदर्शनी सादर करण्यात येणार आहे. मुख्य नाट्यगृहात, पुलंच्या बटाट्याची चाळ या बहुरूप्याच्या खेळामधील काही निवडक प्रवेशांचे बहुपात्री रुपांतरण स्थानिक हौशी कलाकार सादर करणार आहेत. तर गदिमांची गीते आणि बाबुजींनी संगीतबद्ध केलेली अजरामर गाणीही सादर करण्यात येणार आहेत.
संस्कार भारती, ही संस्था कला जतन, संरक्षण व संवर्धनाचे कार्य १९८१ पासून संपूर्ण देशभर सातत्याने अविरत करीत आहे. संस्कार भारती ही देशव्यापी संस्था असून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सहयोगातून निरनिराळे कार्यक्रम आयोजित करीत असते. प्रशासकीय सुकरतेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी संस्था राज्य, प्रांत, विभाग आणि समिती पातळीवर कामकाज चालविते. महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतामधील रायगड विभागांतर्गत पनवेल समिती कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष वैजयंती बुआ, सचिव सुलक्षणा टिळक, कोषाध्यक्ष नीला आपटे, संघटन मंत्री मधुरा देसाई, नाट्यविधा प्रमुख दिनेश मालोतकर, नृत्यविभाग प्रमुख निधी दलाल, साहित्य विधा प्रमुख अपर्णा नाडगौडी या मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ‘दै. मुंबई तरुण भारत’ला ही माहिती दिली. यावेळी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याची आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२७४६२६३२