महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर ट्वीट करत व्यक्त केली काळजी
मुंबई : गेल्या काही दिवासांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाद झाली आहे. महिला सुरक्षेविषयी सर्व स्तरांतून काळजी व्यक्त होत असतानाच, अमृता फडणवीस यांनीही ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अशा घटना ऐकून प्रचंड त्रास होत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
‘महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत!नागपुर मधे हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिताला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक', असे ट्विट त्यांनी केले आहे. आपापसातील वाद विसरून आता याप्रकरणावर कठोर भूमिका घेण्यात यावी असेही त्यांनी म्हंटले आहे.
दिवसेंदिवस राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. हिंगणघाट पिडीतेची प्रकृती गंभीर असून, तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे अंगावर राॅकेल टाकून पेटवून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अंधारी (ता. सिल्लोड) येथील महिलेचा (वय ५०) औरंगाबाद घाटी रुग्णालयात बुधवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. अंधारी येथील ही महिला आगीत ९५ टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली असून, त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.