'रामसर' दर्जाचे 'हतनूर'

    03-Feb-2020
Total Views | 79
tiger_1  H x W:


खानदेशातील सर्वात मोठ्या हतनूर धरण जलाशयाला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.

 
जळगाव (अनिल महाजन) -  'हतनूर धरण जलाशय’ हे खानदेशातील सर्वात मोठे जलाशय म्हणता येईल. संत चांगदेव यांची पावनभूमी असलेल्या ’चांगदेव’ गावी मध्यप्रदेशातून मेळघाट मार्गे येणारी तापी नदी आणि विदर्भातून येणार्या पूर्णा नदीचा संगम झाला आहे. या संगमाच्या पाच किमी पुढे हतनूर धरणाची निर्मिती झाली. याच जलाशयाला लागून ’चांगदेव’पासून दोन किमी पुढे संत मुक्ताबाई यांचे सुंदर मंदिर आहे. संत चांगदेवांचे हेमाडपंथी मंदिर, संत मुक्ताबाई आश्रम आणि तापी-पूर्णेच्या संगमामुळे हतनूर धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हतनूर धरणापासून तीन किमी अंतरावर भारत सरकारचा ‘आयुध निर्माणी वरणगाव’ हा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आहे. अडीच हजार एकरावर पसरलेल्या या परिसरात विविध राज्यातून आलेले कामगार आणि अधिकारी राहतात. त्यांनी आपापल्या राज्यामधून आणलेली विविध प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे याठिकाणी लावल्याने ‘फांदीधारी’ पक्ष्यांची विविधता येथे विपुल प्रमाणात आढळते.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
जलशयापासून काही अंतरावर असलेल्या ’हरताळा’ या गावात सुंदर तलाव आहे. या तलावाच्या काठी राजा दशरथाने श्रावण बाळाला बाण मारला, अशी आख्यायिका आहे. महादेवाचे प्राचीन मंदिर आणि महानुभाव पंथाचा आश्रम येथील तलावाकाठी पाहावयास मिळतो. काही वर्षांपूर्वी हा तलाव कमळांनी बहरलेला होता. त्यामुळे या परिसरात विविध प्रकारच्या पक्ष्यांचा वावर असे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे ’करकरा’ आणि ’सामान्य क्रौंच’ पक्ष्यांची यापरिसरात नोंद होती. मात्र, तलावातील ही कमळे त्यांच्या कंदमुळांसाठी ठेका पद्धतीने काढण्यात आली. परिणामी येथील विशिष्ट अधिवासाची जैवविविधता नष्ट झाली, तरीसुद्धा येथे आपणास अजूनही चांगल्या प्रकारचे पक्षीवैभव पाहावयास मिळते. तलावाला लागून असलेले दाट झुडुपी जंगल आणि त्या अनुषंगाने असणारी प्राणिविविधताही याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे.
 
 

tiger_1  H x W: 
 
संतांच्या या भूमीत वारकरीही मोठ्या संख्येने येतात. वारकरी मनोभावे दर्शन घेऊन संतुष्ट मनाने परतीला लागतात. मात्र, त्यापाठोपाठ हिवाळा लागताच हजारोंच्या संख्येने हवाईमार्गाने द्वीपाद पंखवाले स्थलांतरित ’वारकरी’ पक्षी हतनूर धरण जलाशयावर दाखल होतात. साधारण नोव्हेंबर ते पार उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत स्थलांतरित पक्ष्यांच्या नानाविध प्रजाती याठिकाणी प्रत्येक महिन्यात दाखल होताना दिसतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये दाखल झालेले ’नयनसरी’ जानेवारीपर्यंत जलाशय परिसरात थांबा घेतात. त्यानंतर दिसणारे बदक म्हणजेच ’शेंडी बदक’, ’गढवाल’, ’वारकरी’, काही कालावधीनंतर उशिराने दिसणारे बदक म्हणजे ’तलवार बदक’, ’थापट्या बदक’ या परिसरात आढळतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये अजून काही बदल आपल्याला जाणवण्यास सुरुवात होते. जलाशयाची पातळीही थोडी खालवते आणि कमी-अधिक बेटे तयार होतात. मग ’चिखलपायटे’ पक्षी मोठ्या संख्येने दिसायला लागतात. उन्हाळा जवळ येऊ लागल्यावर ’करकोचे’ उदा. ’चित्रबलाक’, ’उघडचोच करकोचे’, विविध प्रकारचे ’कुदळे’ विशेष म्हणजे ’मोर शराटी’ मोठ्या संख्येने दिसतात. एप्रिल-मे महिन्यादरम्यान या परिसरात ’फ्लेमिंगो’ पक्ष्यांचे आगमन होते. त्यासोबत ’स्पूनबिल’ (चमचा), ’वेस्टर्न रीफ इग्रेट’, दुर्मीळ झालेला ’मलार्ड’ हे पक्षी दक्षिणेकडून परतीच्या प्रवासाला निघालेले असताना हतनूर जलाशयावर काही दिवस थांबतात. उन्ह तापू लागल्यावर ’डार्टर’, विविध प्रकारचे ’सॅण्डपायपर’, ’प्लॉवर’, ’पाणलावे’, ’गॉडविट’सारखे पक्षीही आपल्याला क्वचित दिसतात. याशिवाय जलाशय परिसरात पक्ष्यांच्या विविध प्रजाती प्रजननासाठीदेखील येतात. त्यामध्ये मोठी ’आर्ली’, ’रिव्हर टर्न’, ’व्हिसक्रेड टर्न’ आणि ’लिटिल टर्न’ या पक्ष्यांचा समावेश आहे.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
अशा प्रत्येक महिन्यागणिक भेट देणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती, येथील पक्षीविविधता, त्यांची मोठ्या प्रमाणावरील संख्या ही हतनूर जलाशयाची वैशिष्ट्ये आहेत. या जलाशयाला लागून असलेली हतनूर, टहाकळी, चिंचोल, मेहूण, चांगदेव, मानपूर, मानेगाव, कोथळी, मुक्ताईनगर, तांदलवाडी, मागंलवाडी, पुरी, गोलेवाडे, बलवाडी, उचंदा, सिंगत, ऐनपूर, नेहते आणि हरणताळ मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील गावे आहेत. या खेड्यांमधून अधूनमधून स्थलांतरित पक्ष्यांची चोरटी शिकार होते. शिवाय मोठ्या प्रमाणावरील मासेमारी, गुरेचराई, तणनाशक आणि केळीच्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर जैवविविधतेला धोकादायक ठरतो. केळीच्या बागेत ‘हळदी-कुंकू’ बदक प्रजनन करत असल्याने त्यांच्या पिल्लांचे आणि अंड्याचे नुकसान होते. यासाठी खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांपासून आमची ’चातक निसर्ग संवर्धन संस्था’ यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला मदतीची आवश्यकता आहे.
 
 
(लेखक पक्षी अभ्यासक आणि जळगाव जिल्ह्यातील ’चातक निसर्ग संवर्धन संस्थे’चे अध्यक्ष आहेत.)
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121