अवकाशयुद्धाची नांदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020   
Total Views |
sattelite war_1 &nbs


दुसर्‍या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका या दोन बलाढ्य शक्तींनी एकमेकांना शह देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवकाश मोहिमा हाती घेतल्या. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर समोरासमोर येण्याऐवजी अवकाशालाच आपली ‘समरभूमी’ केले. मानवाचे चंद्रावरील पहिले पाऊल, अमेरिका आणि रशियातील या शक्तीसंघर्षाचे फळ असल्याचेही मानले जाते. नंतर मात्र, रशियन साम्राज्याचे विघटन झाले आणि अमेरिका एकमेव महासत्ता उरली. तरीही दोन्ही ध्रुवांचा वर्चस्वाचा लढा काही थांबला नाही, तो पुढेही चालूच राहिला. नुकतीच अमेरिका आणि रशियाच्या संबंधाने अवकाशात अशी एक घटना घडली, ज्याकडे अवकाश संशोधकांसह लष्करी तज्ज्ञांचेही लक्ष वेधले गेले. पृथ्वीभोवती फिरणार्‍या अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाचा रशियन उपग्रहाने केलेला पिच्छा ही ती घटना. स्पेस ट्रॅकर एजन्सी ‘द व्हर्ज’ने दिलेल्या माहितीनुसार, रशियन उपग्रहाने अमेरिकन उपग्रहाजवळ जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या कॅमेर्‍याने अमेरिकन उपग्रहाची छायाचित्रे टिपली आणि छायाचित्रणही केले. हा उपक्रम जवळपास जानेवारी महिनाभर चालला, हे उल्लेखनीय!


‘कॉसमॉस २५४२’ नामक रशियन उपग्रह नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला होता. हा उपग्रह अजूनही आपल्या जुन्या कक्षेत भ्रमण करत आहे. अमेरिकन लष्कराने रशियाच्या या उपग्रहाला हेरगिरी करणार्‍या उपग्रहांच्या यादीत सूचीबद्ध केले आहे. अमेरिकन लष्कराचा हा खास विभाग आपल्या उपग्रहांच्या माहितीबरोबरच परकीय उपग्रहांच्या उपस्थितीवरही नजर ठेवतो. मात्र, अमेरिकन लष्कराच्या याच उपग्रहविषयक विभागाने रशियन उपग्रहाच्या अमेरिकन उपग्रहाच्या पाठलागावर काळजी करण्याचे वा भयभीत होण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. तसेच सर्वसामान्य परिस्थितीत अमेरिकन आणि रशियन उपग्रह या कक्षेत दर दहा दिवसांनंतर भ्रमण करतच असतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु, खरेच तसे असेल का? कारण, अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी अवकाशात आपले अनेक उपग्रह सोडलेले आहेत. परंतु, अशाप्रकारे एकाच्या मागे दुसर्‍याने धावण्याचे वृत्त किंवा माहिती याआधी आली नव्हती. तसेच अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश आपल्या हेतूंविषयी कमालीची गुप्तता पाळत असतात आणि त्यात अवकाश मोहिमांचाही समावेश होतो. कित्येक जाणकारांच्या मते, तर अमेरिका आणि रशियाने चांद्रमोहिमा वा मंगळमोहिमा तसेच उडत्या तबकड्यांविषयीची माहिती एकतर दडवली वा चुकीच्या पद्धतीने दिली! म्हणूनच, अवकाशातील आताच्या घडामोडीमागेही काहीतरी निराळे आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. त्याला कारण आगामी काळात युद्ध हे जमिनीऐवजी अवकाशातच लढले जाईल, असे म्हटले जाते. तसेच अमेरिकेने यात आघाडी घेत अवकाश सैन्य उभारण्याचा कार्यक्रमही सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहायला हवे.


दुसरीकडे उपग्रह आणि हवाई उड्डाणविषयक तज्ज्ञ मायकल थॉमसन यांच्या मते, रशियन उपग्रहाने केलेली कृती नक्कीच संशयास्पद आहे, पण या प्रकरणात अजूनतरी काहीही सिद्ध झालेले नाही. कारण, या कक्षेमध्ये अशाप्रकारचे इतरही कितीतरी उपग्रह भ्रमण करत आहेत. मात्र, दोन उपग्रह एकमेकांच्या कमालीच्या जवळ आल्यास काय होऊ शकते, याचे अनुमान काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार अशा प्रसंगी एखादा उपग्रह दुसर्‍या उपग्रहाच्या कक्षेत घुसखोरी करून रासायनिक हल्ला करू शकतो. इतकेच नव्हे, तर लेझर किरणांच्या हल्ल्याने संबंधित उपग्रहाला नष्टही करू शकतो. अवकाशात आतापर्यंत असे कधीही झालेले नाही, हे नक्कीच. परंतु, जसजशी कोण किती ताकदवानची चढाओढ वाढत जाईल, तसतशी ही स्थितीही प्रत्यक्षात येईलच. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेने अशाप्रकारचे हल्ले करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. रशियादेखील आपणही अमेरिकेला तुल्यबळ असल्याचे दाखवण्यासाठी असे करू शकतोच. आताचा अमेरिकन उपग्रहाचा पिच्छा करणे, तशाच काही कार्यक्रमाचा भाग असू शकतो का, हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो.


तसेच अमेरिका आणि रशिया जर असे करत असतील तर भारतानेही यावर प्राधान्याने विचार करायला हवा. ‘इस्रो’सारखी जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था यातही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान नक्कीच निर्माण करू शकते.
@@AUTHORINFO_V1@@