वयाला उत्तुंग कामगिरीच्या, कर्तृत्वाच्या मर्यादा नसतातच मुळी. याचे आणखीन एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकरचा ‘तो’ विक्रम मोडणारी भारतीय क्रिकेटपटू शफाली वर्मा...
जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिलांनी आपला तिरंगा ध्वज डौलाने फडकावला आहे. यामध्ये महिला खेळाडूंचीही कामगिरी अगदी वाखाणण्यासारखी आहे आणि खासकरुन भारतीय महिला क्रिकेट संघाची. भारतीय महिला संघाने नुकतेच न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करुन आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय साजरा केला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तगड्या संघावर मात करत भारताने जवळ जवळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. गेली काही वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघाने उत्तम कामगिरी करत अनेक नवनवीन विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत. स्म्रिती मंधाना, हरमनप्रीत कौर, मिताली राज अशी अनेक भारतीय महिला क्रिकेटपटूंची नावे आज जगप्रसिद्ध आहेत. परंतु, या चमुत एक अशीही खेळाडू आहे, जिने पदार्पणातच क्रिकेटचा देव मानल्या जाणार्या सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला. तिची कामगिरी पाहता साक्षात सचिननेही तिचे विशेष कौतुक केले. तिच्यासाठी ’मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ ही मराठीमधली म्हण अगदी चपखल बसते. ती खेळाडू म्हणजे कपिल देव यांच्या हरियाणातून आलेली शफाली वर्मा.
शफाली वर्माचा जन्म हरियाणामधील रोहतक येथे झाला. २४ सप्टेंबर, २००४ रोजी एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या शफालीला लहानपणापासूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. कारण, तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि खासकरून ते सचिन तेंडुलकरचे चाहते. त्यांनी सचिनचा एकही सामना कधी चुकवला नाही. पुढे शफालीला रोहतकमध्येच एका शाळेत शिक्षण घेताना अवघ्या नवव्या वर्षी क्रिकेटचा सामना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. नोव्हेंबर २०१३ मध्ये शफाली तिच्या वडिलांसोबत हरियाणा विरुद्ध मुंबई संघाचा सामना बघण्यासाठी भल्या पहाटे स्टेडियममध्ये हजर होती. तो सामना त्यांच्यासाठी खास होता. कारण, त्या सामन्यात मुंबईकडून सचिनदेखील खेळत होता. साक्षात सचिनला मैदानावर खेळताना पाहून शफालीला क्रिकेटबद्दल आत्मीयता निर्माण झाली. सचिनचा खेळ पाहून तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. तिने क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास घेतला. पण, तिच्या परिसरात त्यावेळी मुलींना प्रशिक्षण देणारी क्रिकेट अकादमीच नव्हती. तेव्हा वडिलांच्या समर्थनाने तिने धाडसी निर्णय घेत मुलांच्या अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. यासाठी शफालीने स्वतःचा वेशदेखील बदलला. मुलांसोबत प्रशिक्षण घेत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला दहा वर्षांच्या शफालीला पुरुषांच्या गोलंदाजीचा सामना करणे कठीण वाटत होते. पण, स्वप्नांचा पाठलाग करणे तिने सोडले नाही आणि आपले प्रशिक्षण सुरुच ठेवले. बहुदा याच गोष्टीचा तिला फायदाही झाला. तिला महिला क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजांचा सामना करणे सोपे झाले. दरम्यान, तिने रोहतकमधील मनदीप वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे राम नारायण अकादमीमध्ये हरियाणाचे माजी क्रिकेटपटू अश्वनी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने रीतसर प्रशिक्षण घेतले. यावेळेस कुमार यांना वाटले की, शफाली तिच्या वयोगटातील मुलांपेक्षा चांगली कामगिरी करते आहे. तसेच कोणत्याही मुलीच्या खेळाने तिच्यासमोर आव्हान उभे राहत नव्हते, हे त्यांनी अचूक हेरले होते. म्हणून शफालीच्या प्रशिक्षकांनी तिला १९ वर्षांखालील मुलांसोबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यामुळे तिचा खेळ अधिक बहरत गेला. तिचा खेळ पाहता अवघ्या काही कालावधीमध्येच हरियाणाच्या ज्युनिअर संघामध्ये शफालीला स्थान मिळाले. या संधीचे सोने करत तिने चौकार-षटकारांसह धावांचा अगदी पाऊस पाडला. शफालीमधील धावांची ही भूक पाहता, पुढे तिला सिनिअर संघामध्ये, तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रिकेटमधील तिची कामगिरी पाहता पुढे तिला आंतरराष्ट्रीय संघामध्येही प्रवेश मिळाला.
क्रिकेटमध्ये पदार्पण करताच तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ३० वर्षांपासून असलेला अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर केला. सप्टेंबर २०१९ मध्ये तिला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ‘टी-२०’ आंतरराष्ट्रीय संघामध्ये स्थान देण्यात आले. आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ सामन्यामध्ये प्रवेश करून ती भारताकडून खेळणारी सर्वात तरुण महिला ठरली. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यामध्येही तिचा समावेश करण्यात आला. यावेळी तिने वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या १५व्या वर्षी अर्धशतक झळकावले. सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारी ती भारताची सर्वात तरुण महिला ठरली. तसेच, तिने सचिन तेंडुलकरचा ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. ३० वर्षांपूर्वी सचिनने १६व्या वर्षी पहिले आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अर्धशतक झळकावले होते. सध्या चालू असलेल्या ‘आयसीसी वुमन टी-२०’मध्येसुद्धा शफालीने चांगली कामगिरी केली आहे. अशा या ’नॅचरल गेम’ खेळणार्या शफालीला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...